ढिंग टांग : आम्ही काय गुन्हा केला?

Dhing-tang
Dhing-tang

मा. होम्मिनिष्टरसाहेब यांशी पप्पू कंघी ऊर्फ येडा बबन ऊर्फ दढियल डॉन ऊर्फ पम्या ब्रॉयलर ऊर्फ काल्या वडापाववाला याचा तहे दिलसे सलाम. आपन एक साधासिंपल दाखलेबाज असून ‘आपन बरे, आपले गेम बरे’ असे नाकासमोर कामधंदा करनारा जंटलमन हाहो!! आख्ख्या होल बॉम्बेमधे कुटल्याही फोलिस टेशनमधे आपली फोटो लागलेली सापडेल! तसे आपन नाव राखून आहो! मोस्ट वाँटेड आणि फेमस डॉन मा. बब्बू कुत्ता ऊर्फ मिर्चीसेठ याच्या हाताखाली आपन तयार झालो. मिर्चीसेठ बोलायचा : ‘‘पप्पू, पेटी, खोका कोई भी कमाता है, नाम कमाना चाहिए!’’ (भगवान उसकू लंबी उमर दे असे बोलून उपयोग नाही. काही वर्षापूर्वीच त्याची एन्कौंटर झाली! त्याला वडापाव देनाऱ्या पीआयला आपली बददुवा लागंल!) रेहने दो याने की असो! सध्या आपन अंडरग्राऊण्डमधेच असल्या कारनाने डायरेक फोन करन्याची आयडिया केली नाही. उगीच कशाला रिक्स घ्या? हल्ली हे अपोझिशनवाले कोनाचाबी कॉल डेटा काडून पब्लिकमध्ये डिक्लेर करतात. नीट पोष्टाचे लेटर लिहिने सेफ ठरेल, असे आपल्याला मुन्ना बाश्शा (ऊर्फ लाल घोडा) बोलला. मुन्ना आपला रायट हँड आहे, पन घोडा लेफ्ट हँडने चालवतो. आपल्याला आर्जंटमधी आर्जंट लेटर लिहिनेचे कारन का की, सध्या माहौल जाम टाइट आहे. आपल्यासारख्या फ्रीलान्स लोकांना हालचाल करन्याची सोय राहिली नाही.

सध्या सेक्षन गरम आहे, अशी टिप मुन्नाने दिली. सबब आमच्यासारख्या नामचीन चोरदरोडेखोर आणि गुंड लोकांवर बेरोजगारीचा चॉपर कोसळला आहे!! तुमच्या पॉलिटिक्समध्ये आमचा मोफतमधी गेम झाला… गेले संपूर्ण साल लॉकअपमध्ये गेले.सॉरी! लॉकडाऊन म्हनायचे होते. धंदापाणी नरमच होते. आपुन पन अंडरवर्ल्डचा आड्रेस बदलून कुठेतरी रीतसर वडाउसळ, कटवडा, मिसळपावचा गाडा टाकावा का? असे मी मुन्नाला विचारले. मुन्ना बोलला की, ‘‘भाई, ये आपुन के शान के खिलाप है!’’ लॉकडाऊननंतर आत्ता कुठे सगळे ओपन होत असताना अचानक चिवडा झाला!

साहेब, हल्ली टीव्ही लावला किंवा पेपर उघडला तर सगळ्या खबरींमध्ये पोलिसच पोलिस दिसायला लागले हाहेत. एकेकाळी हेच पोलिस एन्कौंटर पेशालिस्ट म्हणून पॉपुलर झाले होते. त्यांच्यावर हिंदी पिच्चर निघाले. आता हेच लोक साईड बदलून आमच्याकडे आले आहेत का? कारने हल्ली साधी गाडी चोरीला गेल्याची केस झाली, तरी पोलिसांवर वहीम येत हाहे. फिरौतीच्या (खंडणी व्हो!) केसमध्येही फोलिसांचीच नावे येत हाहेत. पॅप्सीच्या कांड्या ठिवल्या, फोलिस!! मड्डरचा म्याटर आसेल तरी त्यांचीच नावे घेतली जाताहेत.  हे काय चालू आहे? जनू काही तमाम अंडरवर्ल्ड रातोरात ध्यानधारनेला लागले असून अंडरवर्ल्ड आणि तफास ही दोन्ही डिपार्टमेंट फोलिसांकडेच ट्रान्सफर झाली आहेत! छ्या, मेरे तो दिमाग का धही हो गएला है…

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनच्या आधी सारे काही टिपटॉप चालले होते. अंडरवर्ल्डवाले त्यांचे काम करत होते, फोलिस त्यांची डूटी करत होते. पन नंतर काहीतरी लोच्या झाला, असे दिसते. आमची सर्व कामे फोलिसच करायला लागले तर आमच्यासारख्यांनी कुठे जायचे? हा खरा सवाल आहे, साहेब! तरी अर्जंटमधे पोलिस डिपार्टमेंट लायनीला आनून आमच्यावर कोसळलेला बेरोजगारीचा चॉपर उचलावा, किंवा तपासकामाची सुपारी तरी आम्हाला द्यावी, ही रिक्वेष्ट हाहे. आपला णम्र. पप्पू कंघी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com