esakal | ढिंग टांग : दिल्लीश्वरांना पत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : दिल्लीश्वरांना पत्र!

ढिंग टांग : दिल्लीश्वरांना पत्र!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मा. दिल्लीश्वर,

तबियतीची चवकशी करण्याचे प्रयोजन ठेविले नाही, तसेच आपली भंपक बिरुदे आम्हांस मंजूर नसल्याने त्यांसही मायन्यात स्थान दिलेले नाही. अतएव थेट मुद्यांस हात घालणे इष्ट. तांतडीने सांडणीस्वार रवाना करण्याचे कारण की, सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी विषाणूच्या साथरोगाने थैमान घातले असोन बिकट हमला जाहला आहे. मऱ्हाटी रयत रंजीस आली असोन हाहाकार उडाला आहे. यास जबाबदार कोण?

आपण तो साक्षात दिल्लीश्वर!! संपूर्ण मुल्कावर आपली हुकूमत! मग आपल्या मुलुखातील रयतेस वारियावर सोडोन फकस्त बंगालच्या वाऱ्या करणे आपणांस शोभते काय? आपणांस फक्त निवडणुकीच्याच मसलती आणि मोहिमांमध्येच रस आहे काय? हे महाराष्ट्र राज्य आहे. येथ आपली मात्रा चालणार नाही, हे बरे समाजोन असा! महाराष्ट्रदेशी सरसकट सर्वांना लस उपलब्ध करोन द्यावी. तैसे नच जमल्यास आम्ही आमच्या पद्धतीने लसलोटा गोळा करु!! मऱ्हाटी रयतेस दाणागोटा, फौजफाटा, दवादारु आणि लसलोटा पुरविण्याची जिम्मेवारी आपल्यावरच आहे व आपण ती हिकमतीने पार पाडावी. साहेबकामी हयगय न करणे. केलियास महागात पडेल, हे जाणोन असणे.

कळावे.

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.

राज.

....

प्रिय दादूराया-

जय महाराष्ट्र. आपले (झूम कॉलवर) ठरल्याप्रमाणे मी दिल्लीला खरमरीत पत्र पाठवले आहे. "तुझ्या पद्धतीने जरा दमबाजी कर'' असे तू झूम कॉलवर म्हणाला होतासच. पत्राची प्रत तुझ्याकडेही पाठवली आहे. वाचून घे. दम कसा मारतात, हे तुला कळेल!! नाहीतर तू!! सारखा हात धुवा, मास्क लावा वगैरे सांगत बसतोस!

महाराष्ट्र संकटात असताना, मी गप्प राहू शकत नाही. वास्तविक मी हे संकट आरामात परतवू शकतोच. पण तुला सध्या संधी आहे तर घे! तुझाच. सदू. (साहेब)

....

प्रिय सदूस, जय महाराष्ट्र आणि अ. उ. आ.

दिल्लीकरांना तू लिहिलेले पत्र मी वाचले. काही म्हणता काहीही कळले नाही! दाणागोटा काय, लसलोटा काय, फौजफाटा काय... नेमके काय मागवले आहेस? मी चिंतेत पडलो आहे. जरा कळेल असे लिहीत जा की! मीदेखील एक पत्र दिल्लीकरांना पाठवले आहे. त्यातही लसीची (तुझ्या भाषेत लसलोटा) आणि रेमडेसिवीर औषधाची (तुझ्या भाषेत दवादारुची) मागणी केली आहे. तसे पत्र मी पाठवणार आहे, असे मी टीव्हीवर अगोदरच सांगितले होते, ते ऐकून तू आधी घाईघाईने पत्र कां पाठवलेस? आता आपली आडनावे एकच असल्याने दोन्ही पत्रे तूच लिहिल्याचा किंवा मीच लिहिल्याचा गैरसमज होऊ शकतो. दोन्ही पत्र कचऱ्याच्या डब्यात जातील!!

असो. काळजी घे.

दादू

ता. क. : मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा!!

....

प्रिय मित्र राजासाहब, सतप्रतिसत प्रणाम. तमे सौ साळ जिओ. काल राते ढोकला खात होता, तेव्हा तुमची बहु याद आली होती. आपडा जूना मित्र सध्या काय करते? असा विचार मनामधी आला होता. आजेच मी फॉन करणार होता, पण राहुन गेला. हवे तो तमारा खतज मळ्या. वांचून एकदम दिल खुश झाला. तुमच्या वडा भाईच्या (अने म्हारा नान्हा भाईच्या) खत पण मळ्या छे!!

बे मईनी तारीखला बंगालच्या चूंटणीच्या रिझर्ल्ट येणार! त्या वखतला आम्ही महाराष्ट्रामधी ध्यान आपणार!! सांभळ्यो के? आवजो!

तमारा. प्र. सेवक