ढिंग टांग : तुतारीचे बोल!

Dhing-Tang
Dhing-Tang

(धुंधुंधुं धुंधु...धुंधुंधंईऽऽऽऽ...उर्फ तुतारीचा आवाज)
खर्जातला आवाज : माझ्या महाराष्ट्रातील तमाऽऽम बंधुन्नो, भगिनीन्नो, आणि मातांन्नो, माझ्या महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा बेलभांडार उचलून, कपाळाला गंध लावून आम्ही अफाट जनसमुदायाला सामोरे गेलो, त्याला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्राचे नवनिर्माण आज पंधरा वर्षाचे जाहले. पुढले सोळावे वरीस आहे...सोळावे वरीस धोक्‍याचे असते, असे म्हणतात. माझ्या महाराष्ट्रासाठी हे वर्ष धोक्‍याचे नसून मोक्‍याचे असणार आहे, याची खातरी मनोमनीं बाळगावी!
पंधरा वर्षापूर्वीचे ते ऐतिहासिक दृश्‍य आमच्या डोळ्यांसमोर तरळत आहे.

किंबहुना, ते सतत तरळत असते. त्या तरळातरळीतच आमची पंधरा वर्षे निघोन गेली, ऐसे म्हटल्यास वावगे होणार नाही! पंधरा वर्षापूर्वी पायावर धोंडा पाडोन घेतल्याचा साक्षात्कार होवोन आम्ही सवतासुभा निर्माण केला, आणि पाठोपाठ महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा विडा उचीचला! माझ्या लाखो महाराष्ट्र सैनिकांनी तेव्हा एकमुखाने जयजयकार केला. तेथेच आम्ही सांगितले, ‘‘महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा!’’ लोकांना पटले!! माझा महाराष्ट्र ऐश्वर्यशाली, शक्तिशाली आणि ख्यालीखुशाली व्हावा, यासाठी आम्ही हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, तुम्ही हाडाची काडे केलीत, लाठ्या खाल्ल्यात, कोर्टाच्या वाऱ्या केल्यात... त्याचे फळ दिसू लागले आहे. महाराष्ट्राचे नवनिर्माण होताना स्पष्ट दिसत आहे.

पंधरा वर्षात आम्ही काही विजय पाहिले, बरेचसे पराजय पाहिले. काही लोक आमची साथ सोडोन गेले. त्यांचे जाणे त्यांना लखलाभ असो! आपण मात्र आमच्या संगतीला सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक उभे राहिलात. आपले आभार!

पंधराव्या वर्धापन दिनानिमित्ताने पुन्हा एकवार आम्ही नवनिर्माणासाठी हांक देत आहो! त्यासाठी सदस्य नोंदणीची राष्ट्रीय मोहीम हाती घेत आहो. सदस्यत्त्वाचा फॉर्म नीट वाचणे, समजोन घेणे आणि मगच भरोन पाठविणे. हयगय केलीयास गय केली जाणार नाही! फॉर्ममधील प्रश्न अनिवार्य आहेत. त्यातील काही वानगीदाखल येथे देत आहो!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१. आपले संपूर्ण (खरे) नाव मराठीत सांगा? (हा प्रश्न नाही, पण तरीही सोयीसाठी प्रश्नचिन्ह टाकले आहे.)
२. आपण मास्क वापरता का? (होय। नाही)
३. आपण टोल भरता का? (होय। नाही)
४. खळ्ळ आणि खट्याक या दोन ध्वनिवाचक शब्दांचे अर्थ फोड करुन सांगा? (हादेखील प्रश्न नाही, तरी सोयीसाठी प्रश्नचिन्ह टाकले आहे. वि. सू. : शब्दांचे अर्थ फोड करुन सांगा, म्हणजे तोडफोड करुन सांगा असा नव्हे!)
५. आपण कधी कोर्टात गेला होता का? (होय। नाही)
६. आपण कधी तुरुंगात गेला होता का? (होय। नाही)
७. खालीलपैकी कुठली वस्तू अधिक जाळ निर्माण करते? (टायर। टोलनाका। कानफट)
८. नवनिर्माणाचा संकल्प तडीला नेताना आपण त्याग करण्यासाठी तयार आहात का? (होय। नाही)
९. आपण सकाळी किती वाजता उठता? 
आणि आखरी सवाल : लेकाच्यांनो, तुम्ही नेमकी मतं देता तरी कोणाला?
...वरील दहा प्रश्न प्रत्येक इच्छुकाने नीट वाचावेत. त्याची मन लावून उत्तरे द्यावीत. अर्ज नवनिर्माणाच्या कार्यालयात आणून द्यावा. त्याची रीतसर छाननी होऊन मगच तुम्हाला सदस्यत्त्व द्यायचे की नाही, याचा निर्णय खुद्द साहेब घेतील!
आमच्या अर्जाचे काय झाले? असे विचारण्यासाठी शिवाजी पार्कावर कृपया गर्दी करु नये. सकाळी अकराच्या आत तर बिलकुलच येऊ नये!
...सर्वांना पंधराव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खळ्ळ खट्यॅक! जय महाराष्ट्र.
(पुन्हा तुतारीचे बोल)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com