ढिंग टांग : शिंके लावियले दुरी..!

सकाळपासून पावसाने संततधार धरली होती. तरीही उत्साहात कमी नव्हती. ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम’च्या तालावर विविध पक्षांचे कार्यकर्ते नाचत होते.
Dhing Tang
Dhing Tangsakal

शिंके लावियेले दुरी। होतों तिघांचे मी वरी!

तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरुनि गडे ॥

वाहती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोपरा ।

तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका॥

(काल्याचे अभंग, गाथा)

काहींनी लावलेला राजकीय (सिम्बॉलिक) अर्थ : ‘गोरसाचे शिंकाळे फार उंच लाविले आहे. मी तुम्हा तिघांच्या खांद्यावरी उभा राहातो, तुम्ही तुमची तोंडे ‘आऽऽ’ करुन दोन्ही बाजवांस उभे राहा! हंडीतील गोरसाचे मी सर्वांना समसमान वाटप करणार आहे, बरं!’

सांप्रतकाळी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शिमग्यासारखे झाल्याने त्यात सुधारणा व्हावी, या सद्हेतूने सर्वपक्षीय सिम्बॉलिक दहीहंडी आयोजित करण्याचे ठरले. मंत्रालयाच्या प्रांगणात हंडी लावावी, असा जीआर निघाला! पुढे जे काही घडले, त्याचा हा त्रोटक वृत्तांत. घटनाच त्रोटक घडल्यामुळे वृत्तांतही त्रोटकच आहे, याची नोंद घ्यावी.

सकाळपासून पावसाने संततधार धरली होती. तरीही उत्साहात कमी नव्हती. ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम’च्या तालावर विविध पक्षांचे कार्यकर्ते नाचत होते. कार्यकर्त्यांना सतरंज्या-खुर्च्या उचलण्याबरोबरच नृत्यही करावे लागते. दहीहंडी सहाव्या मजल्यावर होती. इतक्या उंचीवरली हंडी फोडण्यासाठी बरेच थरावर थर लावावे लागतील, याचा अंदाज आला…

नानासाहेब फडणवीस हाताची घडी घालून बाजूला उभे होते. काहीही झाले तरी आपण (यावेळी) पुढाकार घ्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले असावे! बावककुळेसाहेबांनी त्यांच्या कानाशी लागून ‘हंडी फोडायला घ्यायची का?’ असे विचारले. नानासाहेबांनी शेजारी उभ्या असलेल्या सीएमसाहेबांकडे बोट दाखवले. बावनकुळेसाहेबांनी सीएमसाहेबांना विचारले. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या दादासाहेब बारामतीकरांकडे बोट दाखवले. दादासाहेबांनी परस्पर पुन्हा नानासाहेबांकडेच बोट दाखवून घड्याळात पाहण्यास सुरवात केली! बराच वेळ असे सारे सिंबॉलिक चालले होते…

अखेर नानासाहेबांनी खूण करताच सीएमसाहेब बोलू लागले, ‘हे बघा, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे! जनतेच्या मनातलं सरकार आहे! जनतेच्या हिताचे निर्णय घेणारं गतिमान सरकार आहे..,’

पुढली सगळी वाक्ये सर्वांनाच तोंडपाठ होती…

‘दीड वर्षापूर्वी आम्हीही नऊ थर लावून एक हंडी फोडली…त्यामुळे घरी बसून दहीहंडीची गंमत बघणारे कायमचे घरी बसले!!’ कर्मवीर बोलत होते. हेही सगळे तोंडपाठच होते. एका आमदाराने कडकडून आलेली जांभई आवरली. ‘भराभरा काय ते थर लावा, आणि एकदाची ती हंडी फोडा! आम्ही अजून किती वाट बघायची?’ शेवटी दादासाहेबांनीच विषय दहीहंडीकडे वळवला.

‘ही हंडी फोडण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ!,’ चाळीस आमदारांपैकी कुणीतरी एक ओरडले. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्यांपैकी तो एक आवाज असावा, असा सर्वांनाच संशय आला.

‘दहीहंडी फोडणे फारसे सोपे नाही. त्यासाठी प्लॅनिंग लागते. ते एक सांघिक कार्य आहे! संघभावनेनेच व्हायला हवं!,’ असे नानासाहेबांनी दादासाहेबांच्या कानात सांगितलेले कर्मवीर भाईसाहेबांना ऐकू आले. त्यांनी अंगठा उंचावून ‘हो’ म्हटले. ‘‘हल्ली मी सगळंच संघभावनेनं करतो..,’ दादासाहेब किंचित ओशाळ्या आवाजात म्हणाले. त्यावर नानासाहेबांनी त्यांना अंगठा दाखवला.

प्लानिंग ठरले ते असे : सर्वात खालच्या थरात कर्मवीर भाईसाहेबांचे चाळीस समर्थक कोंडाळे करुन उभे राहतील. मधल्या थरात दादासाहेबांसोबत आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहतील. सर्वात वरच्या थरात कमळपंथी कार्यकर्ते संघभावनेने उंची वाढवतील. त्यावर दादासाहेब आणि नानासाहेबांच्या खांद्यावर बसून भाईसाहेबांनी हंडी फोडण्याचा करेक्ट कार्यक्रम करावा. खापरीचे तुकडे मात्र दादासाहेबांच्या हाती सोपवावे!!..हेदेखील सिंबॉलिकच झाले!

…अखेरीस सहाव्या मजल्याच्या खिडकीतून तिघांनीही काठीने दहीहंडी फोडावी, असे ठरले, आणि तसेच करण्यात आले.

…सारे काही सिंबॉलिक तर होते! गोविंदा रे गोपाळा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com