ढिंग टांग : …कशात काय, नि खिशात काय!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) महाराष्ट्रात इतक्या घडामोडी चालू आहेत, पण मी उठून (विमानाने) गोव्यात आलो.
Dhing Tang
Dhing TangSakal

आजचा दिवस : आनंदनाम संवत्सर श्रीशके १९४३ भाद्रपद पौर्णिमा.

आजचा वार : ट्यूसडेवार.

आजचा सुविचार : यात्रा करते समय खिसापाकिट संभालो! कृपया जेबकतरों से सावधानी

बरतें-भारतीय रेल.

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) महाराष्ट्रात इतक्या घडामोडी चालू आहेत, पण मी उठून (विमानाने) गोव्यात आलो. गोव्यातील आगामी निवडणुकीचा मी प्रभारी आहे, म्हणून यावे लागले. पण खरे सांगायचे तर माझे मन गोव्यात नाही. (ते नागपुरातदेखील नाही.) ते सध्या मुलुंडमध्ये आहे! महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता भूकंप झाला तर त्याचा केंद्रबिंदू मुलुंडात असेल, असा माझा अंदाज आहे. कुठल्याही क्षणी मला मुंबईला परतावे लागेल, असे मी गोव्यात आल्या आल्याच येथील पक्ष सहकाऱ्यांना सांगून ठेवले.

येताना विमान पकडले, तेव्हा विमानतळावर तपासणी करणाऱ्या सुरक्षा सैनिकाने लगेज तपासले. काहीही सापडले नाहीच. मग त्याने खिशावरुनही मेटल डिटेक्टर फिरवला. ‘टुंई टुंई टुंई ’ वाजले! संशयी चेहरा करुन तो सैनिक म्हणाला, ‘‘जेब में क्या रख्खा है? निकालो!’’ मी वरच्या खिशातून पेन काढून दाखवले. त्याने प्यांटच्या खिशाकडे बोट दाखवले. खिसे जाम फुगले होते, हे मान्य करायला हवे. पण ते पैशाने नव्हे!‘‘कुछ नही, कुछ नही!’’ असे सांगून मी खिशातून ‘पेरुचा पापा’ (पेन, रुमाल, चावी, पाकिट,पास…) काढून दाखवला, आणि वेळ मारुन नेली. रुमालाने उगीचच घाम पुसून दाखवला.

‘और कुछ नहीं है ना?’’ त्याचा संशय पुरता फिटला नसावा. पण मी दामटून ‘छे, कुठे काय’ असे सांगून टाकले. मग बोर्डिंग पासवर शिक्का मारुन (घुश्शातच) त्याने सोडले. माझ्या खिशात नेमके काय आहे, हे त्याला कळले असते तर?

आमचे कमळाध्यक्ष मा. चंदूदादा कोल्हापूरकर मोठे चौकस आणि दिलखुलास गृहस्थ आहेत. पण कधीकधी (पक्षी : बऱ्याचदा) त्यांचा दिलखुलासपणा पंचाइत करतो. भेटले की नेहमी ते माझ्या खिशात काय काय आहे, हे तपासून बघतात. ‘‘बघा बरं खिशात काय निघतंय?,’’ असं सहज विचारल्यासारखे करतात. त्यामुळे माझ्या खिशात काय आहे, हे त्यांना चांगले ठाऊक असते. (तसा मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे…) पण परवा त्यांनी पंचाईत केली. ‘ आमच्या नानासाहेबांच्या वयावर जाऊ नका, ते खिशात शंभर बारामतीकर घेऊन फिरत असतात…’ हे त्यांनी भर चौकात सांगून टाकले. इथे माझ्या पोटात गोळा!! बरेचसे पैसेवाले लोक खिशात ‘गांधी’ ठेवून हिंडतात. मी बारामतीकर ठेवतो, हे गुपित महाराष्ट्राला आता ठाऊक होणार!

मा. चंदूदादांना फोन केला. ‘एख…कितें रें!’ असे उद्गार आपोआप माझ्या तोंडून बाहेर पडले. (एव्हाना मी गोव्यात पोचलो होतो…) ‘माझ्या खिशात फक्त ‘पेरुचा पापा’ आहे हो!’ असे मी त्यांना कळवळून सांगितले.

‘खोटं बोलू नका, आम्हाला माहीत आहे तुमच्या खिशात काय आहे ते!’’ मा. चंदूदादा फटकळपणाने (पक्षी : दिलखुलास) म्हणाले.

‘काय आहे?’ मी.

‘पेरुचा सौदा आहे…पेन, रुमाल, चावी आणि सौ दादासाहेब! बरोबर ना?’ ते गालातल्या गालात हसत म्हणाले. मी फोन ठेवला. खिशात एवढा माल असता तर दोन वर्ष तोंडाला एवढा फेस का येता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com