ढिंग टांग : रिव्हर्स म्यारेथॉन मुलाखत!

सर्वप्रथम आमच्या सर्व कडवट मावळ्यांस डब्बल शुभेच्छा! आज रोजी आपल्या पक्षाचा वर्धापनदिन, आणि उद्या जागतिक गद्दारदिन!!
Dhing Tang
Dhing Tangsakal

सर्वप्रथम आमच्या सर्व कडवट मावळ्यांस डब्बल शुभेच्छा! आज रोजी आपल्या पक्षाचा वर्धापनदिन, आणि उद्या जागतिक गद्दारदिन!! दोन्हीसाठी शुभेच्छा. सालाबादप्रमाणे आम्ही यंदाही म्यारेथॉन मुलाखतीचा घाट घातला. मुलाखत नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. फरक एवढाच होता की एरवी आमचे परमनंट सामनावीर मा. संजयाजी टेढेमेढे सवाल विचारतात, आणि मा. साहेब त्यांस उत्तरे देतात. औंदा मात्र बदल…सॉरी…परिवर्तन झाले आहे. या रिव्हर्स म्यारेथॉन मुलाखतीत प्रश्न विचारले साक्षात ‘साहेबां’नी, आणि त्याला टेढीमेढी उत्तरे मा. संजयाजी यांनी दिली. या मुलाखतीचा सारांश :

प्रश्न : (इकडे तिकडे बघत) सुरु करायचं?

उत्तर : (इकडे तिकडे बघतच) काय?

प्रश्न : (गोंधळून) आपलं ते हे…म्यारेथॉन मुलाखत वगैरे?

उत्तर :…करा की! मी नेहमीच तयार असतो!

प्रश्न : (चाचरत) काय विचारु?

उत्तर : (बेधडक अंदाजात) काहीही विचारा! मी विचारतो तसं!! इथं कोणाचं दडपण घेऊ नका! शेवटी तुम्ही आमचे नेते आहात! विचारा बिनधास्त!!

प्रश्न : असंय होय! मला वाटलं, तुम्हीच नेते आहात!

उत्तर : (उमदेपणाने) असं कसं? आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाही…विचारा!

प्रश्न : (भानावर येत) ठीकंय…मी उत्तरं विचारीन, तुम्ही प्रश्न द्या!

उत्तर : (मखलाशी करत) चालेल…आय मीन…चालेल?

प्रश्न : (नेहमीची सुरवात…) सध्या क्या चल रहा है?

उत्तर : (विजयी मुद्रेने) …सध्या फॉग चल रहा है!

प्रश्न : (जमेल तितक्या खेळीमेळीने) मध्यंतरी मी युरोपात सुट्टीवर गेलो होतो…

उत्तर : (उगीच) व्वा, क्या बात है!!

प्रश्न : (दुर्लक्ष करत नेटाने) …तिथे लोक रस्त्यात भेटून विचारत होते, ‘‘काहो, तुमचं सरकार कधी येणार?’’

उत्तर : (चतुराईने) मग तुम्ही काय उत्तर दिलं?

प्रश्न : (डब्बल चतुराईनं) मी कुठं उत्तर दिलं? मी प्रश्न देतो, उत्तर नव्हे!! या प्रश्नाचं उत्तर संजयाजी देतील, असं सांगून आलोय!!

उत्तर : (बेदरकारपणे) पुढलं विचारा!

प्रश्न : मविआ पंचवीस वर्ष टिकणार, असं तुम्ही म्हणाला होता…

उत्तर : (आणखी बेदरकारपणाने) बरं मग?

प्रश्न : (गडबडून) मग? मग काही नाही…जाऊ दे! हे उत्तर ऑप्शनला टाकू या!!

उत्तर : (खांदे उडवत) तुमची मर्जी! शेवटी तुम्ही आमचे नेते!!

प्रश्न : (कुजबुजत) आज किनई आपला वर्धापनदिन आहे…

उत्तर : (चष्म्यातून रोखून बघत) वर्धापनदिन? हॅ:!! असेल, मला माहीत नाही...पण उद्या गद्दारदिन आहे, हे खात्रीनं सांगू शकतो! आणि तो जास्त महत्त्वाचा आहे! सरकारने त्यानिमित्तानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करायला हवी!!जागतिक गद्दारदिन दरवर्षी २० जूनला साजरा व्हायलाच हवा, असं युनोला पत्र लिहिलंय मी,... यु नो?

प्रश्न : (कौतुकादराने) तुमची युनोत वट आहे? कम्मॉलच्चै एका मॉणसॉची हंऽऽ..!

उत्तर : (दर्पोक्तीने) माझं म्हणणं असं आहे की, योगा दिवस साजरा होऊ शकतो तर गद्दारदिन का नाही? पुढे बोला!

प्रश्न : (तक्रारीच्या सुरात) ‘मातोश्री’तून उठा, आणि मालवणीत जाऊन या, असं ते कमळवाले मला चिडवतात!!

उत्तर : (मालवणी भाषेतले काही शब्दालंकार उधळत) च्यामारी या कमळवाल्यांच्या! ते कोण सांगणारे? आधी तुम्ही मणिपूरला जाऊन दाखवा म्हणावं!

प्रश्न : (टाळीसाठी हात पुढे करत) मीही हेच सुनावलं!!

उत्तर : (कौतुकाची थाप देत) शाब्बास! माझ्या तालमीत लौकरच तयार व्हाल तुम्ही!! अशीच प्रगती करा! जय महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com