ढिंग टांग : प्रॉम्प्टर : एक नाटुकले!

असेल तिसरा किंवा चौथा. नेपथ्य : पत्रकार परिषदेतल्या खुर्च्या, ध्वनिक्षेपक वगैरे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

असेल तिसरा किंवा चौथा. नेपथ्य : पत्रकार परिषदेतल्या खुर्च्या, ध्वनिक्षेपक वगैरे.

प्रवेश : असेल तिसरा किंवा चौथा. नेपथ्य : पत्रकार परिषदेतल्या खुर्च्या, ध्वनिक्षेपक वगैरे.

पात्रे : दोन! (खुलासा : नाटकाचे बजेट लहान असल्याने पात्रयोजना मर्यादित.)

कर्मवीर : (माइक बंद करुन) तुम्ही सुरवात करता की मी करु?

नानासाहेब : (धोरणीपणाने) तुम्ही करा! बरं दिसेल!!

कर्मवीर : (मनमोकळेपणाने) तुम्ही डायरेक्टर! तुम्ही सांगाल तसं करु!! अमिताभ बच्चनसुध्दा डायरेक्टरची प्रत्येक सूचना ऐकतात म्हणे!

नानासाहेब : (हरभऱ्याच्या झाडावर चढवत) महाराष्ट्राच्या राजकारणातले तुम्ही अमिताभ बच्चनच आहात!

कर्मवीर : (संकोचाने) तुम्हीही बोलण्यात मागे नाही हां! म्हणून तर मी तुमची स्क्रिप्ट साइन केली!!

नानासाहेब : (मूळ विषयाकडे गाडी वळवत) सुरवात जोरदार करायची, पुढचं सगळं मी सांभाळून घेतो!

कर्मवीर : (उत्साहात) पहिलाच आवाज असा लावतो की बघाच! टाळी पडली पाहिजे!!

नानासाहेब : (डायरेक्टर स्पीक्स…) पहिल्याच वाक्याला अटॅक करायचा! ‘‘बोला, सोडणार का महाविकास आघाडी? आहे का हिंमत? खरे मर्द असाल तर...’’ वगैरे वगैरे संवाद इथंच म्हणून टाकायचे!!

कर्मवीर : (प्रॅक्टिस करत) ‘‘आठवा, आठवा ते जुने दिवस! थोरले साहेब होते तेव्हा त्यांनी जोड्यानं मारलं होतं, आणि तुम्ही? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय? अरे, थू तुमच्या जिनगानीवर…असल्या नेभळट नेतृत्वाला कोण विचारतो?...(नानासाहेबांकडे वळून) हे ठीक आहे ना?

नानासाहेब : (गाल खाजवत) आवाजात अजून म्हणावा तसा दम येत नाहीए!! ‘‘अरे, थू तुमच्या जिनगानीवर…’’ हे वाक्य कसं सणकन गेलं पाहिजे!

कर्मवीर : (कडक आवाज लावत) अरे, तुमचे हात काय केळी खायला गेले?’’ हे कसंय?

नानासाहेब : (नाक मुरडत) नको! चाळीस रुपये डझन पडतात हल्ली केळी!!

कर्मवीर : (हार पत्करत) तुम्हीच ओपन करा ना सीन! पुढचं मी बघून घेईन!

नानासाहेब : (समजूत घालत) वाईट दिसतं ते! तुम्ही हिरो आहात या नाटकाचे! मी साइड हिरो आहे! मीच सीन खाल्ला असं म्हणतील लोक! मग तुमची काय पत राहिली?

कर्मवीर : (भोळेपणाने) तुम्ही लिहून दिलेले संवाद धड पाठ होत नाहीत हो! केवढं अवघड आहे, हे!!

नानासाहेब : (धीर देत) मी आहे ना, तुमच्या बाजूलाच बसलेला आहे! काही काळजी करु नका! मी करतो बरोब्बर प्रॉम्पटिंग!

कर्मवीर : (आयडिया सुचचत) नाही तर असं करु या का? मी नुसते ओठ हलवतो, तुम्हीच म्हणा संवाद!

नानासाहेब : (हतबुद्ध होत) तुमच्या आणि माझ्या आवाजाचा पिच वेगळा आहे, कर्मवीर! बघा, ‘गदर म्हंजे उठाव, गदर म्हंजे क्रांती’ हा तुमचा गाजलेला डायलॉग आठवा, आणि माझा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हा आठवा! किती फरक आहे आवाजात! डबिंग नको, प्रॉम्प्टिंगच बरं!!

कर्मवीर : (धीर एकवटून) बरं, बरं! मग करु सुरवात?

नानासाहेब : (प्रोत्साहन देत) शुभस्य शीघ्रम!

कर्मवीर : (गोंधळून) काय म्हटले?

नानासाहेब : (संयमानं) काही नाही, संस्कृतमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिल्या, इतकंच!

कर्मवीर : (घसा खाकत सुरवात करत..) माझ्या पत्रकार बांधवांनो, आणि भगिनीन्नो, आद्य क्रांतिकारकांच्या स्मृतीला वंदन करुन आसिंधुसिंधु (अडखळत) मा..म…मात…

नानासाहेब : (कुजबुजत कानात) मातृभू मातृभू…

कर्मवीर : (हातपाय गाळत) तुम्हीच वाचा ना…

नानासाहेब : यात्रा, यात्रा…गौरव यात्रेचं सांगा!

कर्मवीर : (शिताफीने प्रवेश गुंडाळत) यापुढला तपशील आमचे नानासाहेब सांगतील! धन्यवाद! जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com