ढिंग टांग : गरजू गोविंदाचे गाऱ्हाणे..!

ढिंग टांग
ढिंग टांग sakal

मा ननीय आदरणीय कर्मवीर श्री. नाथभाई सीएमसाहबयांसी, कोटी कोटी दंडवत. पत्र लिहिणेस कारण कां की, सर्व गोविंदालोकांच्या वतीने आपले शतश: आभार. तुमच्यामुळे आपली वाडीवस्तीतली वट वाढली. कालपर्यंत आपल्याला बघून (चाळीतले) शेजारीपाजारी दार लावून घेत होते. आता स्माइल देतात.

मागल्या टायमाला दहीहंडीच्या वक़्ताला पाचव्या थरावरुन पडल्यामुळे डावा हात मुरगळला होता. घरी आल्यावर बापाने उजवा पिरगळला!! यावेळी हातावर दही ठेवले. (मी खापरीचा तुकडा ठेवला!) दहीहंडीला नस्ते धंदे म्हणणाऱ्या या लोकांना हा आडवेंचर स्पोर्ट आहे, हे तुमच्यामुळे कळले. खरंच थँक्यू! गोविंदा खेळणाऱ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची आपली घोषणा भारीच आहे. आपल्याला नोकरी मिळणार यावर अजूनही विश्वास बसत नाही. गोविंदाचा खेळ साहसी खेळांमध्ये समाविष्ट करुन आपण एक नवा थर गाठलात. तुमचे आभार कसे मानू?

…आमच्या वाडीवस्ती मित्रमंडळातर्फे आम्ही दरसाल दहीहंडीला बाहेर पडतो. (टी शर्ट छापला आहे, पाठवतो!) आपल्याच वाडीतल्या चम्या चुरमुरेचा ४०७ ट्रक आहे. त्याच्या ट्रकमधून आम्ही लोक दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडतो. ट्रकमधून हिंडत कागदी प्लेटीत बिर्याणी किंवा पुलाव खात, वडापाव चावत हंड्या फोडायचे उद्योग केल्यामुळे घरी जाम शिव्या पडत होत्या. आज त्यांना कळले असेल की, आम्ही साहसी खेळ करत होतो. फालतू टाइमपास नव्हे!

सगळ्या गोविंदांना ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम’च्या तालावर नोकरीत पाच टक्के आरक्षण देणार, असे आमच्या मंडळाचा खजिनदार छब्या बोलला. खरं आहे का? तसं असेल तर पुन्हा एकदा थँक्यू. पण नेमक्या कुठल्या थरावरच्या गोविंदाला सवलतीचा फायदा मिळेल, याची आयडिया येत नाही. सर्वात वरच्या थराला असलेला पोरगा यंदा बारा वर्षाचा होता! नंदू भोप्या सातव्या थराला होता. त्याच्या मते तोच खरा

स्पोर्टमन आहे. सवलत कोणी घेयाची, यावर आमच्या दहीहंडी मित्रमंडळात भांडणे चालू झाली आहेत. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. मी सर्वात खालच्या थराला होतो. हेवीवेट लोक खालच्या थराला असतात, हे आपल्याला माहीत आहे. तळागाळातल्या गरजू माणसाला प्राधान्यक्रमाने नोकरी मिळेल का? हे विचारण्यासाठी मी सदर लेटर लिहीत आहे…

आमच्या मित्रमंडळाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ मा. आ. बापूसाहेब आपल्यासोबत गुवाहाटीला होते. गुवाहाटीमध्ये आम्ही पन्नास थरांची हंडी फोडली, असे आपण आपल्या एका भाषणात बोलला होता. पन्नास थर? हा रेकॉर्ड गिनीज बुकात नोंदला पाहिजे, असे आपले मत आहे. पन्नास थर लाकडी फळ्यांचे लावणेसुद्धा अवघड होते. विटासुध्दा तेवढ्या लावता येत नाहीत. पण आपण राजकीय हंडी फोडण्यासाठी

पन्नास थर लावले. तुस्सी ग्रेट हो! मागल्या टायमाचे सीएमसाहेब जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचो) चे सल्लागार होते, आणि भारतातल्या पहिल्या पाच नंबरात आलेले बेस्ट सीएम होते, अशी नोंद ऑलरेडी झाली आहे. साहेब, आपण निदान गिनिज बुकात तरी जावे, अशी प्रामाणिक विच्छा आहे. बघा काही जमते का! आपल्याला काय कठीण आहे? पुन्हा एकदा थँक्यू. आमच्यासारख्या गरजू गोविंदाकडे लक्ष असू द्यावे, ही विनंती.

आपला आज्ञाधारक.

एक गोविंदा. ता. क. : गुवाहाटीला आपल्यासोबत असलेले आमचे आ. बापूसाहेब सर्वात वरच्या थराला होते, असे ते सांगतात. त्यांनाही गोविंदांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मिळून मंत्रिमंडळात जॉब भेटेल, असे म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com