esakal | ढिंग टांग : आत्मनिर्भर वि. आत्मनिर्भय..!
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

ढिंग टांग : आत्मनिर्भर वि. आत्मनिर्भय..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (रणमर्दाच्या आवेशात)

ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम फ्रंट!

मम्मामॅडम : (चमकून) आयॅम फ्रंट म्हंजे?

हे काय नवीन?

बेटा : (खुलासा करत) आयम बॅक असंच म्हणायचं होतं मला! पण मी बॅक कधीही जात नसतो, फ्रंटलाच असतो! मम्मा, हे जग म्हंजे रणभूमी आहे, आणि या रणभूमीवर सगळे योद्धेच आहेत! प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र युद्धाचा प्रसंग आहे!

मम्मामॅडम : (काळजीनं) तुला भूक लागली का?

बेटा : (निक्षून) माझी तहानभूक हरपली आहे, मम्मा!

मम्मामॅडम : (सावध होत) कुठल्या युध्दाचा ज्वर चढला आहे तुला? सध्या तर कुठे निवडणुका नाहीत!

बेटा : (त्वेषाने काल्पनिक तलवारीचे हात हवेत करत)…लढो! जीतो! तुम मुझे तुम्हारी बहादुरी दो, मैं तुम्हे मोदीजीसे आजादी दूंगा!

मम्मामॅडम : (खचलेल्या सुरात) गेली साताठ वर्षं त्याच आजादीसाठी जंग जंग पछाडतेय! पण आपलं सैन्य आहे कुठे जागेवर?

बेटा : (काल्पनिक तलवार म्यान करत) मी परवा आपल्या पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगून टाकलं!

मम्मामॅडम : (हादरुन) ओह गॉड! आता काय सांगितलंस?

हेही वाचा: रावसाहेब कसबे यांची 'मसाप'च्या अध्यक्षपदी फेरनिवड

बेटा : (कर्तव्यकठोर आवाजात) मी म्हटलं की मला शूरवीर कार्यकर्ते हवे आहेत! जे मोदीजींना घाबरतात, त्यांनी आत्ताच्या आत्ता पक्ष सोडून जावं! डरपोकांसाठी हा पक्षच नव्हे! हा शूरवीरांचा, धाडसी योध्द्यांचा, नीडर नेत्यांचा पक्ष आहे! तळहाती शिर घेऊन मग आमच्या पक्षात या!! डरो मत!!

मम्मामॅडम : (दुप्पट हादरुन) देवा रे देवा! अरे, अशानं कुणीच उरणार नाही ना आपल्या पक्षात! त्यांना न घाबरणारं कोण उरलंय आपल्या पार्टीत, अं?

बेटा : (छातीवर मूठ आपटत) मी आहे ना!

मी कोणालाही डरत नाही!

मम्मामॅडम : (कौतुकानं) डरेंगे तुम्हारे दुश्मन!!

बेटा : (स्फुरण चढून) डरतातच! मी एक साधा ट्विटरचा बाण सोडला की घाबरगुंडी उडते लेकाच्यांची!! ट्विटरवर मी एवढा इफेक्ट देऊ शकतो, तर प्रत्यक्ष मैदानात उतरलो तर काय होईल, जरा सोचो!!

मम्मामॅडम : (भिवई वक्र करत) मी तरी कुठे डरतेय? पण आपले नेते सध्या घाबरले आहेत त्याचं काय? त्यांना धीर द्यायला हवा! आपण या पक्षात सुरक्षित आहोत, हा दिलासा कुणीतरी त्यांना द्यायला हवा!

बेटा : (अभिमानाने) मी आहे ना! मी देईन धीर!

हेही वाचा: एक पावसाळी रात्र अन् होत्याचं नव्हतं झालं... गोरसे कुटुंबावर शोककळा

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त आवाजात ) भीती तुझ्या मोदीजींची नाही, ईडीची आहे!! जरा काही विरोधात बोललं की हे मेले चौकशा मागे लावतात! अशानं कशी टिकणार…लोकशाही?

बेटा : (तुच्छतेने) खऱ्या रणमर्दाला ईडी काय, सीबीआय काय सगळं सारखंच! मी तर जगात कोणालाच घाबरत नाही! एकबार मैंने कमिटमेंट कर ली, तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता!

मम्मामॅडम : (संशयानं) हा सलमान खानचा डायलॉग आहे!

बेटा : (बेफिकिरपणे) कोणाचा का असेना!

हेही वाचा: नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) खरंच शूर आहेस हो तू! भरपूर कष्ट करुन आपल्या पक्षाला धाडसी आणि शूरवीरांची पार्टी बनव! त्यांची आत्मनिर्भरता, तर आपली आत्मनिर्भयता!! ओके?

बेटा : (खांदे उडवत) मी कशाला करु? मी कुठे तुमच्या पार्टीचा प्रमुख आहे? मी तर पदाधिकारीसुद्धा नाही! मैं तो चला! बाय बाय!!

loading image