ढिंग टांग : गुरुबिन कौन बतावें वाट...!

यंदाचा आमचा योगा डे सुनासुना गेला. नुसते शवासनात पडून दिवस घालवावा लागला. चारवेळा भोजनासाठी अर्धपद्मासन घालून दोन घटका बसलो तेवढेच.
Dhing Tang
Dhing Tangsakal

यंदाचा आमचा योगा डे सुनासुना गेला. नुसते शवासनात पडून दिवस घालवावा लागला. चारवेळा भोजनासाठी अर्धपद्मासन घालून दोन घटका बसलो तेवढेच. पण बाकी शून्य! गेली काही वर्षे आम्ही किती उत्साहात योगदिवस साजरा करत असू.

आमच्यासाठी तर हा सणासुदीचा योग होता. आठ-नऊ वर्षात आत्ताआत्ता कुठे आम्हाला पद्मासनात एक पाय दुसऱ्या पायावर चढू लागला होता. प्रगती होती, पण आमचे योगगुरु अमेरिकेला निघून गेल्याने फार्फार पंचाईत झाली...

२१ जून हा वर्षातला सर्वात लांबलचक दिवस. योगगुरुंच्या अनुपस्थितीमुळे तो आम्हाला खायला उठला. परिणामी आम्ही खा खा केली!! लांबलचक दिवस लांबलचक शवासन करुनच व्यतीत केला. दीर्घश्वसनाचा व्यायाम आम्ही अधूनमधून केला. नाही, असे नाही.

परंतु, दीर्घश्वसनामुळे आम्हाला दम लागतो. मग पुन्हा शवासन करावे लागते. योगगुरुंनी त्यांच्या (आमच्यासारख्या) भक्तगणांकडे पाठ फिरवून अमेरिकेस प्रयाण केले, हे काही बरे केले नाही.

गुरुबिन कौन बतावें वाट? असा टाहो योगगुरुंविना वाट लागलेल्या अनेकांनी फोडला, तो काही उगाच नाही.

ज्यांनी संपूर्ण विश्वाला योगदिनाची अमूल्य भेट दिली, त्या आमच्या योगगुरुंना आमचे त्रिवार वंदन असो! आमचे वंदनीय योगगुरु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मा. बापूसाहेब तथा जो बायडेन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सुश्री जिलकाकू यांना योग शिकवण्यासाठी कालच न्यूयॉर्क येथे पोचले. कां की बायडेन दांपत्यास सध्या योगाभ्यासाची नितांत गरज आहे.

बापूसाहेब बायडेन यांनी सांधेदुखीने बेजार असल्याची कुरकूर केल्याने योगगुरुंना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जावेच लागले. सौ. जिलकाकूंचे ऐकण्याचे मान कमी झाले आहे. त्या ‘अजिब्बात ऐक्कत नाहीत’ अशी तक्रार योगगुरुंकडे खुद्द बायडेनबापूंनीच केली. महानारायण तेल आणि योगासनांची सवय या दोन्ही गोष्टी लावल्या की सांध्यांची कुरकूर थांबते असा अनेकांचा अनुभव आहे. बायडेनबापूंचा आजार दूर होवो, याच शुभेच्छा.

अमेरिकी समाजाच्या खाण्यापिण्याच्या सवयी हादेखील एक जागतिक चिंतेचा विषय आहे. बर्गर, पिझ्झा किंवा विविध प्रकारची नूडले असे जंकी खाणे आरोग्यास अतिअपायकारक असते. त्यामुळे शरीरात मेद वाढतो, आणि बुद्धीस मांद्य येते. मेद आणि मांद्य वाढल्याने अहंकार बळावतो. मनुष्य तामसी आणि युद्धप्रवण होतो.

आपण महासत्ता आहो, असे त्यास वाटू लागते. अमेरिकेचे हेच झाले आहे. जंकभोजनाऐवजी ढोकळा, फाफडा, कचोरी, खांडवी, हांडवो, ठेपला आदी पचनास हलके पदार्थ घेतले तर देह सुटसुटीत, मन चपळ आणि मेंदू तल्लख राहातो. मनुष्यप्राण्याच्या ठायी आत्मभान येते. अशीच लोकोत्तर मनुष्ये योगदिनासारखा ठेवा जगास अर्पण करतात. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला योग अर्पावे’ हेच योगगुरुंचे ब्रीद होय.

वंदनीय योगगुरुंच्या आदेशानुसार, आम्ही स्वत: गेली नऊ वर्षे निव्वळ ‘फरसाणाहारा’वर आहो! ‘फरसाण डायट’ हे काही किटो अथवा तत्सम डायटसारखे फॅड नाही. ती एक जीवनशैली आहे. फरसाणामुळे हजारो क्यालरीज पोटात जातात. वात प्रकृती वाढीस लागते, असा एक समज आहे. परंतु, त्यास योगासनांची जोड दिली, तर फरसाणाचे रुपांतर अमृतात होते.

भय्याच्या गाडीवर ज्याप्रमाणे साध्या नळाच्या पाण्याचे रुपांतर पाणीपुरीच्या पाण्यात होते, आणि त्यात संजीवक गुणधर्म उतरतात, तसेच हे!!

अमेरिकेसारख्या महासत्तेने आमच्या योगगुरुंना निमंत्रण द्यावे, हा काही योगायोग नव्हे. परंतु, त्यामुळे आमची पंचाईत झाली. योगगुरु नसल्याने यंदा अनेक मंत्र्यांनीही वर्षातील सर्वात लांबलचक दिवस शवासनात लंबे केला. ठीक आहे... अमेरिकी बंधूभगिनींसाठी एक योग दिवस आम्ही कुर्बान केला. जय हो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com