ढिंग टांग : पुन्हा ‘हंसों का जोडा’

प्रिय मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या ऊर्फ मि.त.वा. रा. नानासाहेब यांसी, तुमच्या सल्ल्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकत आहे. पावलागणिक तुम्ही सावलीसारखे सोबत आहात, याची जाणीव होते.
Dhing Tang
Dhing Tangsakal

प्रिय मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या ऊर्फ मि.त.वा. रा. नानासाहेब यांसी, तुमच्या सल्ल्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकत आहे. पावलागणिक तुम्ही सावलीसारखे सोबत आहात, याची जाणीव होते. थँक्यू! गेले साताठ महिने आपण जवळपास दररोज भेटतो आहोत. भेटलो नाही, तरी बोलतो आहोत, बोललो नाही तरी शब्दावीण संवाद चालू आहे. अनेकदा बोलावेदेखील लागत नाही. मिळती जुळती टेलिपथी यालाच म्हणतात! महाराष्ट्राच्या गेल्या साडेपाच हजार वर्षांच्या इतिहासात आपल्या जोडीचे नाव आवर्जून घेतले जाईल. पूर्वी राजकारणातला ‘दो हंसों का जोडा’ प्रसिद्ध होता. आता आपली जोडी त्याच्याही पलिकडे गेली. पुन्हा थँक्यू.

परवा आपले वंदनीय मा. मोटाभाई (पुण्यात) भेटले होते. त्यांनी ‘केम छो?’ असे प्रेमाने विचारले. मी ‘सारु छे’ असे उत्तर देत तुमच्याकडे बोट दाखवले. काही अडचण आली तर कधीही फोन करा, असे त्यांनी मला सांगितले असले तरी मी तुम्हालाच विचारणार. कारण तुमची आणि माझी वेवलेंग्थ भारी जुळते. तथापि, सध्या काही बाबतीत मार्गदर्शन हवे आहे. काही प्रश्न पडले आहेत. ते असे -

१. मंत्रिमंडळ विस्तार करण्यापूर्वी आपण भेटायचे का? की तुम्ही परस्पर जाहीर करुन टाकणार आहात?

२. विस्तारापूर्वी दिल्लीला एकदा जाऊन यायचे का? सहजच!

३. दादर भागात तुम्हाला कार्यालयासाठी एखादी जागा हवी असल्यास अवश्य कळवावे! एक मोठी जागा लौकरच उपलब्ध होते आहे, असे कळते!!

४. पुन्हा गुवाहाटीची एक श्रमपरिहाराची सहल करावी का? आमची आमदारे फार मागे लागली आहेत.

५. तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे धनुष्यबाण, पक्षाचे नाव, आमदार आणि खासदार मला मिळाले. बाकीचे कधी मिळणार?

६. आमच्या पक्षाच्या मुखपत्रासाठी नवा संपादक नेमण्यासाठी जाहिरात द्यावी काय?

...वरील प्रश्न मला आमच्या लोकांनी वारंवार विचारले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी ‘नानासाहेबांना विचारुन सांगतो’ येवढेच उत्तर दिले आहे. त्यांचे समाधान झाले. कळावे. आपला आज्ञाधारक मित्र. कर्मवीर लोकनाथ (सीएम, किसननगर) थँक्यू!

प्रिय मित्र कर्मवीरसाहेब, तुमचे पत्र आणि प्रश्नावली मिळाली. अजिबात घाई करायची नाही, हे मी तुम्हाला खूप आधीच सांगितले होते. तरीही गेल्या साताठ महिन्यात बरेच काही घडून गेले आहे.

गुवाहाटीत तुम्ही राहात होता, तेव्हा तुमचे लोक मला फोन करुन ‘आणखी किती दिवस हाटिलात ऱ्हावं लागणार?’ असे विचारत होते. आता त्यांना पुन्हा गुवाहाटीला जाण्याची स्वप्ने का बरे पडू लागली?

वंदनीय मा. मोटाभाई हे तुमच्याकडे बघून हसले म्हणून हुरळून जाऊ नये. सुरवातीला ते सगळ्यांशीच हसून बोलतात. पाहिजे तर फोन करुन मा. उधोजीसाहेबांना विचारुन घ्या! तूर्त ते प्रेमभराने हसत असले तरी त्यांचा संपूर्ण विश्वास माझ्यावरच आहे, यावर विश्वास ठेवा.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे क्रमानुसार येणेप्रमाणे.

१. विस्ताराचे तूर्त काही काढू नका. आमच्या पक्षात गडबड उडते.

२. दिल्लीला जाण्याची गरज नाही. मी आहे!

३. दादरमधल्या जागेबद्दलच्या उपलब्धतेबद्दलची माहिती मीच तुम्हाला दिली होती. तुम्ही मलाच कसली उलटी ऑफर देताय?

४. मी आयुष्यात गुवाहाटीला कधीच जाणार नाही!

५. खुर्ची, आमदार-खासदार, धनुष्यबाण, पक्षनाम यानंतर आणखी तुम्हाला काय हवे आहे? बाकीचे मिळाले तरी ठेवणार कुठे? फार भूक बरी नाही! ते अपचनाचे लक्षण!! अजून बरीच मोठी लढाई बाकी आहे, त्यावर लक्ष केंद्रित करावे. बाकी सर्व ठीक. भेटी अंती पुढे बोलूच. आपला. मितवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com