ढिंग टांग : साहेबांचा दिल्ली दिग्विजय...!

सकाळच्या प्रहरीच ‘शाही दरबारा’चा सांगावा घेवोन दूत दौडत आला होता. दूताचे नाव वीर विनोद असे होते. तो राजियांच्या वळखीचा होता. अधूनमधून सणासुदीला तो दादरच्या महालावर हजेरीला येत असे.
Dhing Tang
Dhing TangSakal

‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है...’ - जनाब शाहरुख खान : थोर तत्वचिंतक, सुभाषितकार, कवी आणि लोककथानायक.

फाल्गुनातील ती एक सकाळ होती. उन्हे मी-मी नव्हे, तर ‘मैं-मैं’ म्हणत होती. कां की ती उन्हे राजधानी दिल्लीतील होती. दिल्लीतली उन्हे बऱ्याचदा ‘हम-हम’ असेही म्हणतात. गेली नऊ वर्षे ती ‘हुं-हुं’ असेही म्हणू लागली आहेत. अशा उन्हाचे एके दिवशी चांदणे झाले, त्याची ही गोष्ट.

‘राजे सील करा अंगाला,’ सरनोबत नितीनाजी सरदेसायांनी राजियांना सुचवले. ते नेहमीच काहीना काही सुचवत असतात. उद्याच्या महाराष्ट्राचे एकमेव आशास्थान ऊर्फ रणबहादुर अमिताजी शेजारीच उभे होते. त्यांनी खांदे उडवले. राजियांनी वातावरणाचा फील घेऊन सील करण्याचा विचार (मनातून) गंजिफ्रॉकासारखा उपसून फेकून दिला. असल्या उकाड्यात कोण सील करते? भलतेच!!

सकाळच्या प्रहरीच ‘शाही दरबारा’चा सांगावा घेवोन दूत दौडत आला होता. दूताचे नाव वीर विनोद असे होते. तो राजियांच्या वळखीचा होता. अधूनमधून सणासुदीला तो दादरच्या महालावर हजेरीला येत असे. सांगावा असा होता : ‘मान्यवर, न्याहारीची वेळ टळल्यावर माध्यान्ह भोजनाच्या बरेच आधी यावे!’ (म्हंजे दोन्ही खर्च वाचले!! वडा नको, नि मसालेभातही नको!!) सांगावा येताच राजियांनी भराभर आटोपले, आणि ते ६-अ, कृष्ण मेनन मार्गावरील शाही निवासाकडे निघाले. राजियांची स्वारी निघाली आहे, ऐसी खबर शाही निवासात टाकोटाक पोचविण्यात आली. शाही प्रासादावरील प्रहरींनी दक्ष पवित्रा घेतला. स्वारी पोचली. एखादी तरी तुतारी वाजेल, अशी अपेक्षा होती, पण त्याऐवजी शंखनाद ऐकू आला.

‘आवो, आवो, भाई, बेसो!’ खुद्द शहंशाह पुढे येत्साते मोठ्या आवाजात म्हणाले, त्यांनी दोन्ही हात हे अस्से पसरले होते. ‘मोदीजींची लोकप्रियता केवढी?’ असे विचारले तर शहंशाह अस्सेच हात करुन ‘येवढीऽऽ’ असे उत्तर देतात. राजियांनी सोफ्यावरील सुरक्षित जागा पाहोन नाकास रुमाल लावला. (ही आपली एक लकब! कारण काहीही नाही!) शहंशाह तोंडभरुन हसले. उत्तरादाखल राजे किंचितसे हसले. पण रुमाल तोंडास लावल्याने ते कुणाला कळले नाही.

संभाषणातील प्रदीर्घ वाटाघाटी झाल्या त्या अशा :

‘किती द्याल?’ राजे.

‘किती मागता?’ शहंशाह. इथे राजे सावचित झाले. सहा मागाव्यात एकदम! खट्यॅक!!

‘दोन!’ तीन बोटे दाखवून राजे म्हणाले.

‘पती गयो! एकज मिळणार!’ हवेत शून्य काढता काढता शहंशाह म्हणाले.

‘बरं!’ राजे.

‘चोक्कस!’ शहंशाह.

...इथे वाटाघाटी संपल्या. पुढील किरकोळ तपशीलाची बोलणी मुंबईत करुन घ्यावीत, असे शहंशाह यांनी सुचवले. मुंबईतील सुभेदारांना तशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

‘चाय?’ शहंशाह विचारते झाले. आतिथ्य नावाची काही गोष्ट असते की नाही?

‘नको, या एकदा आमच्या शिवाजी पार्कात!,’ राजियांनी आतिथ्याची परतफेड केली. इथे बैठक संपली. राजियांची स्वारी लवाजम्यासकट निघाली. दरबाराबाहेर गाडीत बसल्यावर त्यांनी तोंडासमोरचा रुमाल काढला. मोकळा श्वास घेतला.

‘छान झाली बैठक! बऱ्याच गोष्टी ठरल्या...नाही का?’ ते म्हणाले. गाडीत बसलेल्या सर्वांनी होकार भरला. चालकाने तर दोनदा हॉर्न वाजवला. शहंशाही दूत वीर विनोद यांनी टाळी दिली. थोर विचारवंत-कवी शाहरुख खान यांचे (उपरोक्त) सुभाषित आठवून राजियांना मोठे समाधान वाटले.

...मुक्कामी निघताना राजियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कुणी याचा व्हिडिओ तर काढला नसेल ना? विनाकारण मनस्ताप व्हायचा! वैताग नुसता!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com