ढिंग टांग : काही समन्वय-पत्रे!

करेक्ट कार्यक्रमाचे फायनल करण्यासाठी तर ही दिल्लीवारी नाही ना? आपल्याला सर्व काही ठाऊक असेलच! तेव्हा कृपया कळवावे.
Dhing Tang
Dhing TangSakal

पत्र १ : आदरणीय कमळाध्यक्ष मा. चंदूदादा कोल्हापूरकर यांसी सादर प्रणाम. घाईघाईने आपल्याला पत्र लिहिण्याचे कारण की, आपले (एकमेव) नेते मा. नानासाहेब फडणवीस परवा रात्रीचे विमान पकडून दिल्लीला गेल्याचे समजले. हे खरे आहे का? त्यांचा मोबाइल फोन त्यांनी मुंबईतील निवासस्थानी डायवर्ट करुन ठेवल्याने दुसरेच कोणीतरी फोन उचलते आहे! थेट निवासस्थानी फोन केला असता ते मीटिंगमध्ये आहेत, असे रात्री दीडच्या सुमारास मला सांगण्यात आले. ते दिल्लीला गेले आहेत, असे कोणीतरी निनावी फोन करुन कळवले. कधी गेले? कां गेले? कधी येणार? याचा आम्हा कार्यकर्त्यांना काहीदेखील पत्ता लागला नाही. ‘‘इरोधी पक्षनेते खंय गेलेहत?’’ अशी विचारणा करणारा एक फोन सिंधुदुर्गातून येऊन गेला!!

करेक्ट कार्यक्रमाचे फायनल करण्यासाठी तर ही दिल्लीवारी नाही ना? आपल्याला सर्व काही ठाऊक असेलच! तेव्हा कृपया कळवावे. आपला आज्ञाधारक. प्रवीण(भाऊ) दरेकर, द्वारा-मुंबै बँक.

ता. क. : येत्या अधिवेशनात सरकारला कसे घेरायचे, या विषयावर आपल्यामध्ये चर्चा करायला हवी. अन्यथा, सरकारप्रमाणे आपल्यातही समन्वय नाही, अशी टीका होईल.

कळावे. प्र. द.

मा. चंदूदादा (कमळाध्यक्ष, राज्य शाखा) यांसी शतप्रतिशत प्रणाम. ओबीसीचे आरक्षण तीन-चार महिन्यांत नाही आणून दाखवले तर संन्यास घेईन, अशी भीष्मप्रतिज्ञा केल्यानंतर आपले नेते मा. नानासाहेब कुठे गायब झाले आहेत? मी केव्हापासून त्यांना शोधतो आहे.

थांगपत्ता लागत नाही. त्यांच्या बंगल्यावर तीनदा जाऊन आलो. फक्त पोहे मिळाले, माणूस मिळाला नाही! ‘‘इरोधी पक्षनेते खंयसर कडमडलेहत? दिल्लीक गेलेहत का? ’’ अशी दरडावणी करणारे तीन फोन मी घेतले. असो!

कृपया अर्जंट चौकशी करावी. शेलारमामा. (मुंबई)

ता. क. : अधिवेशन तोंडावर आले तरी आपली काही तयारी नाही.

इरोधी…सॉरी…विरोधी पक्ष म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही? मामा.

आदरणीय कमळाध्यक्ष (कोथरुड शाखा) मा. चंदूदादा यांसी शतप्रतिशत प्रणाम. आपण आमचे अध्यक्ष आहात. तुमचा फोटो नेहमी माझ्या खिशात असतो. (अडीअडचणीच्या वेळी तो काढून मी दर्शन घेतो. अडीअडचण सुटते, असा अनुभव आहे.) तरीही तुम्हाला न सांगता मी काल तांतडीने दिल्लीला (जाऊन) आलो. माझे जाणे इतके गोपनीय होते की कुणाला सांगता आले नाही. माझा मोबाइल फोनही मी बंगल्याच्या नंबरवर डायवर्ट करुन ठेवला आहे. सिंधुदुर्गातून फोन करुन आपल्या मा. नारोबादादांनी ‘नेमके कुठे आहात?’ असे तीनवेळा संशयी आवाजात विचारले. शेवटी मी फोन बंद केला.

सकाळी आपण फोनवर बोललो तेव्हा मुद्दाम बोलताना मी ‘अगं, चहा झाला का?’ अशा छापाचे घरगुती उद्गार काढून तुमचा कात्रज केला. मी घरीच असल्याचे तुम्हाला वाटावे म्हणून!! त्याबद्दल क्षमस्व. करेक्ट कार्यक्रमाचे सगळे नियोजन करुन मगच मुंबईला परत

येईन! काळजी नसावी. यावेळी नक्की हं!! सदैव आपलाच. नानासाहेब फ.

ता. क. : आपल्यात योग्य समन्वय असावा म्हणून एवढे लिहिले! नाना.

सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी खुलासा -

विरोधी पक्षनेते मा. नानासाहेब फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांची विदर्भातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात भेट घेतली. बाकी काळजीचे कारण नाही! अधिवेशन दोनच दिवसांचे असून त्यादरम्यान आपण सगळे समन्वयाने राहू!! कळावे. आपला दादा. (कोथरुड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com