ढिंग टांग : महायुतीची टिफिन बैठक...!

फक्त आणि फक्त मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नानासाहेब, दादासाहेब आणि भाईसाहेब एकत्र आले.
Dhing Tang
Dhing Tangsakal

स्थळ : अज्ञात. वेळ : लंच टाइम. पदार्थ : फर्मास.

फक्त आणि फक्त मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नानासाहेब, दादासाहेब आणि भाईसाहेब एकत्र आले. एकत्र जेवल्याने एकोपा वाढतो आणि जेवणही चांगले पचते, असे आयुष मंत्रालयाने मध्यंतरी पत्रक काढून कळवले होते. त्यानुसार बेत ठरला. अब आगे.

दादासाहेब : (नाराजीनं) किती वेळ थांबायचं अजून? पोटात कावळे कोकलायला लागले! गेले तीन-चार दिवस गरागरा फिरतोय नातेवाईकांसारखा! पोटात अन्नाचा कण नाही...उघडा की डबे!

भाईसाहेब : (गोळी चघळत) काय घाई आहे? मी दुपारचं जेवण रात्री अडीचला घेतो!! आणि रात्रीचं दुपारी! कारण मी लोकांमध्ये फिरणारा लोकांचा नेता आहे, काही लोकांसारखा घरात बसून राहणारा नाही!!

दादासाहेब : (खोल आवाजात) ह्या: आधीच ॲसिडिटी झाली आहे! तुमच्या चंदूदादांनी पुण्यात मिसळ खायला लावली!

नानासाहेब : (घाईघाईने खोलीत प्रवेश करत) सॉरी! थोडा उशीर झाला! आमच्या गडकरीसाहेबांनी थांबवून घेतलं होतं!

दादासाहेब : (दचकून) म्हंजे तुम्ही जेवूनच आला की काय?

भाईसाहेब : ते पुन्हा जेवतील! पुन्हा जेवतील! पुन्हा जेवतील!!

नानासाहेब : (संकोचून) मी फक्त दोन प्लेट पोहे, एक प्लेट साबुदाणा वडा आणि बशीभर खिचडी एवढंच खाल्लंय!!

दादासाहेब : (कातावून) उघडा हो डबे आता!!

नानासाहेब : (घड्याळाकडे बघत) थोडं थांबू या! शिवाजी पार्काचे साहेब निघाले आहेत! ते आले की सुरु करु आपली टिफिन बैठक!!

भाईसाहेब : (उत्साहाने) मी ठाण्याची मिसळ आणली आहे टिफिनमध्ये! एकदा खाऊन बघा, केवळ या मिसळीसाठी मी हा मतदारसंघ सोडणार नाही कधीच!!

नानासाहेब : (पिशवीतून डबा काढत) हे घ्या, आमचं नागपुरी भोजन!

दादासाहेब : (डब्याचा आकार पाहून) बापरे! याला डबा म्हणायचं की खोका?

भाईसाहेब : (रागावून) खोक्याचा उल्लेख केलाच पाहिजे का? तुम्ही काय आणलंय डब्यात ते सांगा!

नानासाहेब : (मध्यस्थी करत) भांडू नका रे एवढ्या तेवढ्यावरुन! आता आपण एकत्र आलोय, तर गुण्यागोविंदाने डबा खाऊ!! टिफिन बैठकीनं एकोपा वाढतो, असा आमचा पक्षातला अनुभव आहे! आमचे बावनकुळेसाहेब तर निवडणुकीच्या काळात इतक्या ठिकाणी टिफिन बैठका घेतात की, दोन महिन्यात त्यांचं वजन वाढतं!!

भाईसाहेब : (उत्साहाने माहिती देत) मीसुद्धा आमच्या पक्षात टिफिन बैठक सुरु करणार आहे! रोज रात्री अडीच वाजता!!

दादासाहेब : (नाराजीनं) जेवण असो वा राजकारण, वेळच्या वेळी करावं! वेळ निघून गेली की अपचन होतं!! (खोल आवाजात) वेळ चुकली की काय करावं लागतं, ते माझ्याकडे बघून शिका!!

भाईसाहेब : (विषय बदलत) आपल्या चौथ्या भिडूची वाट बघायची की सुरु करायचं? आपलं गतिमान सरकार आहे! मिसळ थंड होतेय...

नानासाहेब : (संयमानं) मला असं वाटतं की, थोडं थांबावं! ते आत्ताच शिवाजी पार्कवरुन निघाले आहेत, अशी ब्रेकिंग न्यूज टीव्ही चॅनलवर बघून मीही निघालो!! एवढ्यात पोचतीलच ते!!

दादासाहेब : (घाई करत) पटापटा दोन घास खाऊन घ्या, आणि कामाला लागा! जेवणावळीत किती वेळ घालवणार? हे तुमचे चौथे भिडू पटापटा कामाला लागतात, आणि आरामात जेवतात! असं कसं चालेल?

नानासाहेब : (मोबाईलमधील संदेश वाचत) थांबा! त्यांचा मेसेज आलाय! ‘‘नमस्कार! डबा पाठवत आहे, जेवून घेणे. टिफिन बैठकीला माझा बिनशर्त पाठिंबा आहे, पण मी स्वत: येणार नाही! जय महाराष्ट्र!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com