esakal | ढिंग टांग : बघून घेईन, देईन चापट…!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : बघून घेईन, देईन चापट…!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : व्हाइट हाऊस, पेनसिल्वानिया अवेन्यू, वॉशिंग्टन डीसी.

वेळ : सकाळी आठ-साडेआठाची.

बंद दरवाजाच्या समोर सोळावी जांभई दिल्यानंतर मा. अध्यक्षांच्या वैयक्तिक सचिवांनी सतरावी जांभई प्रयत्नपूर्वक दाबत सुरक्षाव्यवस्थेतील सीआयएच्या एजंटांना कळवले की, ‘पोटस (ऊर्फ मा. अध्यक्ष) अजून शय्यागृहातून बाहेर आलेले नाहीत, सबब सर्व कार्यक्रम अर्धाएक तासाने पुढे ढकलण्यात आले आहेत.’ व्हाइट हौसच्या ड्यूटीवरील एजंटाने तत्परतेने (तोंडासमोरील इलेक्ट्रॉनिक उपकरणात) बोलून ही गोपनीय माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली. ते लँग्ली येथील गुप्तचरांच्या सुप्रसिध्द इमारतीत बसून दक्षपणे साऱ्या विश्वावर लक्ष ठेवीत होते. अमेरिकेतील गुप्तचरदेखील सुप्रसिध्दच असतात. त्यांची गुप्त कामेही प्रचंड लोकप्रिय वगैरे असतात. असो. ही माहिती वरिष्ठांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवली. त्यांच्याही वरिष्ठांनी अतिवरिष्ठांच्या कानी ही बातमी घातली. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाच अहवाल ‘मा. अध्यक्षांच्या माहितीसाठी’ असा शेरा मारुन व्हाइट हौसलाच पाठवला!!

त्या अहवालातील काही सुप्रसिद्ध नोंदी येणेप्रमाणे : पोटस सकाळी उठले. कालच्या जेवणातील सूप नीटसे पचले नसावे. आंबट ढेकर आल्याने पोटस अस्वस्थ झाले. पोटस यांचे पोटस तितकेसे बरे नाही, हे व्हाइट हौसच्या निवासी डॉक्टरांना कळवण्यात आले. डॉ. एक्स यांनी त्यांना आलेलिंबू चोखण्याचा वैद्यकीय सल्ला दिला. अध्यक्षीय पाकघरातून आलेलिंबू मागवण्यात आले. आले आणि लिंबात काही घातक पदार्थ नाहीत ना, याची चाचणी करण्यात आली. आलेलिंबू चोखल्यावर पोटस यांना बरे वाटले. सबब, या धावपळीमुळे सर्व कार्यक्रम अर्धा तास पुढे ढकलण्यात आले. पोटस यांच्या वैयक्तिक सचिवांनी अध्यक्षीय शय्यागृहासमोर उभे राहून बंद दारासमोर सोळा जांभया दिल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले आहे. सोळा जांभयांची चौकशी चालू असून त्याचा स्वतंत्र अहवाल सादर केला जाईल. सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी वरिष्ठ, अतिवरिष्ठ आणि अतिअतिवरिष्ठ अधिकारी, तसेच लष्करप्रमुखांच्या बैठकीत पोटस यांना अफगाणिस्तानातील परिस्थितीचा गोपनीय अहवाल देण्यात आला. काबुल विमानतळावरील स्फोटाचे गोपनीय वृत्त अधिकृतरित्या तेव्हा सांगण्यात आले.

अर्थात, त्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी तेथील दृश्ये दाखवण्यास सुरवात केली होती. इसिस-खोरासान या जहाल संघटनेच्या अतिरेक्यांनी काबुलच्या विमानतळावर स्फोट घडवून आणला, हे कळताक्षणी पोटस यांनी आधी सोडा मागवला. अठ्ठाविसावी जांभई आवरत वैयक्तिक सचिवांनी त्यांना सोडा दिला. सदरील सोडा- बाटलीचेही पृथक्करण करण्यात आले असून त्याबाबतचा स्वतंत्र अहवाल लौकरच सादर करण्यात येईल. ‘‘अफगाणिस्तानात आपण खरोखर माती खाल्ली का?’’ असा थेट सवाल पोटस यांनी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचारला. त्यावर तीन जणांनी ‘छे’ असे मत दिले. तीन जणांनी ‘‘अजिब्बात नाही’’ असे सांगितले. तीन जणांनी ‘‘तसंच अगदी म्हणता येणार नाही, पण असंच काहीतरी कानावर आलंय’’ अशी स्पष्ट भूमिका घेतली. तीन जणांनी कानात काडी घातल्यामुळे ‘आँ?’’ एवढीच भूमिका ठामपणे मांडली. खुद्द पोटस यांनी ‘सारे अन्नधान्य मातीतच उगवते, त्यामुळे थेट माती खाल्ल्याने काहीही बिघडत नाही,’ अशी मानवतेची भूमिका मांडली.

त्यानंतर माध्यमांशी बोलण्यापूर्वी पोटस यांनी आणखी एक सोडा मागवला. ते म्हणाले : दहशतवादी कृत्यं करणाऱ्यांना आम्ही जिथे असतील तिथून शोधून काढू. उस वक्त बंदूक हमारी होगी, गोली हमारी होगी, और निशाना भी हमाराही होगा..!’’

सुप्रसिद्ध हिंदी सिनेकलावंत राजकुमार यांचा डायलॉग ऐनवेळी आठवल्याबद्दल पोटस यांनी समाधान व्यक्त केले.

loading image
go to top