Dhing-Tang
Dhing-Tang

ढिंग टांग : सामील व्हा की..व्हा!

‘विविध क्षेत्रांतील क्रियाशील आणि सृजनशील जनांनो, राजकारणात या. मी तुम्हाला संधी देण्यास तयार आहे…’’ हा आवाहनवजा आदेश (किंवा आदेशवजा आवाहन) वाचून आमचे नेमके जे काही झाले, ते आपल्यासमोर प्रामाणिकपणे ठेवीत आहे. : एक, सर्वात आधी हातातील चहाचा कोप गळून आमच्याच पायावर पडून थोडके भाजले. दोन, त्यावर अस्फुटपणे आमच्या मुखातून ‘ओय ओय’ असा वेदनावाचक ध्वनि निर्माण जाहला. तीन, आमच्या ‘ओय ओय’ या उद्गारांविषयी गैरसमज होवोन आम्ही ‘होय होय’ असे म्हणाल्याची अफवा व्हायरल जाहली. चार, आम्ही आपादमस्तक प्राणांतिक दचकलो. आणि फायनली पाच, लशीसाठी पर्युत्सुक असलेल्या आमच्या दंडातील इवल्या इवल्या बेटकुळ्या टणाटणा उडो लागल्या!

आमचे परमप्रिय आणि हृदयस्थ नेते जे की माननीय साहेब (शिवाजी पार्क, दादर) यांनी नवनिर्माणासाठी दिलेली सदस्य नोंदणीची हांक आम्ही तशीही वाया जाऊ देणारच नव्हतो. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या नवनिर्माणासाठीच तर हा सारा खटाटोप सुरु आहे! एरवी काय कुणाचे अडले आहे? मेगाभर्ती मोहिमेत सहभागी होणे हे आमचे कर्तव्यच होते. नव्हे, तोचि खरा महाराष्ट्रधर्म हे आमचे स्पष्ट मत आहे. सबब, आम्हीही या ऐतिहासिक मोहिमेत सामील होण्याचा संकल्प सोडिला…माणूस रक्तदानास रांगा लावतो. माणूस मतदानास रांगा लावतो. माणूस नोटाबंदीतही रांगा लावतो. आम्ही नोंदणीसाठी रांग लावावयास गेलो. परंतु, नकटीच्या नाकांस सत्राशे विघ्ने या म्हणीनुसार आम्हाला खास मराठी कर्कानुभव आला!!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुणी म्हणाले, ‘मेगाभर्ती आहे, गंजिफ्रॉक बदला!’
कुणी म्हणाले, ‘बुटात वजन ठेवा!’
कुणी म्हणाले, ‘ अर्धा डझन केळी खाऊन जा!’
कुणी म्हणाले, ‘पाच किलोमीटर अर्धम्यारेथॉन धावायला लावतात! मागे फिरा!!’
कुणी म्हणाले, ‘खळ्ळखट्याकचा थोडातरी अनुभव असणे ही प्राथमिक अर्हता आहे! बसा घरीच!’

…एक ना दोन, भाराभर सूचनांमुळे आम्ही बेजाराहुनि बेजार झालो. तरीही आम्ही मनातला महाराष्ट्रधर्म मनसे धगधगता ठेविला. पेपरात नोंदणी मोहिमेच्या जाहिराती आल्याच होत्यात. त्यात नोंदणीचे चार मार्ग देण्यात आले होते. क्यूआर कोड, संकेतस्थळावरील ऑनलाइन नोंदणी, मिस्ड कॉल देणे आणि नजीकच्या पक्षकार्यालयात जाऊन ऑफलाइन नोंदणी! आम्ही आधीचे तिन्ही मार्ग स्वीकारले, शिवाय शिवाजी पार्क येथील मांडवात रांग धरुन उभे राहिलो. लायनीत उभे राहून याला ऑफलाइन कसे म्हणावे? याचाच विचार आम्ही करीत होतो. (मराठी माणूस कधीही चान्स आणि रिस्क घेत नसतो! असो! ) रांगेतील दोघा तिघांनी ‘आधी रजिस्ट्रेशन करावे लागते का?’ असे गोंधळून विचारले. आणखी चार-चौघे क्यूआर कोड स्कॅन करण्याच्या प्रयत्नात दिसले. एका महाभागाने शंभर मिस्ड कॉल दिल्याने दोन-तीन मनसैनिकांनी त्यास खांद्यावर हात टाकून अज्ञातस्थळी नेले.

रांगेत एक आमसुली कुडत्यातील सदगृहस्थ उभे होते. (त्यांच्या) तोंडावर मास्क नसल्याने आम्ही लागलीच वळखले!
‘साहेब, तुम्ही?’ आम्ही तेथल्या तेथे त्यांना मुजरा केला. त्यांनी आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. आमच्या तोंडावर मास्क होता.
‘क्रियाशील आणि सृजनशील नागरिकांना आमचं आवाहन होतं! तुम्ही कशाला आलात?’ त्यांनी घुश्शात विचारले.
आम्ही निरुत्तर जाहलो. अखेर बऱ्याच वेळानंतर आम्ही हिय्या करुन प्रश्न विचारला : ‘साहेब, एवढे सगळे करुन नेमके करायचे तरी काय?’
…थोडा वेळाने दोन सैनिक येऊन आमच्या खांद्यावर हात टाकून अज्ञातस्थळी घेवोन गेले. पुढले काहीही आठवत नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com