ढिंग टांग - गुन्हा नोंद अनिवार्य!

Dhing_Tang
Dhing_Tang

प्र ति मा. मु. म. रा. यांशी नामे बबन फुलपगार, म. पो. ह. बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फू. सहा इं., उमर ४२, वजन ४२ याचा कडक साल्युट विनंती विशेश. 
विषय : लेटर लिहन्याचे कारन कां की, विना एफायार व पो. ठाण्यात बिगर गुन्ना नोंद वरिष्ठ पो. अधिकाऱ्यास (वहिमीस) कोर्टात हुबे करनेबाबतचे नियम शिथिल करणेविषयी.

साहेब, अत्यंत कठीन परस्थितीत डायरेक आपल्याला लेटर लिहून निवेदन करत आहे. मा. होम्मिनिष्टरसाहेबांना लेटर लिहिनार होतो, कारन आमच्या डिपार्टमेंटचे बॉस तेच आहेत. पन त्यांना लेटर देन्यास बंगल्यावर गेलो असता ‘ते हल्ली हिते राहात नाहीत’ असे गेटवरल्या हवालदार मित्राने सांगितले! ‘‘कुटे भेटतील?’’ असे त्यास विचारले असता, ‘‘परवा गाडीतच झोपले होते…’’ असे उत्तर त्याने धिले!! शेवटी नाविलाजाने आपल्यालाच लेटर लिहीत आहे. कृपया राग मानू नये. साहेब, कुटंबी कंपलेंट नोंद नसताना, गुन्हा नोंद नसताना, पोलिसांच्या स्टेशन डायरीत नोंद नसताना व एफायारची कॉपी नसताना साहेबलोकांविरुद्ध दाद कुटे मागायची, हा खरा सवाल आहे. खऱ्याची दुनिव्या राहिलेलीच नसून हल्ली जो उठतो तो डायरेक कोर्टात जान्याची भाशा करु लागला आहे. कारन साहेबलोकांच्या विरोधात दाद मागने इंपॉशिबल झाले आहे. म्हनूनच पो. ठान्यात गुन्हा नोंद नसताना कोर्टात दाद मागणेची प्रकरने हल्ली वाहाडू लागली आहेत. हे सीरिअस म्याटर आहे, असे वाटते.

गुन्हा घडतावेळी आपन हजर असलो तर कायद्याने तसे रिपोर्टिंग नजीकच्या पोलिस ठाण्यात करणेची गरज असते. पन आपल्या वरिष्ठांबध्दल तक्रार करायची आसंल तर ती कुटं करावी? हा सवाल आहे. उदाहरनार्थ, आमच्या पोलिस ठान्यामध्ये फौ. रावसाहेब मानमुरडे यांनी अन्यायाची परिसीमा केली असून ठान्यामधील सर्व पोलिस स्टाफ हैरान झाला आहे. वास्तविक चारचौघात मान मुरडून टकुऱ्यात पायतान हानन्याच्या लायकीचा हा मानूस फौजदार होऊन डोसक्यावर बसला, हे आमचे धुर्धैव आहे. देव त्याला कधीही माफी करनार नाही, साहेब! हा मानमुरड्या टेबलावर बुटाचे पाय ठिवून आम्हाला म्हनतो : ‘‘निस्ते आंडी उबवायला डिपारमेंटला आले का? जा, आसपासचे बारवाले, पानटपरीवाले, हाटेलवाले, यांच्याकडून हप्ता घिऊन या!!’’

मानमुरडेसाहेबाला हल्ली चिरीमिरी नकोशी झाली असून त्याची भूक लई वाढली आहे. प्रत्येक बारवाल्याकडून दो-दोन पेट्या घेऊन ये, असे त्याने मला सांगितले. हल्ली हाटेलवाले पोलिसांना कोल्ड ड्रिंक पन फुकट पाजत नाहीत, पेट्या कुटून आनायच्या? पन हे या मानमुरडेसाहेबाला कोन सांगनार? त्याच्याविरुध्द कंपलेंट करावी म्हनून मी मा. होम्मिनिष्टरसाहेबांना बारा निनावी लेटरे लिहिली. पन काहीही उपयोग झाला नाही.

निनावी लेटरला उत्तर देने इंपॉशिबल असते, हे मलाही कळते! पन मानमुरडेसाहेबाला एकांदा तरी दट्ट्या बसंल असे वाटले होते. अजूनही गडी टेबलावर बूट ठिऊन मस्त पंखा सोडून बसला आहे. अशा परिस्थितीत काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. मानमुरड्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला तर तो आमचा आनखीच जीव खाईल. सबब त्याची तातडीने बदली करावी, ही रिक्वेष्ट आहे. सदैव आपल्या सेवेत. 
आपला आज्ञाधारक. पो. ह. बबन फुलपगार. बक्कल नं. १२१२.
ता. क. : मानमुरडेसाहेबाविरोधात एफायार करायला सांगू नका साहेब! जाम महागात लागंल!
ब. फु.

- ढिंग टांगचे आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com