ढिंग टांग : युद्ध : ऑनलाइन, बिनलाइन...!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : खरं तर गेलेली!
Dhing tang
Dhing tangSakal
Summary

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : खरं तर गेलेली!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : खरं तर गेलेली!

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?

उधोजीसाहेब : (डोक्यावर उशी घेत) नोप...मला झोप लागलीये गाढ!

विक्रमादित्य : (बिनदिक्कत आत येत) काम होतं अर्जंट!

उधोजीसाहेब : (डोक्यावरली उशी आणखी दाबत) कसलं आलंय अर्जंट काम? आता सगळं निवांत आहे!

विक्रमादित्य : निवांत राहून कसं चालेल? ही युद्धाची वेळ आहे!

उधोजीसाहेब : (कंटाळून) नको रे आता युद्ध बिद्ध! झोपू दे मला जरा दोन घटका! आत्ता कुठे जरा डोळा लागत होता, तेवढ्यात कडमडलास!!

विक्रमादित्य : (बालहट्ट करत) चला ना बॅब्स! तुम्ही हल्ली काही उत्साहच दाखवत नाही!!

उधोजीसाहेब : (डोळे मिटून मिटक्या मारत) आता मी जवळपास रिटायर झालोय, बेटा! आता उत्साह असलाच तर तो आरामाचा! झोपू दे मला! गुड नाइट!

विक्रमादित्य : (आश्चर्याचा धक्का बसून) गुड नाईट काय म्हंटा? दुपारचे दोन वाजलेत!!

उधोजीसाहेब : (निर्विकारपणाने) वाजेनात का? दोन, पाच, बारा, अठरा, वीस, चौसष्ट...किती का वाजेनात! आपल्याला काय करायचंय?

विक्रमादित्य : (आक्रमक डरकाळी फोडत) वेळ सांगून येत नाही, बॅब्स! मी ठरवलंय! या गद्दारांचे बारा वाजवायचे!! गद्दार, फितुर, विश्वासघातकी!...यांना एवढं दिलं तरी लेकाचे फिरले!! एकेकाला बघून घेईन!

उधोजीसाहेब : (हात झटकत) बघ बुवा, काय करतोस ते कर! मी तर आता सगळ्यातून मुक्त झालो आहे!

विक्रमादित्य : (हिरमुसून) म्हंजे तुम्ही बाहेर पडणार नाही तर...!

उधोजीसाहेब : नाय, नो, नेव्हर! अजिबात नाही...!

विक्रमादित्य : (दात ओठ खात) या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तुमचे हात शिवशिवत नाहीत?

उधोजीसाहेब : (थंडपणाने) शिवशिवतात की!

विक्रमादित्य : (आश्चर्यानं) मग काय करता?

उधोजीसाहेब : काही नाही! एकमेकांवर चोळतो!!

विक्रमादित्य : (डरकाळी फोडत) गुर्रर्रर्र...मी मात्र यांचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही! मी त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बदला घेईन! आजच मी अलिबागच्या मोहिमेवर निघालो आहे! संपूर्ण महाराष्ट्रात मुलुखगिरी करुन या गद्दारांना धडा शिकवणार आहे!! बघालच तुम्ही! हर हर हर हर महादेव...!

उधोजीसाहेब : (शांतपणे) बेस्ट ऑफ लक!

विक्रमादित्य : (कुरकुरत) हे काय हो बॅब्स! मी लौकरच घराबाहेर पडणार आहे, अशा धमक्या देऊन देऊन तुम्ही इतके महिने घरात काढलेत! आता तरी बाहेर पडा ना...!

उधोजीसाहेब : (मानभावीपणाने) मी घराबाहेर पडलो, तर तुला कसा अनुभव मिळणार युद्धाचा, अं?

विक्रमादित्य : (कळवळून) महाराष्ट्राची रयत तुमच्याकडे अपेक्षेने बघत आहे, बॅब्स! कुछ करो!!

उधोजीसाहेब : (डोकं खाजवत) असं कर...तू युद्धावर जा, मी इथून ऑनलाइन किल्ला लढवतो!! हल्ली सगळी कामं ऑनलाइन होतात, युद्ध का होणार नाही?

विक्रमादित्य : म्हंजे तुम्ही घराबाहेर नाही पडणार...!

उधोजीसाहेब : (आश्वासन देत) पडू की! लौकरच!!

विक्रमादित्य : (वैतागून) मी एकटा युद्धावर जाऊन काय करु?

उधोजीसाहेब : (निर्धारपूर्वक) युद्धात विजयी हो! त्या गद्दारांना मुसक्या बांधून इथे माझ्यासमोर फरपटत घेऊन ये! मग...(काही न सुचून) मग पुढचं मी बघतो! जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com