ढिंग टांग : सेटलमेंट! सेटलमेंट...!

खरं तर मी थँक्यू म्हणायला प्रेमानं फोन केला होता! तू मला आणि माझ्या कुटुंबीयांना पाठिंबा दिलास, खरंच थँक्यू! तुझं मन खरंच राजासारखं आहे!
Dhing Tang
Dhing Tangsakal

दादू : (खट्याळपणाने फोन लावत) खट..खट खट…खट…कुर्र…कुर्रुक…कुर्र कुर्र कुर्रक…

सदू : (स्नेहपूर्ण खेकसत) कोणॅय रे..?

दादू : (मज्जा वाटून) म्यांव म्यांव..!

सदू : (अचूक ओळखत) दादूराया…बोल! ओळखलाय मी तुझा आवाज!

दादू : (कशी जिरली, अशा थाटात) मांजराचा आवाज काढला तेव्हा बरोब्बर ओळखलंस, पण आधीचा आवाज कुठं ओळखलास?

सदू : (गोंधळून) पीठाच्या गिरणीसारखा आवाज येत होता खरा!

दादू : (किंचित नाराजीनं) पीठाची गिरणी? काहीही हं सदूराया! मी अडकित्त्यात सुपारी कातरत होतो…खट खट कुर्रुक..कुर्र…कुर्र…!! कत्री सुपारी अशीच कातरतात!

सदू : (थंड सुरात) तुला काय माहीत? तू कधी गेलायस बघायला पानटपरीवर?

दादू : (विषय बदलत) खरं तर मी थँक्यू म्हणायला प्रेमानं फोन केला होता! तू मला आणि माझ्या कुटुंबीयांना पाठिंबा दिलास, खरंच थँक्यू! तुझं मन खरंच राजासारखं आहे! उगीच नाही लोक तुला राजा आदमी म्हणत!

सदू : (कडवटपणाने) आम्ही कुटुंबाची जाण ठेवतो, आणि नाती जपतो! तू मात्र मला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाहीस!!

दादू : (समजूत घालत) ते टोमणे खरे नसतात रे! राजकारणात असं करावं लागतं! तुला नाही समजणार ते!!

सदू : (वैतागून) मला का समजणार नाही? मी काय इतका ‘हा’ आहे? नॉन्सेन्स!! स्वत:चा पक्ष चालवतो मी!!

दादू : (टोमणा मारत) अस्सं? कुठाय तुझा पक्ष? आसपास कुठं दिसत नाही!

सदू : (संतापून) दादूऽऽ…! वाट्टेल ते ऐकून घेणार नाही! सांगून ठेवतोय!! तुझ्याकडे तरी काय उरलंय? सगळं गेलं चोरीला!!

दादू : (दर्पोक्ती करत) माझा धारावीचा भव्य मोर्चा पाहिलास ना? माझं काहीही गेलेलं नाही! अरे, पक्ष न्याल, नाव न्याल, पक्षचिन्ह चोरुन न्याल, पण माझ्या मनातला मराठी माणूस कसा चोराल अं?

सदू : (टोमणा मारत) सेटलमेंट झाली नाही, म्हणून मोर्चा काढला वाटतं!!

दादू : (खवळून) सद्याऽऽ…सेटलमेंटवाले तुम्हीच! आम्ही त्यातले नव्हे!! सेटलमेंट करायची असती तर आज ही वेळ आली नसती आमच्यावर! आजही आम्ही त्या कमळवाल्यांसोबत सेटलमेंट केली असती, तर सगळी सेटलमेंटच सेटलमेंट झाली असती!

सदू : (बर्फाळ सुरात) पण तुम्ही काँग्रेसवाल्यांशी सेटलमेंट करुन फसलात!!

दादू : (संतापातिरेकाने) खामोश!! आमची सेटलमेंट एकच- देश वाचवण्यासाठी!!

सदू : (कपाळाला हात लावत) देश वाचवायलाही तुम्हाला सेटलमेंट करावी लागते? कमालच आहे!!

दादू : (छद्मीपणाने) …धारावीचा एक मोर्चा काय काढला, सगळे चमचे खणखणीत वाजायला लागले आहेत!

सदू : (खोडी काढत) चमचे कुठे वाजतात? ताटवाट्या वाजतात!

दादू : (संतापाने बेभान होत) हर हर महादेऽऽव!! अडकित्त्यात धरुन काड काड खांडं करीन! कराकरा कातरुन कतरी सुपारी करुन बनारसी पानात घालून खाईन!!

सदू : (कुत्सितपणाने) चुना कमी लावा! तोंड पोळेल!!

दादू : (काही न सुचून) सद्याऽऽ…!

सदू : (निर्वाणीच्या सुरात) तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला, त्याच्या परतफेडीची अपेक्षा नाही!! तुम्ही बसा तुमची सेटलमेंट करत!!

दादू : (नरमाईनं) सद्या, महाराष्ट्रातली जनता वाट बघतेय, आपल्या दोघांमध्ये सेटलमेंट कधी होणार, याची! आणि आपण इथं भांडत बसलो आहोत! बरं दिसतं का?

सदू : (फायनल निर्णय देत) ते जाऊ दे! मी दादरमध्ये सेटल झालोय, तू बांदऱ्यात!! याहून अधिक सेटलमेंट हवीच कशाला?

जय महाराष्ट्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com