ढिंग टांग : पुतीन जिवंत आहेत का?

सुप्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर संस्था ‘एमआय-६’ या संस्थेच्या गुप्तचरांनी अतिशय गोपनीय अहवाल जगजाहीर केला.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

सुप्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर संस्था ‘एमआय-६’ या संस्थेच्या गुप्तचरांनी अतिशय गोपनीय अहवाल जगजाहीर केला.

सुप्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर संस्था ‘एमआय-६’ या संस्थेच्या गुप्तचरांनी अतिशय गोपनीय अहवाल जगजाहीर केला असून, त्यानुसार रशियाचे हुकूमशहा व्लादिमीर पुतीन यांचा ग्रंथ सहा महिन्यापूर्वीच आटोपला असून सध्या पुतीन यांच्याजागी त्यांचा तोतया वावरत आहे. गुप्तचर संस्थेच्या गुप्तवार्तेने जगभरातील राष्ट्राध्यक्ष बावचळले. तसे होणे स्वाभाविकच होते. पुतिन यांच्याशी नुकतेच हस्तांदोलन करुन आलेले राष्ट्रप्रमुख

एकमेकांना फोन करुन ‘तरीच मला हाताचा स्पर्श वेगळा वाटला हां’ असे सांगू लागले. काही देशांच्या प्रमुखांनी मागे पुतीन यांना आलिंगने दिली होती. त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. पण ‘आलिंगनाच्या वेळी आपले लक्ष फोटोग्राफरकडे अधिक होते, त्यामुळे नीट कळले नाही’ असे संबंधित देशांच्या प्रमुखांनी प्रांजळपणे कबूल केले. प्रश्न उरला तो उरलाच.- ‘पुतीन जिवंत आहेत का?’ ‘एमआय-५’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेचा विश्वविख्यात गुप्तहेर जो की जेम्स बाँड याला पुतीन यांचा ठावठिकाणा शोधून काढण्याच्या कामगिरीवर धाडण्याचा निर्णय ‘मि. मो’ (मि. एम यांना आता मि. मो.असे म्हणतात. ‘मो’ म्हटले की ‘मोदीजी’ हे समीकरण वाचकांनी आता डोक्यातून काढून टाकावे! फार झाले!! ) यांनी घेतला. जेम्स बाँड ऊर्फ ००७ तेव्हा पुढील चित्रपटाच्या चित्रिकरणात आकंठ बुडाला होता. तरीही त्याने जग वाचवण्यासाठी धाव घेतली.

मि. मो, पुतीन जिवंत आहेत का? हा एक प्रश्न नसून चार प्रश्न आहेत,’ बॉडने बुद्धिमान चेहरा धारण करुन सुनावले. मि. मो हतबुद्ध झाले. त्यांनी हाताच्या पंजावर आकडेमोड केली. एकच भरली.

‘ते कसं काय?’ एका बोटाकडे निरखून बघत ते म्हणाले. ‘पुतीन जिवंत आहेत का? जिवंत पुतीन आहेत का? आहेत का पुतीन जिवंत? आणि ‘का आहेत पुतीन जिवंत’? हे ते चार प्रश्न…या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. कामगिरी टाइमखाऊ आहे, आधीच सांगतो, नंतर बोलू नका…,’ जेम्स बाँडने पुन्हा सुनावले. मि. मो हादरले. त्यांच्या घरी कामाला आलेल्या रंगाऱ्याने याच भाषेत त्यांना ‘रंगकाम कसे अवघड असते’ हे नुकतेच समजावून सांगितले होते. गेले महिनाभर तो रंगारी मि. मो यांच्या घरी मुक्कामी आहे, आणि ते स्वत: हल्ली हपिसातल्या सोफ्यावर झोपतात. असो.

जेम्स बाँड कामगिरीवर निघाला. अनेक प्रश्नांचा छडा लावण्यासाठी त्याला तीन डझन सुंदर युवतींशी सामना करावा लागला. एकदा तर बैकल सरोवराच्या किनाऱ्यावर फेसाळ लाटांच्या मधून उगवलेल्या कमनीय…जाऊ दे. (वाचकांनी असले काही वाचण्याची सवयही सोडावी! फारच झाले!!) काही तासातच तो मि. मो यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, ‘पुतीन जिवंत आहेत का? याचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्ही आहे!’

‘याला काय अर्थय? हे काय उत्तर झालं? तुझी लाय डिटेक्टर टेस्ट घ्यायला हवी!,’ मि. मो भडकून म्हणाले.

‘केजीबीचे प्रमुख लायकोव खोटार्डोवस्की हे माझे मित्र आहेत. मी त्यांना थेट विचारु शकलो असतो; पण त्यांना लायका खोटार्डोवा नावाची सुंदर मुलगी आहे...,’ बॉण्ड सांगू लागला. मि. मो अधीरतेने (पक्षी : मिटक्या मारत) ऐकू लागले…

खोटार्डोवस्कीच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यापूर्वी ज्याचा ग्रंथ आटोपला, तो पुतीन यांचा तोतया होता,’ बॉण्ड शांतपणे म्हणाला. सारांश, ‘पुतीन जिवंत आहेत का? हा प्रश्नच आता मेल्यात जमा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com