ढिंग टांग : मोटाभाईंचा तास आणि दोन विद्यार्थी!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) कालचा दिवस विसरु म्हणता विसरता येणार नाही. ‘येऊन भेटा’ असा दिल्लीहून निरोप आला.
Dhing Tang
Dhing TangSakal

आजची तिथी : शोभन संवत्सरे श्रीशके १९४५ ज्येष्ठ कृ. प्रतिपदा.

आजचा वार : मंडेवार.

आजचा सुविचार : छडी लागे छम छम, विद्या येई घमघम…छम छम छम..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) कालचा दिवस विसरु म्हणता विसरता येणार नाही. ‘येऊन भेटा’ असा दिल्लीहून निरोप आला. येताना मा. कर्मवीरांना घेऊन या’ अशीही सूचना होती. ताबडतोब दिल्लीला गेलो. वंदनीय मोटाभाईंकडे पोचलो. त्यांच्या पीएने ‘क्यारे आव्या?’ असे विचारले. ‘अमणाज’ असे उत्तर दिले, पण तिथे अडीच तास बसून होतो, हे काही त्याला सांगितले नाही.

‘वही पेन्सिल आणली का?’ पीएसाहेबांनी अचानक विचारले. कर्मवीर हादरलेच! त्यांना वहीपेन्सिल जवळ ठेवायची सवयच नाही. ‘आमच्या जुन्या पक्षात तशी सोयच नव्हती’, असं ते पुटपुटले. ‘भणवा आवे छे!’ असे पीएसाहेब नापसंतीने पुटपुटले. कर्मवीरांना वाटले तो शिव्या देत आहे. मग मीच गुजराती भाषेत ‘भणवा’ म्हणजे अभ्यास करणे हा अर्थ सांगितला. मग ते समाधानाने हसले. मी माझ्या जवळच्या वहीतली पानं फाडून त्यांना दिली. एक पेन्सिलही उधार दिली. नंतर परत करा, असे सांगायला विसरलो नाही. तेवढ्यात मा. मोटाभाई आले…

आम्ही दोघेही अदबीने उठून उभे राहिलो. मोटाभाईंनी ‘शुं काम?’ असे विचारले. आम्ही सविस्तर महाराष्ट्रातील विषय मुद्देसूद मांडले. मंत्रिमंडळ विस्तार, बारसु प्रकल्प, सहकार खात्यातल्या समस्या, कोकणातील सिंचन (हाहा! हा नवीनच विषय आला!) असे विषय एकापाठोपाठ एक मांडले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोटाभाईंनी मौलिक सूचना केल्या. ते म्हणाले, ‘वाचाळवीरांना कॅबिनेटमध्ये स्थान द्यायचं नाही! ज्यांचा मतदारसंघात काही इंपॅक्ट नाही, त्यांनाही घ्यायचं नाही! ज्यांची निवडून यायची क्षमता नाही, त्यांना तर अजिबातच घ्यायचं नाही! जे काम करत नाहीत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, आणि...’

पुढले काही ऐकू येईनासे झाले!! मंत्रिमंडळ विस्ताराच्या सूचना लिहून घेता घेता शुद्धच हरपली. जाग आली, तेव्हा शेजारी बसून आमचे कर्मवीर कांदा हुंगत होते. मोटाभाई बसले होते, ती जागा रिकामीच होती. तास संपला होता. आम्ही तिथून निघालो. रस्त्यात जाताना कर्मवीर म्हणाले, ‘तुम्ही काय काय ऐकलं?’

‘तुम्ही ऐकलं तेच, आणि तेवढंच!,’ मी चतुराईने म्हणालो.

‘वाचाळवीरांना काढा म्हणतात, काय करायचं?’ कर्मवीर पडेल आवाजात म्हणाले. ‘आहेत कुठे आपल्याकडे वाचाळवीर? कोणालाही काढायचं कारण नाही!’ मी म्हणालो. त्यांचा चेहरा थोडा उजळला.

‘मतदारसंघात इंम्पॅक्ट असलेला आमदार शोधायचा कुठे?’ कर्मवीर.

‘सगळेच इंपॅक्टवीर आहेत की आपले!’ आम्ही. कर्मवीरांचा चेहरा आणखी थोडा उजळला.

‘निवडून येण्याच्या क्षमतेचं कलम थोडं कठीण वाटतंय!,’ कर्मवीरांनी दाढी खाजवली.

‘सगळे प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील…अजिबात काळजी करु नका!’ मी फायनल दिलासा दिला. कर्मवीर सद्गदित झाले. त्यांनी पांढऱ्याशुभ्र प्यांटीच्या खिशातून पांढराशुभ्र रुमाल काढला…

‘जे काम करत नाहीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असं म्हणाले ते! मला टेन्शन आलंय!’ कर्मवीर धीर खचून म्हणाले.

‘तुम्हाला कसलं टेन्शन? रात्री अपरात्री किती कामं करता!’ मी पाठीवर थाप मारत त्यांना धीर दिला.

‘असं म्हणता? मग मुंबईला गेल्या गेल्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करुन टाकू!’ कर्मवीरांना उत्साह आला.

‘छे, छे, अहो, विस्तार कधी करायचा, हे कुठं मोटाभाईंनी सांगितलंय?’ मी शांतपणे म्हणालो.

...एकंदरीत दिल्ली दौरा खूपच सकारात्मक झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com