ढिंग टांग : …अशी ही टोलवाटोलवी!

बने, बने, अशी कशी अचानक आलीस? आधी एक साधा मेसेज तरी करायचा. बरं, आता आलीच आहेस, तर ये! बने, हल्ली तू फार म्हंजे फार्फारच बनेल झाली आहेस!
Dhing Tang
Dhing Tangsakal

बने, बने, अशी कशी अचानक आलीस? आधी एक साधा मेसेज तरी करायचा. बरं, आता आलीच आहेस, तर ये! बने, हल्ली तू फार म्हंजे फार्फारच बनेल झाली आहेस! आल्याबरोब्बर येण्याजाण्याचा खर्च काय मागतेस? पैसे काय झाडाला लागतात का? बाप रे! मोटारीने कशाला आलीस? पेट्रोल किती महागलंय! आणि हे काय? टोलचे पैसे? इतके? इ-त-के? बने, बने, हल्ली खर्च वाढत चालला आहे हं तुझा…

बने, महाराष्ट्रात सर्वत्र टोलनाके आहेत. जितकी शहरे, तितके टोलनाके. किंबहुना, टोलनाका आला की कळतं, एखादं गाव आलं! पूर्वीच्या काळी नदी दिसली की माणसं वस्ती करीत. नंतरच्या काळात रेल्वे स्टेशनच्या आसपास घरं बांधत. पुढे पुढे रस्त्याच्या दुतर्फा गावं वसली. हल्ली टोलनाक्याची जागा हेरुन मगच रस्तेबिस्ते बांधतात. अर्थात रस्ता असं आपण सोयीसाठी म्हणायचं. त्याच्यावर ना डांबर, ना सिमेंट…नुसतेच खड्डे!!

प्राचीनकाळी अवघा महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची प्रतिज्ञा इथल्या अर्धा डझन पुढाऱ्यांनी घेतली होती. एका पुढाऱ्यानं तर ‘टोलचा झोल’चव्हाट्यावर आणला. दुसऱ्या पुढाऱ्यानं सटासट ४४ टोलनाके बंद करुन नवे ४४ उघडले!! तिसऱ्या पुढाऱ्यानं तर ‘सत्ता आली तर टोलनाके बंद करीन’ असं आश्वासन निवडणुकीत देऊन टाकलं.

जनताही इतकी तुझ्यासारखीच बनेल, तिनं त्याला दिलं मत, आता आली का पंचाईत! मग त्यानं लहानमोठ्या गाड्यांचा टोल यापुढे सरकार भरेल, असं जाहीर करुन वेळ मारुन नेली. परवा हेच पुढारी ‘छोट्या चारचाकी गाड्यांना महाराष्ट्रात टोल लागत नाही’ असं बेधडक सांगत होते…बने, बने, काय म्हणतेस हे? तुझ्या जिभेला काही हाड!! ते का खोटं बोलतात? त्यांची जीभ झडेल, असं म्हणताना, तुझी जीभ का नाही झडत?

गेल्या कित्येक वर्षात छोट्या चारचाकी गाड्यांसाठी टोलनाक्याचा दांडा कधी आडवा पडलेलाच नाही. चारचाकी म्हणू नकोस, तीनचाकी म्हणू नकोस, दोन चाकी काय, अगदी एक चाकी गाडीलाही हल्ली महाराष्ट्रात कुठेही टोल द्यावा लागत नाही म्हणे! पूर्वीच्या काळी…हो, हो, होच मुळी, काँग्रेसच्या काळीच म्हणणार आम्ही…तर पायी जाणाऱ्या लोकांकडूनही टोल घ्यायचे म्हणे!

एका पुढाऱ्यानं त्यातलं काव्य मात्र घालवून टाकलंन! कोण काय विचारतेस, बने! ज्यानं आजवर अडुसष्ट टोलनाके बंद केले, तेच ते शिवाजी पार्कवाले!! त्यांचा टोलनाक्यांवर प्रचंड राग आहे. दिसला टोलनाका, हाण दगड असाच खाक्या!! बने, ‘टोलमुक्त महाराष्ट्र करणार’ अशा वल्गना करुन अनेक राजकीय पक्ष सत्तेवर आले आणि गेले, पण हे शिवाजीपार्कवाले नेते काही (केल्या) कधी सत्तेवर आले नाहीत.

आम्ही जन्तेची इतकी कामं केली तर जन्ता दुसऱ्यांनाच मतं का देते? असं ते भेटेल त्याला विचारत असतात. प्रत्येक जण सांगतो, साहेब, आमचं मत तुम्हालाच!! आता काय करायचं? सांग बने!! लोकसुध्दा बनेलच ना!! शिवाय, फास्टॅगवर त्यांचा दोनदा टोल कापला गेला असणार! उगीच नाही कुणी इतकं वैतागत!!

बने, मृगजळ असतं ना, त्याच्या अगदी विरुध्द असतात टोलनाके. वाळवंटात दूरवर पाणी दिसू लागतं, जवळ जावं तर काही नाही! पण टोलनाका नाहीच्चे मुळी असं समजून गाडी पुढे दामटली की बांबू आडवा पडलाच म्हणून समज!!

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी तस्साच बांबू आडवा आला आहे, असं समज! बने, टोल भरला की टोलनाक्याचा आडवा दांडा जादू झाल्यागत उभा राहातो, हे वैश्विक सत्य आहे. बने, ही टोलवाटोलवी म्हणजेच आयुष्य बरं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com