ढिंग टांग : दिन कोणाचा, वर्धापन कोणाचे?

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) सोमवारचा दिवस अतिशय धकाधकीचा गेला. दमणूक आणि करमणूक दोन्हीही झाले! नागपुरात नव्हतो, तरीही मजा आली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

आजची तिथी : शोभन संवत्सर श्रीशके १९४५ आषाढ मासारंभ.

आजचा वार : मंडेवार.

आजचा सुविचार : महापुरे झाडे जाती, तेथे कमळेचि वाचती..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) सोमवारचा दिवस अतिशय धकाधकीचा गेला. दमणूक आणि करमणूक दोन्हीही झाले! नागपुरात नव्हतो, तरीही मजा आली. वातावरणात किती ऊर्जा होती! हा संपूर्ण आठवडा वर्धापनदिनांचा आहे. एका पक्षाने आज रोजी दोन ठिकाणी, दोन वेगवेगळे वर्धापनदिन साजरे केले. एकच पक्ष आमचा मित्रही आहे, आणि तोच शत्रूही आहे! एक माजी मित्र आहे, दुसरा आजी! दोहोंपैकी एक उरलेला, आणि दुसरा पुरुन उरलेला!!

एकाने माझ्यावर स्तुतीसुमने उधळली, दुसऱ्याने लाखोली वाहिली. पक्ष एक- भाषा अनेक! हार अनेक, प्रहार अनेक! दोन्ही वर्धापनदिन सोहळ्यांमध्ये माझ्या आठवणी निघाल्या, हे काय कमी आहे? आमच्या आणखी एका दूरच्या राष्ट्रवादी मित्राचाही उद्या-परवा वर्धापनदिन आहे! तिथंही माझी आठवण हमखास निघणार, याची मला खात्री वाटते…एकंदरित महाराष्ट्राच्या राजकारणात मी सर्वव्यापी, सर्वसाक्षी ठरलो आहे, यात शंका नाही. नमो नम:!!

एखाद्या नसलेल्या पक्षाचा वर्धापनदिन कसा असू शकतो? पण आज होता! आमच्या माजी मित्रपक्षाचा आज वर्धापनदिन होता!! होताच म्हटलं पाहिजे! पण ‘माजी’ असला तरी मित्रच ना? सकाळी उठून प्रथम (माजी मित्र) मा. उधोजी यांना वर्धापनदिनाच्या अभिष्टचिंतनाचा मेसेज ‘व्हॉट्सप’वर पाठवला. मेसेजवर पुष्पगुच्छाचे छानसे चित्र धाडले…(वर चार लाल गुलाब आणि एक स्मायली!!) त्यावर त्यांनी लाल रंगातली रागीट मुद्रा आणि ठोशाचे चिन्ह पाठवले.

हरकत नाही! आमचे माजी मित्र रागावले आहेत. मी समजू शकतो. एखाद्याला कुठे कुठे आग व्हायला लागली की राग राग येतोच. याऊलट आमचे सध्याचे मित्र मा. कर्मवीर भाईसाहेब!! त्यांच्या पक्षाचाही वर्धापनदिन होता. त्यांच्यासारखा ओरिजिनल माणूस मी अद्याप पाहिलेला नाही. त्यांनाही एक मेसेज (पुष्पगुच्छ, आठ गुलाब आणि विजयी अंगठा प्लस स्मायली!) पाठवून दिला. त्यावर त्यांनी ‘थँक्यू व्हेरी व्हेरी मच’ असे उत्तर पाठवले.

वर नमस्काराचे जोडलेले हात! बरे वाटले!! हेच गेल्या आठवड्यात भलभलत्या जाहिराती छापून आणल्या, तेव्हा का आठवले नाही? या विचाराने मन थोडेसे काळवंडले. पण थोडेसेच!! कारण कर्मवीरांनी त्यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणात माझे केवढे गोडवे गाईले. माझ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल भक्तिभावाने गौरवोद्गार काढले. आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनाला दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे गोडवे कोण गाते? याला म्हणतात सौहार्दाचे राजकारण!!

उरलेल्या पक्षाने उरलेला वर्धापनदिन साजरा करताना माझा वारंवार उल्लेख केला. आमच्या पक्षाच्या थोर नेत्यांच्या आठवणी काढल्या. रिश्ते-फरिश्ते, सूर्य काय, अहमदशाहा अब्दाली काय, कोथळा, खंजीर, गद्दार…सगळे काही मनोरंजक होते. मा. उधोजीसाहेबांची भाषणे हल्ली रंगू लागली आहेत. अवली, कावली, पावली वगैरे यमके जुळवून त्यांनी छानदार भाषण केले. पुढल्या वेळेला मीदेखील असे भाषण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

उद्या-परवाकडे आमचे राष्ट्रवादी मित्र त्यांचा वर्धापनदिन साजरा करतील. त्यांच्या वर्धापनदिनालाही माझा उल्लेख टाळता येणार नाही, याची मला खात्री आहे. महाराष्ट्रात कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही कार्यक्रम करो, माझे नाव घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही, हे सत्य आहे!! मी स्वत: कल्याणला फडके मैदानात भाषण ठोकून उरलीसुरली कसर भरुन काढली. वर्धापनदिन इतर पक्षांचे, पण दशांगुळे उरलो मीच!! एका अर्थी हा माझाच वर्धापनदिन नाही का? नमो नम:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com