ढिंग टांग : जाहीरनामे : एक समीक्षा!

वाचकहो, तुम्ही एक रसिक वाचक आहा, परंतु, तुमचे वाचन तितकेसे बरे नाही, असे सखेद म्हणावे लागते.
Dhing Tang
Dhing Tangsakal

वाचकहो, तुम्ही एक रसिक वाचक आहा, परंतु, तुमचे वाचन तितकेसे बरे नाही, असे सखेद म्हणावे लागते. चोखंदळ वाचक असूनही तुमच्या हाती आजवर कुठल्याही पक्षाचा निवडणूक जाहीरनामा लागलेला नाही. आवडलेली पुस्तके मित्र अथवा ग्रंथालयातून आणून परत न करणे, हा चोखंदळ वाचक असल्याचा एक निकष असतो. आवडीने जाऊन तुम्ही विशिष्ट पक्षाचा जाहीरनामा घेऊन आलात, आणि संग्रही ठेवला, असे कधी झाले आहे का? आम्ही पैजेवर सांगतो की त्रिवार नाही!!

किंबहुना, निवडणुकीचा जाहीरनामा अथवा वचननामा अथवा संकल्पपत्र अथवा जे काही असते, ते नेमके कोण वाचते, हाच आमचा गहन प्रश्न आहे. एखाद्या पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे काय होते, हा आणखी एक गहन उपप्रश्न आहे. हे प्रकरण नेमके काय असते, हे आपल्या देशातील ९७ कोटी मतदारांना नीटसे माहीत नसणार, याची आम्हाला खात्री आहे.

पक्षाचा जाहीरनामा ही एक काल्पनिक वस्तू असून तिचे फक्त थाटामाटात प्रकाशन होते, पण त्याच्या प्रती कधीच छापल्या जात नाहीत, असा एक समज समाजामध्ये पसरलेला आढळतो. त्यात काही प्रमाणात तथ्य असावे! सदरील जाहीरनामा साधारणपणे पुस्तक किंवा चोपडे किंवा मासिकासारखा दिसतो, असे म्हणतात. कां की, प्रकाशनाच्या समारंभात थोर्थोर नेत्यांच्या हातात तशी प्रत दिसून येते. त्यास रंगीत मुखपृष्ठ असते.

मुखपृष्ठावर छान छान छायाचित्रे असतात. ती प्राय: राजकारण्यांचीच असतात, आणि सत्ताधारी पक्षाचा जाहीरनामा असेल तर, हसतमुख असतात. विरोधी पक्षाचा असल्यास चेहरे आंबट असू शकतात. सर्वच राजकीय पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करतात, असे नाही.

काही काही पक्ष असले काहीही न करता निवडणुका लढवतात. आमच्या माहितीतील एक पक्ष तर केवळ जाहीरनामा काढावा लागू नये, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या युतीत सामील झाला. एका पक्षाने तर जाहीरनाम्याची कटकट नको म्हणून निवडणूक लढवण्याचे टाळले!!

जाहीरनामा खरोखर छापला जातो, ही बाब मात्र खरी आहे. ती काही वाटते तितकी काल्पनिक गोष्ट नव्हे. अशा जाहीरनाम्याची दिवाळी अंकासारखी गुळगुळीत छपाई असते. (मूल्य मात्र नसते, कारण ते नसतेच!!) तथापि, मुखपृष्ठावर एखादा छानसा नटीचा फोटो मात्र नसतो. तशी पद्धत नाही. अन्यथा तो पंचवार्षिक दिवाळी अंकच होणार नाही का? तर ते असो.

वाचकहो, राजकीय पक्षाचा जाहीरनामा ही एक दिवाळी अंकांइतकीच महत्त्वाची सांस्कृतिक गरज आहे. यामध्ये प्रतिभेचे विविध आविष्कार पानोपानी सांपडून येतात. जाहीरनामा वास्तवात असला तरी त्यातील मजकूर प्राय: काल्पनिक असतो, हे नमूद केले पाहिजे.

एखाद्या कादंबरीकारालाही लाजवेल, अशी अद्भुत काल्पनिकाची सफर हे जाहीरनामे घडवून आणतात. त्यातील काही कविकल्पना पाहून तर मोठमोठे कविवर्य आपला मूळचा धंदा सोडून मंगलाष्टके लिहून पोटे भरु लागतील, असा विश्वास आम्हाला वाटतो. विनोदी मजकूर तर पानोपानी इतका विखुरलेला असतो की वाचक वाचून वाचून हसत हसत गडाबडा लोळतात.

वानोळा म्हणून आपण सत्ताधारी पक्षाच्या संकल्पपत्राकडे पाहू. गॅरंटी हे या अंकाचे सूत्र आहे. दिवाळी अंक जसे, रहस्यकथा विशेषांक, खिडकीचित्रे विशेषांक असतात, तसेच हे केंद्रीय सूत्र आहे. गगनयान, विकसित भारत, तीन कोटी घरे वगैरे विविध फँटसी हाताळल्या गेल्या आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कवितांवर भर दिसतो, तसेच चुटकुल्यांची संख्या जास्त दिसते. महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये वगैरे विनोदी कथा फार रसाळ उतरल्या आहेत. तर ते असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com