ढिंग टांग : आखरी ख्वाहिश…!

नामिबिया नामक नामी देशातून आणलेले आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात रुळू लागले आहेत.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

नामिबिया नामक नामी देशातून आणलेले आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात रुळू लागले आहेत.

नामिबिया नामक नामी देशातून आणलेले आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात रुळू लागले आहेत. चाऱ्ही ठाव म्हशीचे मांस, प्यायला मिनरल पाणी, चिक्कार झोप आणि हवेशीर रिसॉर्ट अशा सुविधा असताना कोण रुळणार नाही? चित्ते शांतचित्ताने जगत आहेत. काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातून आठ पेंग्विन पक्षी आणून मुंबईतल्या भायखळ्याच्या राणीबागेत सोडण्यात आले. तेही आता रुळले आहेत. इतके की, त्यांना मुंबईतील बेस्ट बसचे रुटदेखील पाठ झाल्याचे कळते! परदेशी प्राण्यांना भारत मानवतो, असे लक्षात आल्याने प्राणीजगतातील अनेक प्रजाती भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचे जागतिक वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) च्या तज्ज्ञांनी ठिकठिकाणाहून कळवले आहे. त्यांच्या अहवालांचा प्राणीनिहाय गोषवारा -

जिराफ : हा लांब मानेचा प्राणी दक्षिण आफ्रिकेच्या गवताळ आणि झुडपी प्रदेशात आढळतो. तो आफ्रिकेला कंटाळला असून आपल्याला भारतात कोकणात नेऊन सोडावे, असा विनंती अर्ज त्यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यू एफ’ला दिला आहे. कोकणातील माड, रातांबे, आंबे, फणस आदी उंच झाडांवरील फळे खाण्यात उर्वरित आयुष्य व्यतीत करावे, असा त्यांचा मानस आहे.

झेब्रा : हाही दक्षिण आफ्रिकेतलाच. पुढून पाहिल्यास घोडा व मागून पाहिल्यास गाढव वाटतो. बाजूने पाहिल्यास झेब्राच वाटतो! अंगावर पट्टे असतात. ‘आम्हाला मुंबई किंवा पुण्यात वाहतूक विभागात नोकरी मिळावी, असा त्यांचा अर्ज आहे. इथे झेब्रा क्रॉसिंगला कोणीही विचारत नाही, अशी माहिती त्यांना कुणीतरी दिली आहे!

गोरिल्ला : हा एक माकडाचा प्रकार आहे. दक्षिण अमेरिकेत आढळतो. तेथील वर्षावनांना कंटाळला असून सतत झाडांवर राहण्याने कंबरदुखी लागल्याची तक्रार त्यांनी केली आहे. विकासाची फळे आम्हालाही मिळू द्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

चिंपान्झी : हाही एक माकडाचाच प्रकार. माणसाचा पूर्वज. काहींच्या मते माणूस हाच त्यांचा पूर्वज आहे! चिंपाझी अनेकदा माणूस म्हणूनही खपून जातो. ‘दिल्लीत आपण खपून जाऊ, कोणाला कळणारदेखील नाही,’ असे त्यांनी आपल्या विनंतीअर्जात म्हटले आहे. हे माकड फिदीफिदी हसते!!

कांगारु : भारतीय राजकारणात (कांगारु) उडी घेण्याचा इरादा राखून असलेला एकमेव ऑस्ट्रेलियन प्राणी! चार पाय असूनही शेपटावर उभे राहण्याचे अनोखे कसब याच्या अंगी असून गाढवासारख्या लाथाळ्याही सहज जमतात. याच्या पोटाला खोळ असते. त्यामुळे, आपण काहीही दडपू शकतो, असा आत्मविश्वास!! भारतात कुठल्याही राजकीय पक्षात येण्याची तयारी.

रेनडिअर : हा प्राणी टुंड्रा प्रदेशात आढळतो. बर्फात चालून चालून आता थकला आहे. एकदा तरी कच्छच्या वाळवंटात चालण्याची इच्छा आहे, असे त्याने वन्यजीव निधीला कळवले आहे. ‘कभी तो पधारो, हमारे गुजराथ में’ ही जाहिरात बघून रेनडिअरवर्गास भारतभ्रमणाची हुक्की आल्याचे समजते.

…अशा अनेक प्राण्यांनी अर्ज केले असून ‘भारताचे प्रधानसेवक मा.मोदीजी यांनी आम्हालाही चित्त्यांप्रमाणेच पाळावे’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. नामशेष होण्यापूर्वी ही एक इच्छा पूर्ण करावी, अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. हे जमण्यासारखे नसल्यास भारतातील महाराष्ट्र नामक राज्यात वन्यजीवप्रेमी व पर्यावरणसंरक्षक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार मि. यूडी थॅकरे यांच्याकडे आपली केस सोपवावी, असे प्राण्यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे, असे समजते.

(सदरील मजकूर कुणाला तद्दन खोटा किंवा भंपक वाटेल, त्यांना आम्ही समस्त प्राणीजमातीतर्फे केवळ भूतदया म्हणून क्षमा करतो.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com