ढिंग टांग : अर्ज किया है...!

नेहमीप्रमाणे निवांत वातावरण होते. कुणी चहा मागवते आहे का, याची वाट पाहात काही जण तिष्ठले होते, कुणी उगीचच घड्याळात (चोरुन) पाहात होते. तेवढ्यात दार ढकलून एक व्यक्ती आत शिरली.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

नेहमीप्रमाणे निवांत वातावरण होते. कुणी चहा मागवते आहे का, याची वाट पाहात काही जण तिष्ठले होते, कुणी उगीचच घड्याळात (चोरुन) पाहात होते. तेवढ्यात दार ढकलून एक व्यक्ती आत शिरली.

स्थळ : टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई.

नेहमीप्रमाणे निवांत वातावरण होते. कुणी चहा मागवते आहे का, याची वाट पाहात काही जण तिष्ठले होते, कुणी उगीचच घड्याळात (चोरुन) पाहात होते. तेवढ्यात दार ढकलून एक व्यक्ती आत शिरली. दार ढकलले नसते तरी चालले असते, कारण ते तसे उघडेच असते.

‘अमा, महाराष्ट्रा कांग्रेस दप्तरखाना यहीं कहीं हैं ना?,’ अस्सल जुबानमध्ये सवाल आल्याने सारे चमकले. दफ्तरखाना? कोपऱ्यातल्या खुर्चीत पेपर वाचत बसलेल्या बाबाजी चव्हाणसाहेबांनी चष्म्य्याच्या वरल्या मजल्यावरुन रोखून पाहिले. ‘छे छे, दफ्तरखाना वगैरा कुछ नहीं, यहां तो खाना भी नहीं’ असे सांगून टाकण्याची उबळ त्यांना आली होती. पण त्यांनी ‘जाऊ दे, मरो’ असा विचार करुन पुन्हा पेपरात तोंड खुपसले. एका टेबलाच्या मागे कांग्रेसाध्यक्ष नानासाहेब पटोलेजी आपण कुठला पेपर वाचावा, असा विचार करत आढ्याकडे डोळे लावून बसले होते. ते आजही मोदीजींवर खूप रागावले होते. ते रोजच सकाळी वेळ ठरवून भाजपवर रागावतात.

‘अमा, बोलो तो सही...महाराष्ट्रा कांग्रेस का दफ्तरखाना यहीं कहीं है क्या?,’ अस्सल उत्तरी लहेजातला सवाल पुन्हा येऊन आदळला.

‘होगा...तो?,’’ कपाळाला आठ्या घालत पटोलेजींनी प्रतिसवाल केला. हे कुठलं नवं लचांड आले असा त्यांचा चेहरा झाला होता. ‘अर्ज किया है...’ कुर्त्याच्या खिशातून एक डायरी काढत ती व्यक्ती म्हणाली. ‘अर्ज’ हा शब्द ऐकू येताच कार्यालयातले सर्व जण अचानक सावध झाले. ‘कसला अर्ज?’ पटोलेजींनी संशयाने विचारले. राज्यसभेसाठीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

‘अर्ज किया है...

मेरी बाइक की पिछली सीट जो अब तक अकेली है, इधर लगता है उसने कोई ख़ुशबू साथ ले ली है!

मगर इस बीच मैं बाइक पे जब-जब बैठता हूं तो, मुझे लगता है कांधे पर कोई नाज़ुक हथेली है!’

...बंदे को शेर-ए-हिंद ऊर्फ मोहम्मद इमरान खान ऊर्फ शायर इमरान प्रतापगढी कहते हैं...!’ मान लववून शायरसाहिबांनी पहचान-ए-खुद म्हणजे स्वत:ची ओळख करुन दिली.

‘वाहवा क्या बात, क्या बात, क्या बात!!’ नानासाहेबांनी खुली दाद दिली. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. खुर्चीत पेपरामागे दडलेले बाबाजीसाहेबही ‘व्हेरी गुड’ असे म्हणाले. फारा दिसांनी टिळक भवनात मुशायऱ्याचा माहौल तयार झाला होता. मंडळी रिलॅक्स झाली. आता खरोखर चहा येईल की काय, अशी शंका येऊन चहासाठी खोळंबलेले सीरिअसली चहाची वाट पाहू लागले.

‘चाय लोगे, बर्खुर्दार?’ नानासाहेब पटोलेजींनी कुर्त्याचा खिसा चाचपत ऑफर दिली. कार्यालयाबाहेरच्या चहावाल्याने उधारी बंद केल्याची कळ त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर येऊन विरली.

‘क्यों नही, क्यों नहीं, जब मिलते है चार यार, दिल की बात की जाय, जन्नत का मझा भी फीका है, जब मिलती दो कप चाय...!’ शायरसाहेबांनी आणखी एक (पाव) शेर टाकला. पुन्हा दाद मिळाली. नानासाहेबांनी ताबडतोब चहा मागवला.

‘अर्ज किया है...,’ शायर इमरानसाहिब म्हणाले. ‘इर्शाद, इर्शाद!’ सर्वजण उत्साहाने ओरडले.

‘अमा, राज्यसभा का अर्ज किया है, भाई...यहां महाराष्ट्रासे...हायकमांडने भेजा है, मेसेज मिला नहीं क्या?’ शायरसाहेब ओरडले. कार्यालयात शांतता पसरली. नानासाहेबांनी चहाची ऑर्डर हळूचकन क्यान्सल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com