ढिंग टांग : माय डिअर एक्स ऊर्फ माजी फ्रेंड...!

प्रिय एक्स- फारा दिसांनी तुम्हाला लेटर लिहीत आहे. लेटरसोबत थोडी झेंडूची फुले पाठवत आहे. पूर्वीच्या काळी मी गुलाबी कागदावर लेटर लिहायची.
Dhing Tang
Dhing TangSakal

प्रिय एक्स- फारा दिसांनी तुम्हाला लेटर लिहीत आहे. लेटरसोबत थोडी झेंडूची फुले पाठवत आहे. पूर्वीच्या काळी मी गुलाबी कागदावर लेटर लिहायची. आठवतंय? ते साधेसिंपल लेटर नसून रंगीत संगीत लवलेटर असायचे. सोबत गुलाबाच्या पाकळ्याही असायच्या! (पण मी पाठवलेल्या गुलाबाचा तुम्ही चोळामोळा करता, हे मला उशीरा कळलं!!) आजही गुलाब शोधत होत्ये, पण मिळाला नाही. शेवटी झेंडूची फुलं पाठवत्ये आहे. (गुलाबपाकळ्यांचा गुलकंद होतो, तसा झेंडूकंद करा आणि खा!) गोड मानून घेणे.

आज जागतिक मैत्री दिन! फ्रेंडशिप डे!! यादिवशी तुमची आठवण आली नाही, असं हुईल का? नाही म्हटलं तरी दीर्घकाळ आपण एकत्र राहिलो. छान नांदलो! या दिवशी मी तुमच्या मनगटाला फ्रेंडशिप बँड बांधायचे. तुम्ही शिवबंधन बांधू पाहायचात. मी लाडाने म्हणायची, ‘इश्श! मनगटाशी काय बाँधताँ? गळ्यात बाँधा नॉऽऽ…’’ पण तुम्ही बधला नाहीत. नाही म्हंजे नाहीच बांधलंत. शेवटी तर म्हणालात, ‘आमची पंचवीस वर्षं सडली! सडली! सडली!’’ काळजाला कित्ती घरं पडली म्हणून सांगू?

किती छाँन दिवस होते ते! आठवले तरी मन मोहोरते…मी मेथीची भाजी आणली की तुम्ही निवडायचात. मी फोडणीला टाकली की तुम्ही पानं घ्यायचात. मी आऽऽ केला की तुम्ही भरवायचात…मी जांभई दिली की तुम्ही मच्छरदाणी लावायला घ्यायचात. मला उचकी लागली की पाणी आणण्यासाठी धावाधाव करायचात. मला शिंक आली की बामची बाटली घेऊन तयारीत राहायचात. तुम्हाला अजिबात हिंडा-फिरायला आवडायचं नाही. मला भारी आवड! तुम्हाला राग येई. आता आठवलं तरी…जाऊ दे. झालं गेलं विसरुन आपण पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित करु या का गडे?

‘जो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’

…असं महेंद्र कपूरने म्हटलंच आहे. तसंच काहीसं करु या का गडे?

बाकी मी मज्जेत आहे! तुम्ही पाश तोडलेत, (आणि नवे गळ्यात घेतलेत.) पण मी गरजू मित्रांना एकत्र केलं आहे. हिंडायफिरायची आवड असलेले गरजू मित्रच खरे मित्र असतात. ‘फ्रेंड इन नीड, इज ए फ्रेंडिंडीड’ असं म्हटलंच आहे. काही गरज लागलीच तर प्लीज कळवा. हयगय करु नका. भेटूच. कळावे. अजूनही आपलीच. कमळाबाई.

कमळेऽऽ…कैदाशिणी, तुझी हिंमत झालीच कशी मला असली थिल्लर पत्रे लिहिण्याची? इतके घडूनही तुला काहीच कसे वाटत नाही? तुझी जुनी पत्रे मी न फोडताच फेकून देत होतो. त्यामुळे तू त्यात गुलाबाच्या पाकळ्या घातल्यास की घाणेरीच्या, हेदेखील मी कधी ढुंकून पाहिले नाही. (निनावी पाकिट पाठवलेस म्हणून यावेळी चुकून मी तुझे पत्र फोडले. चूकच झाली! शी:!!)

कमळे, कमळे! किती छळशील? महाराष्ट्राला लागलेला तू कलंक आहेस, असल्या कलंकित व्यक्तीचे तोंड बघण्याची माझी इच्छा नाही. तुझ्यासोबत काढलेली पंचवीस वर्षे मी कायमची विसरलो आहे. पुन्हा पुन्हा आठवण करुन देण्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे बरे जाणून अस!

मैत्रीच्या आणाभाका घेऊन गाव उंडारणारी तू…तुला काय कळणार मैत्रीचा महिमा! मलाही तो उशीराच कळला. महाविकास आघाडीतले माझे नवे मित्र इतके सज्जन आणि मायाळू आहेत की मी सदैव त्यांच्या मैत्रीच्या ऋणात राहाणेच पसंत करीन. गोड माणसे आहेत ती!!

पुन्हा पत्र पाठवशील, तर याद राख! चेचीन! आगाऊ कुठली! उधोजी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com