ढिंग टांग : दिल्ली का ठग...!

नागपूर मुक्कामी आपल्याच पक्षाच्या एका माननीय आमदारांना एका अज्ञात इसमाचा फोन आला.
Dhing Tang
Dhing Tangsakal

डिअरम डिअर होममिनिष्टर मा. फडणवीसनाना यांसी, म. पो. ह. बबन फुलपगार (बक्कल नं. १२१२ कदकाठी ५ फू. ५ इं, उमर ४५, वजन ४५, छाती (फुगवून)२६,) याचा कडक सॅल्युट. निवेदण करणेस कारण कां की, एका ठकसेनाने आपल्या पक्षाच्या काही आमदारांना घोळात घेण्याचे काम चालवले असून ‘मंत्रिमंडळात जागा देतो, पैशे टाका’ असे सांगितल्याचे कळते. खरे खोटे जाणून घेण्यासाठी मी मोहिमेवर निघालो. मोहिमेचा रिपोर्ट दफ्तरी दाखल करणेसाठी हे निवेदण (होशोहवासमधे नशापाणी न करता ) लिहिले असे.

नागपूर मुक्कामी आपल्याच पक्षाच्या एका माननीय आमदारांना एका अज्ञात इसमाचा फोन आला. तो म्हणाला की ‘‘ज्याअर्थी आपले माननीय पक्षाध्यक्ष मा. नड्डाजी यांचा मी पीए असून व मंत्रिमंडळ ठरवणेचे अधिकार माझ्याकडे देणेत आले असून व आपले नाव विचाराधीन नाही, त्याअर्थी, नकद रुपये एक करोड ६७ लाख फक्त रकमेचा भरणा केल्यास नगरविकास खाते देणेचा निर्णय घेणेत येईल.’’ महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडमधील अर्धा डझन आमदारांना असे फोन गेल्याचे कळते. संशयित इसम मा. नड्डाजींचा पीए असल्याची बतावणी करीत असे.

बतावणी करुन झाल्यावर फोनवरच एक्सटेंशनवर खुद्द साहेबांशी बोला असे सांगून मा. नड्डाजींच्या आवाजात बोलत असे! साहजिकच बिचारे आमदार बळी पडत. सदरील इसम हा ठकसेन असल्याचे माहीत नसल्याकारणाने ते गंडले. अधिक तपास केला असता आपल्या पक्षात या प्रकारामुळे एकच हाहाकार उडाल्याचे दिसून आले. काही ठकसेनग्रस्त आमदार हातात कांदा घेऊन हुंगत बसले असून संशयित गुजरातेत मोरबी येथे मिळून आल्याची खबर आहे. तपासादरम्यान एका ठकसेनग्रस्त आमदार महोदयांची भेट घेतली असतावेळी हृदयद्रावक दृश्य दिसले. साहेब, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. अशा प्रकारांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे.

सदरील ठकसेनास कोणी किती रक्कम अदा केली हे समजू शकलेले नाही व अधिक तपास चालू आहे. आपण रक्कम अदा केल्याचे कोणीही आमदार कबूल करत नाही, तसेच संशयित इसमाकडेही अधिकची रक्कम मिळून आलेली नाही, असे कळते. कां की, पोलिटिकल माणसाकडून असे पैसे काढणे कठीनच असते. इथे कोण द्यायला बसले आहे? परंतु, बरेच आमदार हबकून गेले असून खुद्द मा. नड्डाजींनीही कांदे (हुंगायला) मागवल्याचे कळते. आपल्या नावावर कुणी परस्पर चारसोबीसी करत असेल तर असा हाबका बसणारच.

तथापि, ही चारसोबीसी एका आमदार महोदयांच्याच लक्षात आली. ठकसेनाने त्याला फोन करुन रु. एक कोट ६७ लाख फक्त रकमेची मागणी करताच आमदारसाहेब फिककन हसले! त्यांना आमदार निधीदेखील इतका मिळालेला नाही!! ‘एक कोट ६७ लाख अशी ऑड फिगर का?’ अशी विचारणा त्यांनी केली असता, सदरील ठकसेनाने ‘अठरा टक्के टीडीएस कापला जातो!’ असे येड्यासारखे उत्तर दिले. मग आमदार महोदयांनी रीतसर पोलिसात तक्रार गुदरुन ठकसेनाचे बारा वाजवले!

साहेब, प्रकरण एवढ्यावर संपत नाही. आपल्या पक्षातील बहुसंख्य आमदारे नाराज आहेत. सत्ताधारी (दुसऱ्या) गटातील आमदारांना पन्नास खोके भेटतात, आणि आम्हाला दीड-दीड खोका विनाकारणी द्यावा लागतो, हे काही लोकशाहीला धरुन नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या महाराष्ट्रात पोलिटिकल टेन्शन वाढले असून मंत्रिमंडळ विस्ताराची हवा चालली आहे. तेव्हा याप्रकरणी स्वत: लक्ष घालून त्वरित विलाज करावा, ही विनंती. आपला णम्र, बबन फुलपगार (म. पो. ह. बक्कल नं. १२१२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com