ढिंग टांग : दांडपट्टा : एक अमोघ राज्यअस्त्र…!

मुलांनो, आज आपण एका शस्त्राची ओळख करुन घेणार आहोत. हे शस्त्र ऐतिहासिक काळापासून प्रचलित आहे. त्याचे नाव दांडपट्टा.
Dhing Tang
Dhing TangSakal

मुलांनो, आज आपण एका शस्त्राची ओळख करुन घेणार आहोत. हे शस्त्र ऐतिहासिक काळापासून प्रचलित आहे. त्याचे नाव दांडपट्टा. तुम्ही पाहिला आहे का? नाही, नाही…तुम्ही जो पट्टा आजवर बघितला तो कमरेचा पट्टा. त्याने नको त्यावेळी पोटावरुन उतरणारी विजार जाग्यावर ठेवता येते.

ते काही जीवसंरक्षक अस्त्र नव्हे, फार्तर त्याला लज्जारक्षक वस्तु म्हणता येईल. मुलांनो, माझ्या हातात जे आहे त्याला नुसतीच पट्टी म्हणतात. ती सट्टदिशी ओढतात. कुठे माहीत आहे ना मुलांनो?

दांडपट्टा यापेक्षा खूप वेगळा असतो. एक लोखंडी मूठ ऊर्फ खोबळा असतो. त्या खोबळ्याला पुढे लवलवणारे लोखंडाचेच पाते असते. दांडपट्टा उभा धरता येणे कठीण असते. दांडपट्टा चालवण्यात आपले मावळे खूप प्रसिद्ध होते. बरेच मावळे आजही पट्ट्याने नारळ फोड, पोटावर लिंबू ठेवून उडव, ऊसाचे दांडके काप, असे उद्योग करतात. पण मूलत: हे युद्धात वापरायचे हत्त्यार आहे.

दांडपट्टा घेऊन एखादा मावळा अंगावर आला की मोगल चीची करीत पळून जात असत. कारण हा लवचिक पट्टा कुठेही भस्सदिशी घुसू अगर लागू शकतो. दांडपट्टा गरागरा गरागरा गरागरा फिरवू लागले की अशा योद्ध्याच्या जवळ जायला घोडेस्वारदेखील बिचकत असत. घोडेस्वार बिचकला नाही, तरी घोडे तरी नक्कीच बिचकत असे.

मुलांनो, तुमची एखादी ताई किंवा दादा दोरीवरच्या उड्या मारत असतील, तर तुम्ही त्यांच्या जवळ खोडी काढायला जाल का? नाही ना? कारण उघड आहे. उड्यांची दोरी तुमच्या पायात अडकून तुम्हीच दाणकन पडाल, आणि तुमचे (पुढचे) दोन दात पडतील. हो की नाही? तसेच दांडपट्ट्याचे असते.

दांडपट्ट्याला खूप मोठा इतिहास आहे. महाभारत काळात याला पट्टीश असे इंग्रजीत म्हणत असत. काही लोक या शस्त्राला पाटा असेही म्हणतात. पण सैपाकघरातील पाटा-वरवंटा ही वेगळी शस्त्रे आहेत. तीदेखील घातकीच आहेत. असो. दांडपट्ट्याला दांडपट्टा असे का म्हणतात, ते आपण आता पाहू.

पट्टा समजण्याजोगा आहे, पण हा ‘दांड’ शब्द कुठून आला असेल, असा प्रश्न पडतो. दांड म्हटले की भलतेच काही आठवते. पण तसे नसावे!! मुलांनो…एक मिनिट गप्प बसाऽऽ…अज्जिबात कुणी गडबड करायची नाही. ‘दांड’ या शब्दाशी यमक जुळवणारे शब्द उच्चारलेत, तर खबर्दार!! पट्टीने मारीन!!

मुलांनो, दांडपट्टा हे आता महाराष्ट्राचे राज्यशस्त्र होणार आहे. तशी घोषणा आपल्या सर्वांऽऽचे लाडकेऽऽ सांस्कृतिक-कम-वनमंत्री माननीय सुधीर्जी मुनगंटीवार यांनी केली आहे. हे गृहस्थ इतिहासातून बाहेर यायला तयार नाहीत!! वाघनखांचा ताप उतरला नाही, तेवढ्यात त्यांनी हा दांडपट्टाच बाहेर उपसून काढला आहे. काय बोलणार? याच गृहस्थांनी मध्यंतरी पापलेटाला राज्यमासा ठरवले होते. पापलेट राज्यमासा झाल्यामुळे काही विरोधकांनी सुक्या बोंबलासारखी बोंब मारली. पण मुनगंटीवारसाहेब बधले नाहीत.

दांडपट्टा हे राज्यशस्त्र आजही वापरात आहे. ते मुळीच प्राचीन नाही. जवळपास प्रत्येक मराठी माणसाकडे दांडपट्टा असतोच. हा दांडपट्टा जिभेचा असतो, मुलांनो! जिभेचा दांडपट्टा फिरवणाऱ्या रणरागिणी घरोघरी बघायला मिळतील. परंतु, हल्ली राजकारणात या शस्त्राचा उपयोग प्रचंड प्रमाणात होतो. तेव्हा मुलांनो, या राज्यशस्त्राचा आपण सारे सन्मान करुया.

इतिहासात गाजलेला कुठला तरी दांडपट्टा आणण्यासाठी आपले मुनगंटीवारसाहेब पुन्हा कुठे तरी परदेश दौऱ्यावर जातील की काय अशी भीती आहे. तेव्हा मुलांनो, सावधान! तोवर (तरी) आपापल्या जिभेचे दांडपट्टे मुकाट्याने म्यान करा. जय महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com