ढिंग टांग : बोगद्याच्या टोकाशी उजेडाचा पुंज...!

दिवाळीच्या दिवसात काळोखाला गंज, बोगद्याच्या टोकाला गा उजेडाचा पुंज
Dhing Tang
Dhing Tangsakal

दिवाळीच्या दिवसात काळोखाला गंज

बोगद्याच्या टोकाला गा उजेडाचा पुंज

दिवाळीच्या दिवशी तो काळोखात शिरे

कष्टाविना कोण देते उगा जिरेमिरे?

रोज निघे कामावर मजुरांचा थवा

हातावर काम येथे, पोट राही गावा

कष्टाविना नाही देत कुणीही भाकर

कोण ठेवे हातावर खोबरे साखर?

रोज येथे पहाडाशी चालतसे युद्ध

पहाडाच्या पोटामध्ये उजेडाची हद्द

पहाडाच्या कोथळ्यात अंधारे भुयार

प्रहरांचा नसे ठाव, सकाळ दुपार

रातदिन येथे आहे युद्धाचा प्रसंग

पहारींची खणाखणी, त्यात सारे दंग

काय आहे येथे सांग, कोळशाची खाण?

हिरेमाणकांच्या राशी, खनिजांचा वाण?

कोण जाणे फत्तराच्या काय आहे आत

साधीसुधी एकसुरी लपलेली वाट

अंधाराच्या कुहरी तो शिरला मुद्दाम

पुढे पुढे चाले तोच, मागे मुकादम

पोटासाठी काळोखाची वाट तोच चाले

नसे ठावे पुढे काय वाढून ठेवले

खोल खोल बोगद्यात चाले खोदकाम

राडारोडा, चिखलात सारी धामधूम

घरघर चालती ते यंत्रांचे राक्षस

पोखरती डोंगरात बोगदा झकास

आणि काय झाले तेव्हा कळलेही नाई

ढगफुटी झाल्यागत कडाडली खाई

कर्णकटू आवाजात विरे भवताल

डोंगराच्या पोटामध्ये जाहला कल्लोळ

क्षणार्धात थांबले ते यंत्रांचे आवाज

सैतानाची पिलावळ करी कुजबूज

अंधाराच्या पोटामध्ये दाटला अंधार

अंधाराच्या स्पर्शामात्रे देहात शहार

मणक्यात सरसरे काटा भयानक

बंद झाले बोगद्याचे एकमेव टोक

एक बाजू पहाडाची अजस्त्र की भिंत

दुजी बाजू बंद झाली गर्द ढिगाऱ्यात

संपला का येथे आज आपुला प्रवास?

तुटला का दोर येथे, थांबला का श्वास?

आता कैचें जाणे येणे, कोठला संसार?

थांबेल का देवा येथे हाच येरझार?

अब्द अब्द मनीं आले, उन्मळले मन

दूरदेशी राहिले गा, सारे आप्तजन

पहाडाने गिळियेली, आमुची जीविते

काळ कैदाशीण कशी दाढा रगडिते

पळे गेली, कुठे गेली, पळते घटका,

प्रहरांचा घास घेते रात रुखासुखा

अंधाराच्या कुहरात दिस झाली रात

देहामध्ये भिनते अन वाहते रक्तात

कोण येई वाचवाया, हरीचा गा लाल

ओढील जो दोन्ही हात, आता बालंबाल

फोडा ना रे कोणीतरी, उचला दगड

आतल्या बाजूने आता तिळा तो उघड

तिमिराच्या उदरात आम्ही नवजात

तरंगतो गर्भजळी असे सुरक्षित

कोणीतरी आहे तेथे, काळोखाचा काळ

त्याच्यासवे गुंतलेली, माझी जन्मनाळ

‘कैसे हो सब?’’ ऐकू आले शब्द अज्ञाताचे

त्यास होते गंध सारे, आईच्या वस्त्राचे

हरवल्या पोराला गा जणू मिळे माय

तशी होती शब्दांवर माणुसकीची साय

पहाडाची भिंत झाली मऊ मेणागत

छिद्रातून बोले कोणी, ऐके मनोगत

काळोखाला पडे भोक, उजेडाचा झरा

फिरु लागे जीवनाचा गाडा गरागरा

अव्याहत चालू होती, कुदळ फावडी

रोज कमी होत गेली अक्कड पहाडी

आधुनिक यंत्रांनाही जेथ नुरे त्राण

मजुरांनी मजुरांचे वाचविले प्राण

दिवाळीच्या दिवसात काळोखाला गंज

बोगद्याच्या टोकाला गा उजेडाचा पुंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com