ढिंग टांग : सैंया हमार गईल पटना...!

बिहारमध्ये आमचे परममित्र आणि माजी, आजी आणि भावी मुख्यमंत्री नितीशेकुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Dhing Tang
Dhing Tangsakal

बिहारमध्ये आमचे परममित्र आणि माजी, आजी आणि भावी मुख्यमंत्री नितीशेकुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी राहून मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री नितीशेकुमार यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करितो.

त्यांनी पुढील तीन टर्म्सचे शपथविधीचे कागद झेरॉक्स करुन घरी नेले. माननीय राज्यपालांनीच त्यांना ‘घरी घेऊन जा, पुढल्या वेळेस ऑनलाइनच समारंभ करुन टाकू, दरवेळी का येथे येता?’ असे त्यांना (कागद सुपूर्द करीत) सांगितले. तथापि, नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ते तडक वीर विनोद तावडेजी यांच्याकडे गेले, हे देशाला ठाऊक व्हायला हवे. कां की, त्यांच्या नवव्या विजयाचे शिल्पकार आपल्या सर्वांचे लाडके वीर विनोदजी हेच आहेत!! ‘न रहती गर वीर विनोदजी की मर्जी, तो काहे की बनी रहती कुर्सी?’ असे कृतज्ञ उद्गार नितीशेकुमार यांनी नंतर काढले, ते काही उगाच नाही.

बिहारमधील राजकीय गणिते अचूक मांडत विजय हासिल करणाऱ्या वीर विनोदजी यांचे कवतिक करावे तितके थोडेच. ‘बिहार जिंकून या’ असा पक्षादेश आल्यानंतर निरलस कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी पाटण्याकडे कूच केली. ‘वीर विनोदजी पटने पहुंचे...’ ही बातमी बिहारमध्ये पसरताच राजकीय पटावर हालचाली वाढल्या. त्यांनी अतिशय धूर्त खेळी करत नितीशेकुमार यांचे मुख्यमंत्रीपद (नवव्यांदा) सुनिश्चित केले. होय, वीर विनोदजी हेच बिहार मोहिमेचे अध्वर्यु होते, सूत्रधार होते, कर्णधार होते. आज पाटण्यात वीर विनोदजी यांचे बिहारी भाषेत पोवाडे गाईले जात आहेत.

सैंया गईलबा पटना हमार,

रख्खो जी रेडी लिट्टीचोखा तय्यार...

...हे लोकगीत सध्या तेथे खूप गाजते आहे. बिहार-विजयाचे शिल्पकार वीर विनोदजी यांची आम्ही जातीने भेट घेतली, तेव्हा ते लिट्टीचोखाचा आस्वाद घेत होते. त्यांना बघताच राष्ट्रीय क्षितीजावर नवा सूर्य उगवतो आहे, असा भास आम्हाला होऊन आमचे डोळे दीप दीप दिपले...

‘तसं अवघड काम होतं, पण रामकृपेने माझ्या हातून घडलं...!’ वीर विनोदजी यांनी हवेतल्या हवेत उत्तर दिशेला नमस्कार करुन भक्तिभावाने मान तुकवली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पदच्युत करायचे, राजीनामा द्यायला भाग पाडायचे, नंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनाच शपथ घ्यायला लावायची, ही कामगिरी वाटते तितकी सोपी नाही. याला म्हंटात राजकीय धोबीपछाड.

महाराष्ट्रातील चाणक्यालाही हे कदापि जमले नसते!!

‘कसं काय बुवा जमवलंत?,’- आम्ही. (अर्थात डोळे मिटून!..आमचे डोळे ऑलरेडी दिपले होते, हे आधी स्पष्ट केले आहेच.)

‘आमचा पक्ष नेहमीच तरुण नेतृत्त्वाला संधी देतो! त्यानुसार मी नितीशेकुमारजींना म्हटलं, तुम्ही व्हा मुख्यमंत्री, आम्ही तुम्हाला संधी देतो! त्या संधीचं चीज करा, आणि बिहारचं सोनं करा!’ पुढ्यातली लिट्टीचोखाची प्लेट उचलत वीर विनोदजींनी आपला ‘खेला’ सांगितला.

‘मग?,’ आम्ही. (उत्सुकतेने डोळे उघडून.)

‘नितीशेकुमार हा बिहारमध्ये नवा चेहरा आहे!,’ वीर विनोदजी म्हणाले.

‘नववा चेहरा म्हणायचं असेल तुम्हाला!,’ आम्ही.

‘नवा आणि नववादेखील!’ वी. वि.

‘बरं, मग नितीशजी काय म्हणाले?,’ आम्ही.

‘ते म्हणाले ‘हो’!,’ वीर विनोदजी शांतपणे उत्तरले.

‘मग तुम्ही काय म्हणालात?’ आम्ही.

‘आम्ही म्हणालो, बरं!’ वीर विनोदजी.

‘पुढं?’’

‘पुढं त्यांनी बाणेदारपणाने राजीनामा फेकला, आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!,’ वीर विनोदजींनी खुलासा केला. हे केवळ अद्भुत होते! केवढे हे चातुर्य!!

वीर विनोदजी यांना महाराष्ट्रात पाठवून योग्य तो खेला करावा, असे सांगण्यासाठी आम्ही दिल्लीला निघालो आहोत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com