ढिंग टांग : आम (आदमी) की बात..! (‘कॉमन मॅन्स प्रिझन डायरी’ या आगामी चरित्रातून...)

डाव्या दंडाच्या बरोब्बर वरच्या भागावर बसलेला नव्वदाव्वा मच्छर मारताना पहाटेच जाग आली. सामान्य माणसाला डास भयंकर चावतात, हा या देशातला दु:खद अनुभव आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal

डाव्या दंडाच्या बरोब्बर वरच्या भागावर बसलेला नव्वदाव्वा मच्छर मारताना पहाटेच जाग आली. सामान्य माणसाला डास भयंकर चावतात, हा या देशातला दु:खद अनुभव आहे. जाग येतायेताच वॉर्डनने गजांवर दांडके थडथडथडथड घासटत मॉर्निंग अलार्म वाजवला. गजांवर दांडके आपटून राजबंद्यांना जागे करण्याची ही फिल्मी पद्धत रद्द केली जावी, अशी शिफारस (बाहेर आलो की) मी करणार आहे. अत्यंत अमानुष चाल आहे!!

दात घासताना एका सहबंदीवानाने गुडमॉर्निंग केले. मला तो आगाऊपणा वाटला. सदरील सहबंदीवान बारा घरफोड्या करुन इथे आला आहे. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांनी कमळ पक्षात जावे, त्यांचे इथे काय काम? मी उलट गुडमॉर्निंग केले नाही.

बराकीत सकाळीच गडबड उडाली. माझ्या कोठडीसमोर आंब्याच्या कोयी आणि साले पडलेली आढळली. जेलमध्ये आंबे कुणी खाल्ले? असा हलकल्लोळ झाला. वॉर्डन म्हणाला, ‘‘झाडू लेकर साफ करो!’’ मी स्पष्ट नकार दिला. म्हणालो, ‘मी आंबा खाल्ला नाही, मी साले उचलणार नाही!’

आंबा मिळणे आणि खाणे हा आम आदमीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो अधिकार गाजवण्यासाठी मी आंबा खाणारच.

सकाळच्या वेळी माझी रक्तशर्करा किंचित पडते. चहासोबत दोन-तीन ग्लुको बिस्कुटे खावीच लागतात. पण इथे ती मिळत नाहीत. (बाहेर आलो की) सर्व कारागृहांमध्ये बंदीवानांना बिस्कुटे मिळालीच पाहिजेत, असा प्रस्ताव पारित करुन घेईन. गेल्या आठवड्यातच मी वकिलांशी बोललो. सकाळच्या न्याहरीला दोन-तीन आंबे मिळाले तर हा धोका टळेल, हे वकिलांना सांगितले. ते चपापले. सध्या आंब्याची पेटी बाराशे रुपये डझन आहे, असे त्यांनी माझ्या कानात सांगितले. मी म्हटले असूदे, बाराशे तर बाराशे! पॅथॉलॉजी लॅबच्या बिलापेक्षा कमीच होईल.

याचा अर्थ सरासरी शंभर रुपयाला एक आंबा पडतो. (पडतो म्हणजे निवडणुकीत पडतो तसा नाही, रेट पडतो तसा.) आम आदमीला एक आम शंभर रुपयांना पडतो, ही काही आम बात नाही. (बाहेर आलो की) प्रत्येक दिल्लीकराला उन्हाळ्याच्या दिवसात किमान एक डझन आंबे मोफत द्यायची घोषणा करणार आहे. मोहल्ला क्लिनिकप्रमाणेच गल्लोगल्ली आंबे विक्री केंद्र दिल्ली सरकारतर्फे उघडण्याची योजना आखली जाईल. शेवटी आपली ‘आम आदमी पार्टी’ आहे. जनतेला आम नाही द्यायचे तर काय रेवड्या द्यायच्या?

कैदी नंबर ६७०ला (पक्षी : मीच) वैद्यकीय कारणास्तव रोज दोन-तीन आंबे द्यावेत, अशी विनंती आम आदमी पक्षातर्फे जेलरसाहेबांना करण्यात आली.

जेलरसाहेबांनी ‘हो, हो, पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी रत्नागिरीहून मागवतो,’ असा उलटा निरोप पाठवला. ते उपरोधाने बोलले असावेत, कारण ही फळे मला मिळालीच नाहीत. आम आदमीला (जेलात) साधा आंबा मिळत नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

दुपारी वकीलसाहेब इंडिया आघाडीचा निरोप घेऊन आले. मला आंबे मिळत नाहीत, हे ऐकून खर्गेजी, राहुलजी, तेजस्वीजी, अखिलेशजी, आदींनी आंबा खाणे सोडून दिले आहे, असे कळले. माझा कंठ दाटून आला. आंब्याचा त्याग करणाऱ्या माझ्या या सहकाऱ्यांना माझे वंदन असो. वकीलसाहेबांनी येताना एक केसर आंबाही आणून दिला. म्हणाले, गवतात ठेवा, दोन दिवसात पिकेल!! आता कारागृहात गवत कुठून आणायचे? जाऊ द्या.

मोदीजींनी कुठे नेऊन ठेवलाय हा देश? क्या आम आदमीने आम खानेही नही चाहिए? केवळ या एका आंब्याच्या राष्ट्रीय समस्येपायी मोदीजींचे सरकार उलथून टाकले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com