ढिंग टांग : तिकिटवाटप चालू आहे...!

प्रिय माजी मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी सविनय जय महाराष्ट्र. फारा दिवसात आपली गाठभेट नाही. एकेकाळी आपण एकत्र होतो, तेव्हाच्या मधुर आठवणींवर अजूनही जगतो आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal

प्रिय माजी मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी सविनय जय महाराष्ट्र. फारा दिवसात आपली गाठभेट नाही. एकेकाळी आपण एकत्र होतो, तेव्हाच्या मधुर आठवणींवर अजूनही जगतो आहे. तो बटाटेवडा (दोन,) तो साबुदाणा वडा (दोनच), किंवा मस्तपैकी कोळंबी (मोजून पाच)…आहा! अजूनही जिभेला पाणी सुटते. नवल असे वाटते की आपली इतकी मैत्री होती, तरी आपण एकत्र सिनेमाला कसे गेलो नाही? परवाच ‘स्वतंत्रतावीर सावरकर’ हा चित्रपट मी बघितला. तुमची खूप आठवण आली. इतकी की पॉपकॉर्न खायचे विसरुनच गेलो!

ऐन निवडणुकीच्या आणि जागावाटपाच्या धामधुमीत मी सिनेमा बघण्यात वेळ घालवतो आहे, हे ऐकून तुम्ही हैराण झाला असणार. (आमच्या पक्षातल्या लोकांचे तर तीन तास तोंडचे पाणी पळाले होते.) पण हा चित्रपट पाहात पाहात मी तीन जणांचे तिकिट कापले, आणि अन्य दोघांना दिले!! रणदीप हुडा नावाच्या एका अभिनेता-दिग्दर्शकाने हा चित्रपट निर्माण केला आहे. हुडाचा चित्रपट मी हुडी घालून बघायला गेलो, अशी शाब्दिक कोटी तुम्ही करणार, हे मला ठाऊक असल्याने आधीच हसून घेतले!! असो.

बाय द वे, हा चित्रपट तुम्ही तुमचे नवे मित्र श्रीमान राहुलजी गांधी यांना आवर्जून दाखवा. मी तिकिटे काढून देतो, शिवाय पॉपकॉर्नचासुद्धा खर्च करतो. इंटर्वलमध्ये सोडालेमन किंवा समोसा हवा असेल तर खुर्चीशीच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. पण संधी सोडू नका. राहुलजींनादेखील चित्रपट आवडेल, याची खात्री वाटते. तिकिटवाटप कधी करायचे ते सांगा, सध्या तिकिटांच्याच धामधुमीत आहे. सिनेमाची दोन तिकिटे महाग नाहीत. -लग्नात मुंज!! काय म्हणता? धन्यवाद.

आपला माजी मित्र. नानासाहेब फ.

ता. क. : एक एप्रिलच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!

नाना-

अत्यंत आगाऊपणाने तुम्ही पाठवलेले चिठोरे मिळाले! वाचून बोळा करुन कचरापेटीत टाकून दिले, आणि कचराही ताबडतोब जाळून टाकला!! असले छछोर, ऐय्याश उद्योग केले नाहीत तर बरे होईल!! सिनेमे बघताहेत लेकाचे!! उद्या, फुकट बघायला मिळाला तर कनात वर करोन तमाशाचा फड रंगवावयासही जाल! तुमच्या नादी लागतो कोण?

लोकशाहीच्या छाताडावर थयथय नाचणाऱ्या राक्षसांनो, गद्दारांना कडेवर घेवोन कितीही नाचलात तरी अखेर सरशी आमचीच होणार हे ध्यानी ठेवा. घोडामैदान दूर नाही. तुम्हा विश्वासघातक्यांना चारी मुंड्या चीत करुन पदच्युत केले नाही तर उधोजी नाव लावणार नाही!! तुमचे चिठोरे वाचण्यापूर्वीच मी राहुलजींना ‘सिनेमाला येताय का, तिकिटे काढतो’ असे विचारले होते. पण त्यांनी ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटाची तिकिटे अगोदरच काढली होती. असो.

थिएटरात जावोन नाटक-सिनेमे बघण्यात वेळ वाया दवडणे आम्हांस परवडणारे नाही. आम्हाला लोकशाहीची चिंता आहे. या लोकशाहीचे तुम्ही जे वाटोळे केले आहे, ते आम्हाला सुधरायचे आहे. यापेक्षा, आमची तिकिटे काढण्यापूर्वी तुम्हीच मणिपूरला जाऊन या. तुमच्या जाण्यायेण्याचा, तेथील राहण्याचा खर्च मी करतो.

बॉलिवुडमधला कुणीतरी निर्माता (किंवा निर्माती?) गाठून ‘मणिपूर फाइल्स’ हा चित्रपट काढा, आणि तोही तुम्हीच (पॉपकॉर्न खात) बघत बसा!! प्रॉडक्शनचा खर्च मी करणार नाही. तिकिट हवे तर काढून देईन. तेवढ्यासाठी पतपेढीचे कर्ज काढीन, पण तुम्हाला स्पॉन्सरशिप देईन! तुमची सेन्सॉरशिप आणि आमची स्पॉन्सरशिप…होऊन जाऊ दे सामना! (ही शाब्दिक कोटी आत्ताच सुचली. कशी आहे? कळावे.) तुमची तिकिटे तुम्हालाच लखलाभ!

तुमचा कडवट शत्रू. उधोजी.

ता. क. : तुम्हाला ३६५ दिवस एक एप्रिलच्या शुभेच्छा! ज्जाव!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com