ढिंग टांग : करेक्ट कार्यक्रम?

महाराष्ट्र दौलतीचे मुखत्यार, मराठीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालीत आहेत. नेहमीप्रमाणे बेचैनीत आहेत.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

महाराष्ट्र दौलतीचे मुखत्यार, मराठीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालीत आहेत. नेहमीप्रमाणे बेचैनीत आहेत.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे, बुद्रुक. वेळ : ओढवलेली!

महाराष्ट्र दौलतीचे मुखत्यार, मराठीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालीत आहेत. नेहमीप्रमाणे बेचैनीत आहेत. दोनदा सतरंजीत आंगठा अडकोन धडपडतात. बऱ्याच येरझारा जाहल्यावर बसावयास आसन शोधितात. प्रंतु गवसत नाही. अब आगे…

उधोजीराजे : कोण आहे रे तिकडे? कुठे कडमडले सगळे?

संजयाजी फर्जंद : मुजरा महाराज! माझी याद केलीत?

उधोजीराजे : (वैतागून) ह्या:!! तुम्हाला कशाला याद करु? आमची लाडकी खुर्ची आत्ता इथं होती, गेली कुठं?

संजयाजी : (दालनात हुडकत) कुठं गेली कुणास ठाऊक! कशी होती तुमची खुर्ची? लाल, हिरवी, भगवी, पिवळी?

उधोजीराजे : (कटकटलेल्या सुरात) तुम्ही आमचे फर्जंद, आमच्या खुर्चीची देखभाल तुम्ही करायची! तुम्हीच आम्हांस विचारता? …उंच पाठीची, डावा पुढला पाय, आणि उजवा मागला पाय डुगडुगत होता! -एक पाय लंगडाच होता तसा! पण चांगली होती… (बोटं दाखवत) तीन पायाची होती, तीन!!

संजयाजी : (हनुवटी खाजवत बेफिकिरीने) असंल इथंच कुठंतरी! रिपेरीला तर नेली नसंल?

उधोजीराजे : (घाईघाईने विषय बदलत) ते खुर्चीचं जाऊ दे! राज्याचा काय हालहवाल?

संजयाजी : (खाली मान घालून) सर्व काही आलबेल आहे महाराज! चोर चोऱ्या करत आहेत, दरोडेखोर दरोडे टाकत आहेत, सर्व आघाड्यांवर आपला ठरल्याप्रमाणे पराभव होत आहे!!

उधोजीराजे : (चवताळून) खामोश!

संजयाजी : (रडवेल्या सुरात) घात झाला, महाराज, घात झाला! गनिमानं दिवसाढवळ्या डाव साधला, महाराज! आपल्या गोटात शिरुन त्यांनी दरोडा घातला!!

उधोजीराजे : (डोळे फिरवत) क्काय? व्हॉट? क्या?...आणि हे घडत असताना आपली फौज झोपा काढत होती काय?

संजयाजी : (कबुली देत) होय महाराज!

उधोजीराजे : नतद्रष्ट, पाजी, निमकहराम!!...गनिमाची ही मजाल? दिवसाढवळ्या माझ्या मराठी दौलतीवर दरोडा घातला? आम्हाला वेळीच का कळविले नाहीत?

संजयाजी : (चाचरत) आपणही झोपला होता महाराज!! (जीभ चावून) म्हंजे रात्रीचा दीड वाजला होता…

उधोजीराजे : (इकडे तिकडे बघत खोल आवाजात) ते स्टुल तरी आणून दे फर्जंदा! आमच्या पायातलं बळ गेलंय!!

संजयाजी : (बसायसाठी स्टुल देत) बसा की निवांत!!

उधोजीराजे : (घाम पुसत) हाच काय तो आमचा करेक्ट कार्यक्रम?

संजयाजी : (नकारार्थी मान डोलावत) ऊंहूं! खरा करेक्ट कार्यक्रम रात्री दीड नंतरच झाला महाराज!

उधोजीराजे : (खचलेल्या सुरात) कळू द्या तरी आम्हाला!!

संजयाजी : (तपशीलवार सांगत) त्याचं असं झालं की, रात्री उशीरा निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा आपल्या गोटात दरोडा पडल्याचं उघडकीस आलं! रीतसर पोलिस कंपलेंट करायला गेलो, तिथं सगळा घोटाळा झाला…

उधोजीराजे : (संतापून) पाल्हाळ लावू नकोस! थोडक्यात सांग…ही काही सकाळी सव्वानऊची पत्रकार परिषद नाही!! दरोड्यात नुकसान किती झालं?

संजयाजी : (सहज स्टोरी कंटिन्यू करत) किती मोत्ये गळाले, सांगता येणार नाही, महाराज! पण ‘मतं फुटली, मतं फुटली’ म्हणता म्हणता आपले काही सरदारच गुजरातला पळून गेले, महाराज! आपल्याच गडाला खिंडार पडलं! तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं राहिलं…

उधोजीराजे : (खोल आवाजात )…आणखी काय करेक्ट कार्यक्रम बाकी राहिलाय? जगदंब, जगदंब!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com