ढिंग टांग : एका निसर्गप्रेमीचे अरण्यरुदन...!

नेपतीच्या झुडपात खसफस झाली. (नेपती ही एक वनस्पती असावी, असा एक प्राथमिक अंदाज आहे. ही वनस्पती प्राय: शिकारकथांमध्ये आढळते.) वाघाचे मुस्कट दिसू लागले.
Dhing Tang
Dhing Tangsakal

नेपतीच्या झुडपात खसफस झाली. (नेपती ही एक वनस्पती असावी, असा एक प्राथमिक अंदाज आहे. ही वनस्पती प्राय: शिकारकथांमध्ये आढळते.) वाघाचे मुस्कट दिसू लागले. गेले दोन-चार तास हा वाघ झुडपात बसून आराम करत असावा. (वाघ गुहेत-बिहेत राहात नाहीत. दरवेळी गुहा कुठून आणणार? आपली झुडपे बरी!!) पाणझरीच्या दिशेने डुलत डुलत तो निघाल्याबरोबर अर्जुनाच्या वृक्षावर बसलेली वानरांची टोळी अस्वस्थ झाली.

त्यातील कानतुट्या अल्फा नराने खर्रर्र खक..खक असा आवाज घशातून काढून परिसरातील अन्य वन्यप्राण्यांना सावध केले. (वानरे ‘खर्रर्र खक…खक’ असा अलार्म कॉल देतात, हेदेखील आम्ही शिकारकथांमध्येच किंवा रा. मारुती चितमपल्ली यांच्या वनसाहित्यात वाचले आहे. (खर्रर्र..खक..असा मावा अथवा गुटखा अथवा खर्रा खाल्यासारखा आवाज वानरे का काढतात, हे अद्याप आम्हाला समजलेले नाही. असो.) एक मुकणा मोर उगीचच उडाला.

(बिनपिसाऱ्याच्या अगदीच ‘हे’ दिसणाऱ्या भुंड्या मोरास मुकणा असे म्हणतात. हेही आम्ही चितमपल्लीसाहेबांकडूनच शिकलो.) काळवीटे उधळली. नर काळवीट हा कितीही तरणाबांड आणि शूरवीर असला तरी तो सर्वात चपळतेने धूम ठोकतो. पळण्यात कसले आले आहे शौर्य? पण ते जाऊ दे.

सदरील कंटाळलेला वाघ हा वास्तविक ताडोबा-अंधारी प्रकल्पातील ‘टी-४’ नावाचा वाघ होता, हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखावे! वंदनीय वने तथा सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर्जी मुनगंटीवारसाहेबांच्या अहर्निश प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली, त्यापैकी एक ‘टी-४’ होय!! म्हणून ‘टी-४’ ला वन्य प्राणीजगतात ‘भाऊसाहेब’ असे म्हणतात. आपणही त्यास भाऊसाहेबच म्हणू बरे का!

…तर भाऊसाहेब पाणझरीकडे निघाले असताना अचानक त्यांना माणसाचा कडका लागला. (आपण मराठीत चाहूल म्हणतो, हे शिकारकथावाले कडका म्हणतात. का? देवाला ठाऊक, च्यामारी!) म्हंजेच कुठून तरी माणसाचा वास आला. आसपासच्या झाडांवर मचाण बांधून काही रिकामटेकडे चोरटे शिकारी बसलेले असतात, हे भाऊसाहेबांनी पाहून ठेवले होते. चोरट्या शिकाऱ्यांना इंग्रजीत ‘पोचर’ म्हणतात.

कुठलाही पोचपाच न ठेवता बेधडक बंदूक चालवणारे ते पोचर्स!! पण भाऊसाहेबांचा अंदाज चुकला. हा पोचरचा कडका नव्हता. बेहड्याच्या विशाल वृक्षाखाली एक मानवी आकृती स्फुंदून स्फुंदून रडत बसली होती. भाऊसाहेब हे वाघ असले तरी सहृदय आहेत. पंजाचा आवाज न करता ते जवळ गेले. पाहातात तो काय! साक्षात मुनगंटीवारसाहेबच झाडाखाली बसून अश्रू की हो ढाळत होते. आसपास इतर वन्यप्राणी जमून त्यांचे सांत्वन करत होते.

‘ये दिल्लीवाले ऐसेही दुष्ट होते है! किसी की सुनते नही,’ मध्य प्रदेशच्या जंगलातून आलेला एक उपरा वाघ उगीचच बोलला.

‘वी विल मिस यू...डिअर,’ एका हरिणीने मान वेळावून म्हटले.

‘पुन्हा येणार न्याओ?,’ एक मोर केकावला. असं बरंच काही झालं.

‘तरी मी त्यांना परोपरीनं सांगत होतो, मी वाघनखं आणतोय, तलवार आणतोय, एक कोटी झाडं लावतोय, फेस्टिवलं करतोय, पुतळे बांधतोय, मला नका पाठवू दिल्लीला! तिथं आहे काय दगडं? ना जंगल, ना संस्कृती!,’ स्फुंदत स्फुंदत मुनगंटीवारजी म्हणाले.

‘जिम कॉर्बेट अभयारण्यात वाघ कमी झाले आहेत, आणि कुनो अभयारण्यातले चित्तेही नीट पैदास करत नाहीत, म्हणे! तुम्ही केंद्रात वनमंत्री होणार, हे लिहून घ्या माझ्याकडून!,’ टी-४ उर्फ भाऊसाहेबांनी त्यांना ब्रेकिंग न्यूज दिली.

‘खर्रच?,’ मुनगंटीवारजी खुदकन हसले. त्यावर भाऊसाहेब म्हणाले, ‘अर्थात, कालच तुमचे फडणवीसनाना भेटले होते, त्यांनीच सांगितलं!’

…मुनगंटीवारजींनी पुन्हा डोळ्याला रुमाल लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com