esakal | ढिंग टांग : मी जिंकलो…मी हरलो?
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : मी जिंकलो…मी हरलो?

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : आश्विन शु. प्रतिपदा श्रीशके १९४३, घटस्थापनेचा दिवस.

आजचा वार : नमोवार…आय मीन गुरुवार!

आजचा सुविचार : खुशियां चूम लूं या रो लूं जरा..?

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. लक्ष पुरा करणेचा आहे.) रात्रभर बेचैन होतो. झोप लागली नाही. डोक्यात सारखे ‘काव काव काव काव’ असे आवाज येत होते. काही वेळा ‘आव आव आव’ असे ऐकू येऊन मी अंथरुणात उठून बसे. थोड्यावेळाने ‘जाव जाव जाव’ असे ऐकू येऊ लागले. कानात बोळे घालून झोपलो. तरीही आवाज थांबेनात. ‘पाव पाव पाव पाव’ असा धावा ऐकू येऊ लागल्यावर मात्र उठूनच बसलो. हे सारे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमुळे झाले आहे. या निवडणुकांचा निक्काल सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी लागला! काव काव नाही ऐकू येणार तर काय येणार? असो.

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमके काय चालू आहे, हे (नमोजी सोडून) कोणाला कळेल? बहुधा कोणालाच नाही. (आमच्या नमोजींना दार्जिलिंग, चामलिंग किंवा फॉर दॅट मॅटर नंदूरबारमधले राजकारणदेखील कळते.) वास्तविक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये जबरदस्त यश प्राप्त होईल, असे संकेत मला पक्षश्रेष्ठींकडून मिळाले होते. (तेवढ्याकरता दिल्लीला दर्शनाला जाऊन आलो होतो!) पण ऐन सर्वपित्रीला मतमोजणी झाली…नाही म्हणायला तांत्रिकदृष्ट्या आमच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या, हे खरे असले तरी फटाके फुटले महाविकास आघाडीच्या छावणीत! नेमके जिंकले कोण आणि हरले कोण? हा खरा सवाल आहे…

आपण नक्की जिंकलो की हरलो? हे विचारण्यासाठी मी शेवटी आमचे कमळाध्यक्ष मा. चंदूदादा यांनाच गाठले. त्यांनी गेल्या गेल्या माझे भरघोस अभिनंदन केले. एक टप्पोरा पेढाही खिलवला. मी विचारले की ‘‘कसला पेढा?’’ तर म्हणाले, ‘अहो, असं काय करताय? इलेक्शन नाही का जिंकलो?’’

‘खरंच जिंकलो का पण?’’ मी. पेढा हातात तसाच होता.

‘म्हंजे काय? सर्वाधिक जागा आपल्यालाच मिळाल्या की! तरी बरं ‘त्या’ तिन्ही पक्षांनी सत्तेचा भरपूर गैरवापर केला! शिवाय आपण कोणीही मोठे पुढारी प्रचाराला गेलो नव्हतो! त्यादृष्टीनं आपलं यश डोळ्यात भरण्यासारखंच आहे..खा तो पेढा!,’’ मा. दादा मोठ्या

आत्मविश्वासाने म्हणाले. काहीही म्हणा, हे गृहस्थ कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक बोलू शकतात. ग्लास अर्धा भरलेला की रिकामा असे कुणी त्यांना विचारले तर सांगतील, ‘‘हा ग्लास अर्धा लिंबूसरबताने, आणि अर्धा प्राणवायूने भरलेला आहे!,’’ ग्लासात लिंबूसरबत नसले तरीही त्यांचे हेच उत्तर असेल!

आमच्या नागपूरच्या झेडपीत थोडा धक्का बसला हे खरे; पण त्याचे एवढे विशेष नाही. कारण आमच्या माजी मित्रपक्षाला तिकडे खातेदेखील उघडता आले नाही. काय उपयोग झाला सत्तेचा? त्यांच्या पराभवातच आपली खरी जीत आहे, असे माझे सांत्त्वन दादासाहेबांनी केले, मगच मी तो पेढा खाल्ला. सगळ्यात शेवटी दादांनी माझ्या हातावर गपचूप आणखी एक पेढा ठेवला, आणि म्हणाले : ‘‘टेन्शन घेऊ नका, तुम्ही झेडपीत पुन्हा येईन असं कुठं सांगितलं होतंत? कुणी काहीही म्हणालं तरी आपण जिंकलोय, हे लक्षात ठेवा! खा तो पेढा!’’ तेव्हा कुठे माझ्या डोक्यातली काव काव बंद झाली!

loading image
go to top