ढिंग टांग : इव्हीएमचा नेम नाही..!

इव्हीएम हे लोकशाहीला अत्यंत घातक असे यंत्र आहे. यांत्रिकीकरणामुळे प्रदूषण होऊन वसुंधरेवरील हवामान बिघडले. तद्वत इव्हीएम यंत्रामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणाच बाद होईल, असे भय वाटते.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Summary

इव्हीएम हे लोकशाहीला अत्यंत घातक असे यंत्र आहे. यांत्रिकीकरणामुळे प्रदूषण होऊन वसुंधरेवरील हवामान बिघडले. तद्वत इव्हीएम यंत्रामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणाच बाद होईल, असे भय वाटते.

इव्हीएम हे लोकशाहीला अत्यंत घातक असे यंत्र आहे. यांत्रिकीकरणामुळे प्रदूषण होऊन वसुंधरेवरील हवामान बिघडले. तद्वत इव्हीएम यंत्रामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणाच बाद होईल, असे भय वाटते. इव्हीएमबाबत आम्ही गेली नऊ वर्षे प्रचंड चिंतन करीत आहो. सांगावयास आनंद वाटतो की आमचे चिंतन आता पूर्ण झाले असून हे यंत्र तडीपार करावे, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहो!

इव्हीएमविषयी थोडेसे : आपल्या देशात अनेक नवमतदार पहिल्यांदा मतदान करतात. त्यांना इव्हीएम हे डबडे ओळखीचे नसते. पण पहिल्या अनुभवात ही नवलाई संपते. तसे हे दिसावयास अतिशय कंटाळवाणे आणि असुंदर असे यंत्र आहे. यापेक्षा रेल्वे स्थानकावरील वजनकाट्याची यंत्रे अधिक तेज असतात, असे आमचे मत आहे. वजनयंत्रे दिव्यांची उघडझाप करते. कार्डावर वजन छापून देते, आणि पाठल्या बाजूस ‘ आप बहुत मिलनसार हो’ अथवा ‘ स्त्रीसहवास प्राप्त होने की संभावना’ असे दैनिक भविष्यही (फुकट) सांगून थोडके दिल बहलवते.

इव्हीएम यंत्राकडे अशी जबरी काव्यशक्ती नाही. एकतर मतदान हे आडोश्याला जाऊन चोरुन करण्याचे काम आहे, असा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला छेद देणारा संस्कार या यंत्रामुळे होतो. बटण दाबताच ‘प्यँऽऽऽ…’ अशी किंकाळी मारुन हे यंत्र नवमतदाराच्या मनात धडकी भरवते. आपल्या हातून काही अतिप्रसंग घडला की काय, असे वाटून अपराध भावनेनिशी नवमतदार घरी परततो. शिवाय आपण नेमके कोणाला मतदान करुन आलो, हे कालांतराने विस्मरणातच जाते.

कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल हाती येताना हा इव्हीएमचा प्रताप असल्याची आम्हाला खात्रीच पटली. कां की, राज्यातील, आणि अन्य किरकोळ निवडणुकांमध्ये हे ‘कमळ’वाले विरोधी पक्षांना जिंकवून देतात, आणि लोकसभेच्यावेळी मात्र इव्हीएम यंत्रात गडबडी करुन सत्ता हासिल करतात, अशी थिअरी आम्हाला आमचे ठाण्याचे स्मार्ट मित्र रा. बंटीसाहेब आव्हाड यांनी सांगितली. इव्हीएम यंत्रामुळे निवडणुका जिंकल्या जातात, इतकेच नव्हे, हरतादेखील येतात, हे आम्हाला ठाऊकच नव्हते! मनात म्हटले, अरे चोरांनो, (पक्षी : कमळवाले) असा गेम आहे तर!! इव्हीएमवर आमचाही विश्वास नाही, असे विश्वप्रवक्ते रा. संजयाजी राऊत यांनीही सकाळी दहाच्या आकाशवाणीत सांगितले. आता एवढे झाल्यावर त्या यंत्ररुपी डबड्यावर आम्ही विश्वास कसा ठेवणार?

एवंच, इव्हीएम या अत्यंत बेभरवशी, दगाबाज आणि कंटाळवाण्या यंत्राचा वापर तांतडीने थांबवायला हवा, असे आमचे स्पष्ट मत आहे. बटणे दाबून फार तर फोन लावता येतो, कुणी निवडून का येते? एखाद वर्षे मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेऊन बघायला काय हरकत आहे? असा सवाल आमच्या लोकशाहीपुष्ट मनात आला आहे…

मतपत्रिकांविषयी थोडेसे : ही प्राय: कागदावर छापली जात असे. त्यावर उमेदवारांची छबी, निशाणी आणि कोरी जागा असे. हव्या त्या उमेदवाराच्या नावावर शिक्का मारुन तो कागद मतपेटीच्या फटीत शिरवला की झाले! लोकशाही झिंदाबाद!

अहाहा! किती सुंदर ते दिवस होते!! त्या कागदी मतपत्रिका, ते मतदान खोके, (पक्षी : बॉक्से! ) ते मतपत्रिकांचे गठ्ठे, ती मतपेट्यांची पळवापळवी!! मोठा मनरंजक माहौल असे. काही मतदान केंद्रांवर राडेबाजी होई. मतमोजणीच्या वेळी होणारे घोळ तर अप्रतिम असत. एकेक मतपत्रिका वीस-वीस वेळा मोजून काढताना निवडणूक अधिकाऱ्यांना घाम फुटत असे. निवडणुकीचा हा घोळ बरेच दिवस चालू असे. त्याने लोकशाही टणक होई.

ते सारे सोडून इव्हीएम यंत्राच्या डबड्याचा वापर करणे हा कर्मदरिद्रीपणा आहे. एवंच, इव्हीएम मुर्दाबाद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com