ढिंग टांग : रात्रीच्या गर्भात..!

ब्रिटिश नंदी
Thursday, 30 January 2020

मुंबईतील नाइट लाइफ यशस्वी होणे, हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी नितांत गरजेचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे! 

जेव्हा सारे जग झोपी गेलेले असते, तेव्हा स्थितप्रज्ञ जागा असतो. आम्ही स्थितप्रज्ञ क्रमांक दोन आहो! प्रथम क्रमांकाचा स्थितप्रज्ञ बांदऱ्यात कलानगर येथे मुक्‍कामी असतो. गेल्या तीन रात्री आम्ही टक्‍क जागे आहो!! मुंबईत सव्वीस जानेवारीपासून आमची रातपाळी सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील नाइट लाइफ योग्य तऱ्हेने सुरू आहे ना, हे पाहण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. खिशात शिट्टी आणि हातात बारका दंडुका घेऊन ‘जागतेऽऽ रहोऽऽ...’ अशी हाळी देत हिंडण्याची ड्यूटी आम्ही निभावतो आहो. या चाकरीत आम्ही नोंदवलेली निरीक्षणे चिंत्य व मननीय आहेत. ती येणेप्रमाणे :

 

१. मुंबई अहोरात्र जागी असते, हे साफ खोटे आहे. उलटपक्षी मुंबईतील माणसे अत्यंत आळशी व झोपाळू आहेत, असे आमचे मत बनले. ‘रात्रीची मुंबई एंजॉय करा,’ असा (वरून) आदेश असतानादेखील बहुसंख्य माणसे ढाराढूर झोपलेली आम्हाला आढळली. शिट्या फुंकून फुंकून आम्ही त्यांस जागे करुनही काही उपयोग झाला नाही. अशा बेजबाबदार नागरिकांवर सरकारने कडक कारवाई करावी.

२. रात्री दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश असूनही अनेक दुकानदारांनी अघोषित ‘बंद’ पाळल्याचे दिसून आले. हे गंभीर आहे! अशाने व्यापार-उदीम कसा वाढणार? मुंबईतील उद्योगधंदे आधीच गुजराथेत जात आहेत. गुजराथेत नाइट लाइफ नाही, तरीही ते तेथे जात आहेत. याला काय म्हणावे?

३. वरळीतील एका मॉलमध्ये गेलो असता, रात्री दीडच्या सुमारास तेथील गुरख्याने शटर खाली ओढले. ‘‘इधर नाइट लाइफ चालू हय ना?’’ असे त्यास विचारले असता त्याने ‘तुझ्या नानाची टांग’ असे अनुदार उद्‌गार काढून आमचा अपमान केला.

४. मरीन ड्राइव्ह येथील दृश्‍य : तरुणांचे एक टोळके बंदोबस्तावरील पोलिसांनी धरले होते. बहुतेक सर्व तरुणांची तोंडे झोपेने मुरगाळली होती व पोलिस त्यांच्या तोंडावर पाण्याचे हाबके मारीत होते!! त्यांच्यातील प्रातिनिधिक (व त्रोटक) संवाद असा :

‘‘कुटे ऱ्हातो? लायसन काढ...’’ मामाने गुरकावून विचारले.

‘‘ब...ब...बांदऱ्याला!’’ एक झिडपिड्या तरुण. 

‘‘तरी पन हे धंदे? तुझ्या पप्पाला पोलिस टेशनला बोलवू?,’’ मामाने दम दिला.

‘‘जाऊ दे ना...चुकलं! एक बार माफी द्या!,’’ गुरमाळलेल्या अवस्थेतील तो अर्धमेला तरुण.

‘‘जागा ऱ्हा जागच्या जाग! झोपायचं नाय! झोपला की बघतोच तुला..,’’ मामाने आणखी दम भरत त्याच्या चिचुंद्य्रा मुखावर पाण्याचे हाबके मारले. तो झिपरा तरुण रडकुंडीला आला होता.

‘‘रास्सारी जागं ऱ्हायाचं! घरी गेला तर खबर्दार!’’ मामाने त्याला बजावले. तरुण बहुधा ‘हो’ म्हणाला असावा!

५. रात्रभर दुकाने सुरू ठेवण्याची मुभा मिळाल्याने मुंबईतील व्यापारी मंडळी खुश असतील, असा आमचा ग्रह होता. घडले उलटेच! हरेकाच्या तोंडावर वैताग होता. ‘‘इधर दिन में कोई खरीदार आता नै, रातकू च्यालू रखके क्‍या करनेका?’’ असा प्रश्‍न करीत दुकानदार फांके मारत बसलेले आढळले.

६. नाइट लाइफ ही कल्पक योजना यशस्वी होण्याची असेल, तर दिवसा मुंबईतील दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी आमची सूचना आहे. जेणेकरुन जीवनावश्‍यक पदार्थ रात्रीच खरेदी करण्याची मुंबईकरांस सवय लागेल. तसेच हपिसांच्या कामाच्या वेळा रात्री नऊ ते सकाळी सहा अशा कराव्यात.  ...एवढे केले की नाइट लाइफ हमखास यशस्वी होईल, याची खात्री आम्ही देऊ! ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ हा बाणा हवा! शेवटी मुंबईतील नाइट लाइफ यशस्वी होणे, हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी नितांत गरजेचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai night life dhing tang article