ढिंग टांग : कचाकचा आणि वचावचा!

वसाडगावच्या इलेक्शनीला बोलतुया गबरु वचावचा आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो, बटण दाबा कचाकचा!
Dhing tang
Dhing tangsakal

वसाडगावच्या इलेक्शनीला

बोलतुया गबरु वचावचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा!

परचाराचा नारळ फुटला,

चला निघा रं सटासटं

उन्हातान्हाचं फिराया लागंल,

टोपी, गॉगल, बुटंगिटं!

जीभ चालवा तरवारीगत

मावा थुंका पचापचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥१॥

आठशे फटफट्या, नऊशे कारं,

घेऊन संगट जिपागिपा

चला गड्यांनो, करु रोडशो

अंतर कापा झपाझपा

टरक भरु द्या, बशी भरु द्या

गर्दी होऊ द्या खचाखचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥२॥

इकडम तिकडम क्येलं तरी बी

हात रिकामं हाईत गं

कायबी करुन कसंतरी करुन

मतं जमवायची हाईत गं

घराघरातून भाईर निघा हो,

बोला काई बी मचामचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥३॥

उचल जीभ ती तुझीच मर्दा,

खुशाल लाव तू टाळ्याला

तुझ्या जिभंला न्हाईच हाडुक

ब्यांडेज कर की बोटाला

बोट चालवून व्होट पाड गा,

जानून घ्या तुमी खाचाखोचा

आयाबायांनो, बुढ्या-बापांनो,

बटण दाबा कचाकचा ॥४॥

बटण दाबता होईल मर्दा

चिमित्कार लोकशाहीचा

विकासगंगा दारी येईल

पैका वाहील दिल्लीचा

चर्चा होऊ दे, खर्च होऊ दे

भरुन घ्या तुमी खिचा खिचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥५॥

सैल जिभेला न्हाई अडसर

फुका वाहतो ह्यो नाला

इलेक्शनीच्या दिवसामंदी

असाच चाले ह्यो काला

हापशीवरलं भांडान समजुन

खोचून घ्या तुमी ओचाकोचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो

बटण दाबा कचाकचा ॥६॥

वैनी, दादा, अण्णा, बापू

मामा, मामी, अन ताई

मुळीच हयगय करु नका हो,

बोटाला तुमि लावा शाई

भावकी गावकी ठिवा बाजूला,

महाशक्तीचा परवचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥७॥

ग्रामीन ढंगाची बोली ही

इलेक्शनीचा ग्रामीन बाज

रनमर्दाचा रुबाब भारी,

एक नंबरी तिकडंबाज

भाकरटुकड्या संगट फक्कड

मिरचीचा ह्यो ठेचा ठेचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥ ८॥

कसली घेऊन बसलाय देवा

आचार संव्हिता कसलं काय!

पुढं होऊनि हाण रं गणप्या

लोकशाहीचा फाटक्यात पाय

होर्डिंगावर आपुलं सायेब,

मतदार रडतुया ढचाढचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥९॥

कचाकचा अन वचावचा ही

निवडणुकीची उसाभर

या बोटाची, त्या बोटावर

थुंकी राहिना हो पळभर

उगाच गमजा करु नका हो,

मतदार न्हाई लेचापेचा

आयाबायांनो, बुढ्या-बाप्यांनो,

बटण दाबा कचाकचा ॥१०॥

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com