ढिंग टांग : ना हाटेल, ना झाडी, ना डोंगार...!

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात निवडणुका पार पडून तीन मुख्यमंत्रीही निवडले गेले, यावर विश्वास ठेवणे अशक्य झाले आहे.
Dhing tang
Dhing tangsakal

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात निवडणुका पार पडून तीन मुख्यमंत्रीही निवडले गेले, यावर विश्वास ठेवणे अशक्य झाले आहे. आमचा संपूर्ण वेळ वाया गेला! वास्तविक या तीन निवडणुकांवर पुढले तीनेक महिने खेचता येतील, असे आम्हाला एक (हाडाचा) पत्रकार म्हणून वाटले होते. पण आमचा हा अंदाजदेखील चुकला. इतक्या नीरस, कंटाळवाण्या आणि जांभईयुक्त निवडणुका भारतीय इतिहासात फार क्वचितच झाल्या असतील.

वास्तविक, काही टीव्ही वाहिन्यांनी (कुणीही न सांगता आगाऊपणाने) एग्झिट पोल घेऊन तोंड पोळून घेतले होते. सगळेच्या सगळे अंदाज चुकले. परंतु, निवडणुकीत रंगत आणण्यासाठी ते मुद्दामच चुकवण्यात आले होते, असे नंतर कळले!! हे एकवेळ ठीक आहे. एग्झिटपोलकडे आम्ही करमणूक म्हणूनच पाहात होतो. पण निदान एग्झिट पोलनंतर (तरी) या तिन्ही राज्यात थरारक राजकीय प्रसंग बघायला मिळतील, या अपेक्षेने आम्ही (टीव्हीला) नाक लावून बसलो, पण व्यर्थ! काहीही घडले नाही...असल्या विरसयुक्त पांचट लोकशाहीला आम्ही जाहीर नाक मुरडत आहो.

किती कंटाळवाणे दिवस! निवडणुका जाहीर झाल्या. जाहीर झालेल्या दिवशी पार पडल्या. निकाल लागले, आणि मुख्यमंत्री ठरला. शपथविधीची तारीखही ठरली. यात लोकशाही कुठे आली? ना एखादे विमान गुवाहाटी किंवा सुरतच्या दिशेने उडाले, ना पंचतारांकित हाटेलांमध्ये पाहुणचार झोडणारे आमदार बघायला मिळाले. ना टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारांनी हाटेलाच्या प्रवेशद्वारी गर्दी केली.

ना कुणी नेता मध्यरात्री उठून दुसऱ्या नेत्याची गपचूप भेट घेण्यासाठी ‘हुडी’ परिधान करुन गेला. ना खलबते, ना मसलती, ना राजकीय धोबीपछाड, ना काही! झणकेदार मुर्गीच्या रश्शाच्या अपेक्षेने ताटासमोर बसावे, आणि ताटात कोबीच्या भाजीचा ढीग येऊन पडावा, तस्से झाले!

मध्य प्रदेशात शिवराज सिंह ऊर्फ मामाजी चौहान यांनी विजय मिळवला, पण मुख्यमंत्रिपदी कुणी एक मोहन यादव म्हणून एक उज्जैनचे गृहस्थ (बसवण्यात) आले. छत्तीसगडमध्येही कुणीएक विष्णुदेव साय नामक गृहस्थांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्याचा आदेश (फोनवरुन) मिळाला. त्याप्रमाणे घडले. मध्य प्रदेशात मामाजींनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना पेढा भरवला. त्यांनी तो कसनुसे हसत खाल्ला. किस्सा खतम!

किमान पंधरा दिवस तरी तिथला ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा कार्यक्रम गाजत राहील, ही आमची अटकळ एग्झिट पोलसारखीच सपशेल तोंडावर आपटली. गेलाबाजार, कुणीतरी मुख्यमंत्रिपदाची आस लागलेल्या इच्छुकाने आपल्या सर्व समर्थक आमदारांना (गंमत म्हणून) मुंबईत तरी आणायचे. इथे पंचतारांकित हाटेलांची काय कमी आहे?

छत्तीसगडमध्येही तसेच! विष्णुदेव साय हे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर झाल्यानंतर आम्ही ‘काय?’ असे केवळ ‘साय’ला यमक साधण्यापुरते ओरडलो. तेवढेच नाट्य!! बाकी सगळा नीरस कारभार. अशाने देशातील लोकशाहीचे कसे होणार, या चिंतेने आम्हाला तूर्त ग्रासले आहे.

राजस्थानकडून आम्हाला राजकीय मनोरंजनाच्या प्रचंड अपेक्षा होत्या. कां की, तेथे हाटेले आणि रिसॉर्ट उत्तम प्रतीचे आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी नावेही दणदणीत होती. पण डोंगर, झाडी वगैरे जरा कमीच!! तथापि, तिथेही निराशाच झाली. तेथेही मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर झाले आहे.

यापेक्षा आमचा महाराष्ट्र बरा!! येथे अपेक्षाभंगाचे दु:ख नाही.

भारतीय संघराज्याच्या ढाच्याला नख लावण्याच्या दिशेने सत्ताधाऱ्यांची पावले पडत आहेत, या सुरावटीचा लेख लिहायला घ्यावा लागेलसे दिसते. छे! काळ तर मोठा कठीण आला. काय त्या निवडणुका, काय ते निकाल, आणि काय ते मुख्यमंत्री ठरवणे... नॉट ओक्के!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com