ढिंग टांग : खोके, गोडाऊन आणि पाऊस…!

कमॉन! दबलाय म्हणजे? ही वेळ झोपण्याची नाही! युद्धाची आहे! इट्स वॉरटाइम, बॅब्स!
Dhing Tang
Dhing Tangsakal

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : निकराची.

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (थकून अंथरुणात पडता पडता) आक..छी!! दाही, दको दको!…बी भयंकर दबलोय! गुडनाईट!!

विक्रमादित्य : (खोलीत धडकत) कमॉन! दबलाय म्हणजे? ही वेळ झोपण्याची नाही! युद्धाची आहे! इट्स वॉरटाइम, बॅब्स!

उधोजीसाहेब : (गुळमुळीतपणे) आकछी!! असू दे रे वॉर टाइब! इथं बला सर्दी झालीये! दाकाला आडी कपाळाला बाम लावून झोपू दे बला!! उद्या सकाळी पुन्हा लढायला जायचंय!!

विक्रमादित्य : (काळजीपोटी) परभणीच्या सभेत पावसात भिजलात ना? म्हणून झाली सर्दी!! पण भिजलात हे बरं झालं! आता त्या गद्दारांचं काही खरं नाही! गेलं त्यांचं इलेक्शन वाहून!! हाहा!!

उधोजीसाहेब : (सभेच्या आठवणीत रमत) मी भाषणाला उभा राहिलो, आणि पाऊस सुरु झाला! मी छत्री मागवली होती, पण कार्यकर्ते म्हणाले, ‘‘साहेब, ही संधी सोडू नका! पावसात भिजलात तर जिंकाल हमखास!’’ आकछी!! भिजलो नि काय!!

विक्रमादित्य : पावसाचा आणि इलेक्शनचा काय संबंध?

उधोजीसाहेब : (राहिल्या त्या आठवणी…) आकछी! तो एक वेगळाच इतिहास आहे! नंतर कधीतरी सांगेन!!

विक्रमादित्य : (गळ घालत) सांगा ना प्लीज! मला हल्ली कुठंच ट्रेनिंग मिळत नाही! तुम्हीच माझा घरच्या घरी अभ्यास घेईन, असा शब्द दिला होता…

उधोजीसाहेब : (नाकाला बाम चोळत) त्याचं काय झालं की, गेल्या निवडणुकीत सिल्वर ओकचे थोरले साहेब पावसात भिजले, म्हणून तर आपलं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं! मी सीएम झालो, आणि तू मंत्री!!

विक्रमादित्य : (अभ्यासातील निष्कर्ष) म्हंजे पावसामुळे आपलं सरकार आलं, आणि खोक्यांमुळे गेलं…असंच ना!!

उधोजीसाहेब : (संयमानं घेत) पाऊस फक्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असतो, असं नाही, राजकारणातसुद्धा पाऊस गरजेचा असतो! खोक्यांचा विषय काढूसुद्धा नकोस!!

विक्रमादित्य : (कुरकुरत) मी एवढ्या ठिकाणी प्रचाराला गेलो, एकदाही पाऊस आला नाही! प्रत्येक ठिकाणी भिजलो, पण घामानं!! प्रत्येक ठिकाणी खोके, खोके आणि खोके!!

उधोजीसाहेब : (समाधानानं) प्रचारसभेत पाऊस पडणं हा शुभशकुन असतो! पावसात भिजत भाषण केलं की मतांचाही पाऊस पडतो, हे आता सिद्ध झालं आहे!

विक्रमादित्य : (चकित) पण एप्रिल महिन्यात पाऊस आलाच कसा?

उधोजीसाहेब : (टाळी वाजवत) तोच तर चमत्कार आहे ना…आकछी!! (कपाळावर तळहाताने स्पर्श करत) मला झोपू दे बरं!! रात्र वैऱ्याची आहे…

विक्रमादित्य : (चर्चेचा मुद्दा उपस्थित करत) बाय दवे, बॅब्स, लंडनला कोणाची प्रॉपर्टी आहे?

उधोजीसाहेब : (डोक्यावरुन पांघरुण घेत) कुणास ठाऊक!

विक्रमादित्य : (आणखी चौकश्या करत) लखनौच्या जमिनीची काय भानगड आहे?

उधोजीसाहेब : असेल काहीतरी! आपल्याला काय करायचंय?

विक्रमादित्य : (खोदून खोदून विचारत) भरपूर खोके ठेवलेलं गोडाऊन कुणाचं सापडलं?

उधोजीसाहेब : (कडवटपणानं) ते त्या गद्दारांनाच विचार! दाढ्या वाढवून हिंडतात लेकाचे!! एकेकाला बघतोच आता!! नाही यांची गोडाऊनं रिकामी केली, तर नाव लावणार नाही!!

विक्रमादित्य : (मनातली शंका उपस्थित करत) बॅब्स, मला एक सांगा…खोके, गोडाऊन, पाऊस हे सगळं ठीक आहे! पण त्यामुळे मतं कशी मिळतात?

उधोजीसाहेब : (सुस्कारा सोडत) बाबा रे, मतं कशामुळे मिळतात, हे नक्की कळलं असतं, तर पावसात भिजण्याची वेळ कशाला आली असती? आकछी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com