ढिंग टांग : ब्रेकफास्ट @ शिवाजी पार्क..!

मुंबईत दादर भागात न्याहारीची उत्तम ठिकाणं आहेत. किंबहुना दादर भागात गेलो की आम्ही पाच-दहा ठिकाणी तरी न्याहारी करतो.
Dhing-Tang
Dhing-Tangsakal
Updated on

मुंबईत दादर भागात न्याहारीची उत्तम ठिकाणं आहेत. किंबहुना दादर भागात गेलो की आम्ही पाच-दहा ठिकाणी तरी न्याहारी करतो. सकाळची न्याहारी भरपेट आटोपेपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ होते. अखेर वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला दादर वर्ज्य केले. काहीही खा, पण दादरला जाऊ नका, असा वैद्यकीय सल्ला दिला. तरीही कधी कधी मोह आवरत नाही. आम्ही गपचूप दादरमध्ये जातोच.

काल असेच झाले. दादर पश्चिमेला उतरुन ‘मामा काणें’चा औषधी बटाटा वडा खावा की थोडी वाकडी वाट करुन छबिलदास शाळेसमोर ‘श्रीकृष्ण’कडे मिरचीसहित वडा घ्यावा, या संभ्रमात पडलो होतो. शेवटी दोन्ही वड्यांना माफक (प्रत्येकी दोन प्लेट) न्याय देऊन रानडे रोडकडे निघालो. तेथे ‘प्रकाश’ मधला साबुदाणा वडा (दोनच प्लेट) खाऊन जवळच्याच ‘आस्वाद’मध्ये आंबोळी-उसळीचा (दोनच प्लेट) आस्वाद घेऊन आम्ही शिवाजी पार्काच्या किनाऱ्यावर आलो. (खुलासा : किनारा समुद्रालाच असतो असे नव्हे. तो पडला बिचारा पामर! आमच्या शिवाजी पार्कचा किनाराही रम्य आहे…) पाहातो तो काय! तेथे मोटारींचा ताफा!!

‘शिवतीर्था’वर कुणी व्हीआयपी आले असून गुप्त खलबते चालू असल्याची खबर मिळाली. आम्ही डोकावलो. महाराष्ट्राचे कारभारी (आणि आमचे परममित्र रा. नानासाहेब फडणवीस) साक्षात राजेसाहेबांकडला पाहुणचार घेण्यासाठी आले होते. दक्षिण मुंबईत बरा नाश्ता मिळत नाही. व्हीआयपी लोकांनाही चांगला ब्रेकफास्ट हवा असतो. या उभयतांमध्ये जे खलबत झाले त्याला आम्ही साक्षी आहोत. (दादरमध्ये न्याहारीला आम्ही कुठेही जाऊ शकतो.) या दोघांमध्ये जो गोपनीय संवाद झाला तो थोडक्यात असा :

साहेब : (नानासाहेबांच्या खांद्यावरती शाल लपेटत) या!

नानासाहेब : (बोट दाखवत बजावून सांगत) … मी म्हटलं होतं की पुन्हा येईन!

साहेब : (गल्ल्यावर बसल्यागत) अरे, पाणी आणा रे कुणीतरी! तीन नंबरच्या टेबलावरचा पंखा चालू कर!

नानासाहेब : (उत्सुकतेनं) सध्या काय विशेष?

साहेब : (गंभीर मुद्रेनं) आमच्या कीर्ती कॉलेजचा अशोकचा वडा खाल्लाय का कधी? किंवा चुरा पाव?

नानासाहेब : (गालातल्या गालात हसत) मागल्या खेपेला तुमच्याकडेच खाल्ला होता! मी त्याला ‘शिवतीर्थ’वडा म्हणतो!

साहेब : (अधिक गंभीरपणाने) इकडे मठाच्या गल्लीतही चांगला वडा मिळतो…

नानासाहेब : (रेल्वे इंजिन रुळावर आणण्याच्या प्रयत्नात…) बाकी काय विशेष?

साहेब : (स्वत:च्याच तंद्रेत) बाकी मिसळ खावी ठाण्यालाच! झणझणीत!!

नानासाहेब : (‘कैलास जीवन’चं स्मरण करुन) हल्ली आमचं ठाण्याला जाणं होत नाही! पूर्वी मध्यरात्री वेषांतर करुन जायचो!! आमचे ठाण्याचे मित्र रुसलेत ना!!

साहेब : (सपशेल दुर्लक्ष करत) थालीपीठ खाणार? लोणी मिळेल!!

नानासाहेब : (संयम बाळगत) आणा हो काहीही! सकाळपासून पोटात काहीही नाही! आज सकाळी मी दादरला जाणार हे कळल्यावर ‘सागर’ बंगल्याच्या खानसाम्यानं चहासुध्दा ठेवला नाही!

साहेब : (आणखी एक नाव घेत) कोथिंबीर वडी चालेल?

नानासाहेब : (मलूल आवाजात) फोडणीची पोळीही चालेल हो! आमलेट आणा, भुर्जी आणा, काहीही आणा! पण आणा बुवा काहीतरी आता!!

साहेब : (करड्या सुरात) आमलेट? छे, भलतंच! आज सोमवार आहे! चहा घेणार?

…गोपनीय भेट इथं संपली. भूक लागल्यासारखे झाल्यामुळे आम्ही ‘जिप्सी कॉर्नर’कडे वळलो. पाहातो तो काय, महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांच्या मोटारींचा ताफा तिथेही पोचलेला. टेबलाशी बसून नानासाहेबांनी तिथे थालिपीठाची ऑर्डर दिली, ते आम्ही या कानांनी ऐकले.

…आणि तुम्ही म्हणता, राजकीय चर्चा झाली! उगीच काहीतरी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com