ढिंग टांग : दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

ढिंग टांग : दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

‘‘तमे मन नी वात बताऊं?’’, गहिवरलेल्या सुरात परमपूज्य नमोजी म्हणाले. आम्हीही तात्काळ आणि तेथल्या तेथे गहिवरलो.
‘‘बतावो तो..,’’ खिशातून रुमाल काढून सज्ज होत आम्ही म्हणालो.

‘‘आ किसानभाईमाटे मारा दिल बऊ रोए छे!,’’ नमोजीभाईंनी प्लेटीतला ढोकळा उचलत ‘मन नी वात’ सांगितली. सांगताना त्यांच्या घशात आवंढा आला की ढोकळ्याचा घास अडकला, हे चटकन समजू शकले नाही. ढोकळा हा पदार्थ चविष्ट असला तरी लेकाचा पहिल्या घासाला कधी कधी अवसानघात करतो, असा आमचाही अनुभव आहे. घशात अडकणारा हा पदार्थ ज्याने कुणी शोधला असेल, त्याचा गळा बाहेरच्या बाजूने (तरी) आवळता येईल का, असा हिंस्त्र विचार मनात डोकावून गेला. पण तो आम्ही ढोकळ्याच्या घासासोबतच गिळला.

‘‘गेले दोनेक महिने किसानभाई सिंघु बॉर्डरवर घट्ट बसून आहेत! तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही?,’’ आम्ही बावळटासारखे विचारले. आम्हाला कधी कोथिंबीरीची जुडी दहा रुपयांच्या खाली मिळत नाही की मंडईत मटार स्वस्त झाले म्हणून घरी दिवाळी साजरी होत नाही. तरीही शेतकरीराजासाठी आमचे मध्यमवर्गीय शहरी मन रडतेच.

‘‘कॉण कहे छे के हूं वात नथी करतो? मैं मेरे किसानभाईयों से सिर्फ एक फोन कॉल की दूरीपर हूं!!,’’ नमोजींनी ढोकळ्याचा दुसरा ठोकळा उचलला. या पदार्थाचे मूळ नाव ठोकळाच असले पाहिजे, असा एक व्युत्पत्तीशास्त्रविषयक प्रश्न मनात डोकावला. ढोकळ्याचे एवढे मोठे मोठे चौकोनी तुकडे हलवाई मंडळी कां करतात? हा आमच्या संशोधनाचा विषय आहे. एकाच घासात तो भलामोठा ठोकळा घशात कोंबण्याच्या प्रयत्नात तोठरा बसून जीव घाबरा होतो. ‘लहान तोंडी मोठा घास’ म्हणतात ते हेच असणार, असाही विचार मनात डोकावला. पण तोही आम्ही निमूटपणे ढोकळ्याच्या घासासोबतच गिळला.

‘‘एक फोन कॉल की दूरी! व्वा, क्‍या बात है!’’ आम्ही मन:पूर्वक दाद दिली. अंतर मोजण्याचे हे एकक आम्हाला आजवर माहीत नव्हते. आम्ही आपले फूट, गज, मीटर, फर्लांग, मैल-किलोमीटर (फार्तर प्रकाशवर्षे) यातच अडकलेले!! अमूक अमूक इसम दोन फोन कॉल अंतरावर राहातो किंवा फलाणी फलाणी व्यक्ती तीन फोन कॉल अंतरावर उभी आहे, असे आम्ही कधी ऐकले नव्हते. ‘‘आजच बुकिंग करा, आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा... रेल्वे स्टेशनपासून अवघ्या अर्ध्या फोन कॉलच्या अंतरावर...’’ अशी बिल्डराची जाहिरातही कधी बघण्यात आली नव्हती... अज्ञान, अज्ञान म्हणतात ते हेच! ‘‘हां, हां! जस्ट वन फोन कॉल! म्हणून तो मी फोनजवळ चोबीसो घंटा बसलेला असतो,’’ शेजारी ठेवलेल्या फोनकडे बोट दाखवत नमोजींनी आत्मविश्वासाने सांगितले. ‘‘तुम्हीच करत का नाही किसानांना फोन? बिचारे आपापल्या घरी तरी जातील!’’ आम्ही भाबडेपणाने म्हणालो.

‘‘अरे, त्यांज प्रोब्लेम छे! इथे फक्त इनकमिंग च्यालू आहेत! आऊटगोइंग बंद!’’ नमोजींनी त्यांची अडचण सांगितली. सिंघु बॉर्डरवरल्या किसानभाईंची पण हीच अडचण असणार हे आम्ही ताडले. अन्यथा गेल्या सहासष्ट दिवस सतरा तास आणि त्रेचाळिस सेकंदाच्या विरहकाळात कुणीतरी कुणालातरी फोन केलाच असता... आले, या फोनच्या जाळ्याने जग किती जवळ आले आहे!! ‘‘जिओ!’’ आम्ही मन:पूर्वक दाद देत आणखी एक ढोकळ्याचा ठोकळा उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com