ढिंग टांग : न्यारी न्याहारी!

माणसाने राजासारखी न्याहारी करावी, आणि दरिद्र्यासारखे रात्रीभोजन घ्यावे, असे शास्त्रवचन आहे. सकाळी खाल्लेले दिवसभरात पचते, रात्रीचा आहार हलका असावा, हा आरोग्य संदेश या वचनामध्ये दडलेला आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal

माणसाने राजासारखी न्याहारी करावी, आणि दरिद्र्यासारखे रात्रीभोजन घ्यावे, असे शास्त्रवचन आहे. सकाळी खाल्लेले दिवसभरात पचते, रात्रीचा आहार हलका असावा, हा आरोग्य संदेश या वचनामध्ये दडलेला आहे. या उक्तीनुसारच खा. गांधी यांनी आपल्या सर्व मित्र खा. दारांना पोटभर न्याहारीचे निमंत्रण दिले होते. ‘‘मान्यवर, पुढील काळातील रणनीती ठरवण्यासाठी मित्रपक्षांचे एक न्याहारी संमेलन मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात येत आहे. (स्थळ : कॉन्स्टिट्यूशन क्लब). न्याहारी बैठक असल्यामुळे ती सकाळी साडेनवाच्या सुमारास होईल, याची नोंद संबंधितांनी घ्यावी. तरी आपण आवर्जून येणेचे करावे, ही विनंती. येताना आपापली सॅनिटायझरची बाटली व मास्क आणणे अनिवार्य आहे. तरीही प्रवेश करताना मास्क काढून ओळख पटवून द्यावी. मागल्या खेपेला मास्क लावून तीन कमळ पक्षाचे लोक पेगाससप्रमाणे घुसल्याची शंका आहे! मंगळवारचा उपवास धरणाऱ्यांनी डब्यातून आपापली साबुदाणा खिचडी किंवा वडे आणावेत. आपल्या प्रतीक्षेत. खा. गांधी.’’

खा. गांधी यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत अनेक पक्षाच्या खा. दारांनी आदल्या रात्रीचे भोजन कंप्लीट रद्द केले. काही खा. दार पाणी पिऊन झोपले, तर काहींनी ताकावर तहान भागवली. काहींची भूकच मेली! लोकशाही टिकवण्यासाठी येवढा त्याग करणे आवश्यकच होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे उरकून न्याहारीस जावे की ‘तसेच’ जावे, असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला. तसेच जाण्यामध्ये थोडा धोका होता. काही मराठी खा. दारांना हुर्डा पार्टी आणि धुंधुरमासातील रम्य भोजनाची आठवण झाली. पण तसले काही नसणार, हे कळल्याने ते किंचित खट्टू झाले. अखेरीस पंधरा पक्षांचे खा. दार सकाळी नवाच्या सुमारास कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे जमले.

‘उप्पीट मिळेल ना हो इथं? मंगळवारी मी आमलेट खात नाही...!,’’ एका मराठी खा. दाराने दुसऱ्या (मराठीच) खा. दाराला काळजीच्या सुरात विचारले.

‘इथं परांठे आणि आलुपुरी खाण्याची पद्धत आहे!’’ त्याने उत्तर दिले. सकाळी उठून परांठे खाणे योग्य नाही, असे मत आणखी एका खासदाराने नोंदवले. अति नाश्ता केल्यानंतर डोळ्यांवर थोडी झापड येत्ये, मग संसदेत जाऊन गोंधळ कसा घालणार? या चिंतेने काही खा. दारांना ग्रासले होते. ‘‘मी खिमारोटी खाईन किंवा खिमाप्याटिस!’’ एक खा. दार उघडपणे म्हणाला. तेवढ्यात गडबड उडाली. यजमान खा. गांधी अवतरले! पोटभर हसून त्यांनी न्याहारीच्या मेजाकडे बोट दाखवले. सारे खा. दार सुग्रास न्याहारीवर तुटून पडले. ‘‘मग पुढली रणनीती काय ठरवायची? बोला...,’’ खा. गांधींनी विषयाला आणि परांठ्याला एकाचवेळी हात घातला.

‘पुढल्या वेळी प्रांठेवाल्या गल्लीतच न्याहारीला जाऊ!,’’ एका खा. दाराने सूचना केली.

सर्वांनी त्याला अनुमोदन दिले. तेवढ्यात बडीशेपेसकट बिल घेऊन क्लबचा सेवक येऊन उभा राहिला. खा. गांधींना तेवढ्यात फोन आल्याने ते चपळाईने निघून गेले. इतर खा. दार दुप्पट चपळाईने हात धुण्यासाठी उठले. बडीशेप संपली, परंतु, बिल तिथेच राहिले. संसदेतील अन्य बिलांसारखेच न्याहारीचे बिल कोण पास करणार? असे विचारत व्याकुळ अवस्थेतील कॉन्स्टिट्यूशन क्लबचा सेवक धावाधाव करत होता. कोणीही दाद दिली नाही, अखेर एका कनवाळू खा. दाराने ‘हातातले बिल पुनर्विचार समितीकडे पाठवावे. शेवटी ही लोकशाही आहे. हुकूमशाही पद्धतीने बिले रेटण्याची ही पद्धत योग्य नव्हे,’ अशी तंबी त्याला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com