esakal | ढिंग टांग...जळो ते राजकारण!
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

माणसाने काहीही करावे परंतु, राजकारण करु नये.

ढिंग टांग...जळो ते राजकारण!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माणसाने काहीही करावे परंतु, राजकारण करु नये. राजकारण वाईट असते. महाराष्ट्राचे सद्‍भाग्य असे की, येथील राजकारणी कश्शाकश्शाचेही राजकारण करत नाहीत. सामाजिक समस्या सोडा, राजकारणाचेही राजकारण करत नाहीत!! उदाहरणार्थ, गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या महासाथीच्या बाबतीत आपल्या कुठल्या राजकारण्याने राजकारण केले का? मुळीच नाही. माझा (मराठी) माणूस आधी जगला पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे, हाच उदात्त हेतू सर्व राजकारण्यांच्या मनात होता व आहे. परवा झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या ऑनलाइन बैठकीत मा. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी राजकारण न करण्याचे एकमेकांना आवाहन केले, त्याने आम्ही सद्गदित झालो. प्रत्येकाने प्रत्येकाला राजकारण करु नका, असे बजावले. हातात हात घालून संकटाला परतवूया, असे ठरले. आता हातात हात घालण्यामुळे कोरोनाप्रतिबंधक नियमावलीचा भंग होतो, हा भाग सोडा! पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी थोडेफार नियमभंग करावे लागले तरी बेहत्तर, असेच साऱ्यांना वाटते. याला म्हंटात, सकारात्मक दृष्टिकोन!! महाराष्ट्रातील एकेका (निवडक) राजकारण्याशी आम्ही बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. हरेकाचा सूर एकच- राजकारण नको! 

या प्रतिक्रिया ऑफ द रेकॉर्ड होत्या. तरीही आम्ही देत आहो. वाचा :
मा. मु. म. रा. श्री रा. रा. उधोजीसाहेब : लॉकडाऊन करण्याची आमची इच्छा नाही, पण लॉकडाऊनची इच्छा आहे का तशी? हा खरा प्रश्न आहे. प्रश्न आहे म्हंजे आहेच. का असणार नाही? किंबहुना असलाच पाहिजे! या प्रश्नी तरी विरोधकांनी राजकारण करु नये, अशी माझी हात जोडून विनंती आहे. सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशा सतत वावड्या त्यांनी कृपया उठवू नयेत! पोटात गोळा येतो, तो जाता जात नाही!! परवा जेवत होतो, तेवढ्यात कुणीतरी नव्या लेटरबॉम्बचा उल्लेख केला. अन्नावरुन उठलो! भूकच मेली!! जय महाराष्ट्र.
वि. प. ने. मा. मा. मु. म. रा. श्री. रा. रा. नानासाहेब फ : आम्हाला राजकारण करु नका सांगताय, तुमच्या नेत्यांना सांगाल का? तुमच्या सहकारी पक्षांना सांगाल का? ते थांबले तर आम्हीही थांबू! एकीकडे केंद्र सरकारवर खापर फोडण्याचे राजकारण करता, आणि सहकार्याची अपेक्षाही करता! याला काय अर्थ आहे? कष्टकऱ्यांना मदतीचा हात दिल्याशिवाय केलेल्या लॉकडाऊनला आमचा विरोधच राहील! खबरर्दार!
कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर : करा, करा! लॉकडाऊन करा!! आणखी दोन लेटरबाँब तयार आहेत! याचा अर्थ आणखी दोन मंत्री रांगेत उभे आहेत! आमचा लॉकडाऊनला विरोध नाही, पण लॉकडाऊनच्या नावाखाली विरोधकांचा आवाज तुम्हाला दडपता येणार नाही! करा, करा! लॉकडाऊन करा!
ज्येष्ठ कांग्रेस नेते मा. नानाभाऊ ‘हात’वाले : असल्या संकटात आम्ही राजकारण कधीही करत नाही. पण केंद्र सरकार दुजाभाव करतंय, त्याचे काय करायचे? लसीकरणाचा उत्सव करा, सांगताहेत! कसा करणार? इथे लसच नाही! आता तर दिवेही लावता येत नाहीत, आणि ताटेही वाजवता येत नाहीत! ही वेळ उणीदुणी काढण्याची नाही, पण केंद्र सरकारने दुजाभाव बऱ्या बोलाने थांबवावा. नाही तर चांगला हात दाखवू! हा बघा, हा...हा. हात...हा नाही, हा...उजवा!!
मनसेनापती मा. श्री. चुलतराजसाहेब : कोणॅय? कायॅय? कसला लॉकडाऊन? माझा लॉकडाऊन का काय तो, त्याला विरोधबिरोध नाही! काय धंदे नाहीत का दुसरे?...काय? नीट बोल...तो मास्क काढ रे आधी!!