ढिंग टांग : ईडीला लावा काडी!

आदरणीय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, मा. नानासाहेब, यांसी अनेकानेक विनम्र प्रणाम विनंती विशेष. खरे तर सदरील निवेदन मी थेट हायकमांडकडे देणार होतो.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

आदरणीय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, मा. नानासाहेब, यांसी अनेकानेक विनम्र प्रणाम विनंती विशेष. खरे तर सदरील निवेदन मी थेट हायकमांडकडे देणार होतो.

आदरणीय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, मा. नानासाहेब, यांसी अनेकानेक विनम्र प्रणाम विनंती विशेष. खरे तर सदरील निवेदन मी थेट हायकमांडकडे देणार होतो. परंतु, परिस्थितीवशात ते तुमच्या हाती द्यावे लागत आहे. सदरील निवेदन आपल्याला देणारा गृहस्थ अतिशय विश्वासू असून आपल्याच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.- कारण तो मीच आहे! कृपया माझ्या निवेदनाची योग्य ती दखल घ्यावी, ही विनंती.

गेले काही दिवस आपल्या हायकमांडला वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देण्याचे उद्योग हुकूमशहा सरकारने सुरु केले आहेत. त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. सध्या आपल्या देशात ईडी नावाच्या एका तपाससंस्थेचा भलताच उदोउदो चालू आहे. कालपरवापर्यंत ईडी म्हटले की लोक फार तर खिश्यातून माचिस काढत असत. - आता पाकिट लपवतात! याच ईडीने आपल्या सर्वांच्या लाडक्या हायकमांडला चौकशीसाठी बोलावले. मी म्हणतो, यांचे धाडस झालेच कसे? रीतसर वेळ घेऊन हायकमांडच्या घरी जाऊन विनम्रपणे चार प्रश्न विचारले असते तर समजून घेण्याजोगे होते. पण या नतद्रष्ट ईडीने त्यांना सामान्य संशयितासारखे कार्यालयात बोलावले. केवढा हा उद्धटपणा? आणि मुळात आपल्या हायकमांडला प्रश्न विचारणारे हे कोण गोमाजीराव? ईडी अधिकाऱ्यांच्या या उद्धटपणाच्या निषेधार्थ आम्ही आपल्या आदेशानुसार गेले चार दिवस रोज उग्र निदर्शने करीत आहोत.

पहिल्या दिवशी तुडुंब गर्दीत आंदोलनस्थळी जमून आम्ही जोशात घोषणा दिल्या आणि पोलिसांचे अडथळे ढकलून आक्रमक पवित्रा वगैरे दाखवला. पोलिसांनी आम्हाला पिंजऱ्याच्या गाडीत बसवून लांब सोडून दिले. तिथून चालत घरी आलो… दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचलो. एक फाटके मोटारीचे टायर भर रस्त्यात जाळले. भरपूर जाळ आणि धूर झाला. वेळ पडली तर काँग्रेसचा कार्यकर्ता किती संतापू शकतो हे हुकूमशहा सरकारला चांगलेच कळले असेल. याही दिवशी पोलिसांनी पिंजऱ्याच्या गाडीत बसून आणखी लांब नेऊन सोडले. तिथून रिक्षा न मिळाल्याने पुन्हा चालतच आलो…

तिसऱ्या दिवशी कार्यकर्ते थोडे कमी होते, पण आम्ही आंदोलनस्थळी घोषणा भरपूर दिल्या. पोलिसांनी पुन्हा पिंजऱ्याच्या गाडीत बसवून आणखी लांब नेऊन सोडले. तिथून चालत घरी येणे भागच पडले. चौथ्या दिवशी आम्ही दहा-बारा जण आंदोलनस्थळी गेलो, तिथे घोषणा दिल्या आणि ताबडतोब पोलिसांच्या गाडीत स्वत:हून जाऊन बसलो. त्यांना म्हटले, ‘‘जरा लौकर घ्या, मग रिक्षा मिळायला तकलीफ होते.’’ पण तरीही रिक्षा मिळाली नाही ती नाहीच. चालत घरी आलो…

पहिल्या दिवशी पायपीट झाल्यानंतर घरच्या मंडळींनी गरम पाण्याची बादली (पाय बुडवून ठेवायला) आणून दिली होती. दुसऱ्या दिवशी आपटली, तिसऱ्या दिवशी आदळली आणि चौथ्या दिवशी…जाऊ दे. हुकूमशाहीशी लढताना क्रांतिकारकांना एवढे अपमान आणि विटंबना झेलाव्या तर लागतातच. त्याचे येवढे काही नाही. पण ईडीकडे हायकमांड रोज चौकशीला जात आहे आणि या चौकशीमुळे आमचे घसे आणि पाय मात्र प्रचंड दुखू लागले आहेत. शिवाय कामेधामे सोडून या कामात गुंतल्यामुळे घरातूनही प्रखर विरोध होऊ लागला आहे. नोकरी तर गेल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. हुकूमशहा सरकार आणि ईडीला काडी लागेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असे वचन मी देतो.

आपला एक निष्ठावंत कार्यकर्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com