ढिंग टांग : कोण करतंय फोडाफोडी? (तीन गोपनीय पत्रे)

प्रिय जयंतराव यांसी जय महाराष्ट्र. गेले दोन-तीन दिवस महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उन्हातान्हात भटकत आहे. ही वेळ माझ्यावर येईल, असे वाटले नव्हते.
dhing tang
dhing tangsakal

प्रिय जयंतराव यांसी जय महाराष्ट्र. गेले दोन-तीन दिवस महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उन्हातान्हात भटकत आहे. ही वेळ माझ्यावर येईल, असे वाटले नव्हते. मध्यंतरी एक खोटारडे आणि बंद दाराआड खोटीनाटी वचने देणारे आणि नंतर काखाबगला वर करणारे आणि दिल्लीचे आदिलशहा महाराष्ट्रात येऊन गेले. तेव्हा त्यांनी ‘आम्ही कुणाचेही पक्ष फोडले नाहीत, पुत्रप्रेमामुळेच ते पक्ष कडक उन्हातल्या माठासारखे फुटले’ अशा आशयाचे वक्तव्य केले. आमचा पक्ष त्यांनीच फोडला, असे मी आजवर समजून चाललो होतो.

तुमचाही पक्ष त्यांनीच फोडला, असेही मला वाटले होते. गैरसमज निघाला!! आता काय करायचे?

यांनी आपले पक्ष फोडले नाहीत, तर काय आपणच ते फोडले? मीच स्वत: दगडावर हापटून माझा पक्ष फोडला असे म्हणायचे का? नॉन्सेन्स!! याच आदिलशहाच्या फौजेतला एक नाना फडणवीस नावाचा गुलाम ‘मी फोडला, मी फोडला, मी फोडला’ असे सांगत मिशीला तूप लावून फिरतो आहे म्हणे! त्याच्या मागावर मी काही मावळे सोडले होते, पण ते मावळेच गद्दारांना जाऊन मिळाले, असे कळते. जाऊद्यात. नक्की काय घडले ते जरा कळवा. आपला. (आता नम्र) उधोजी. (सध्या) वांद्रे.

आदरणीय उधोजीसाहेब, सविनय जय महाराष्ट्र. मला काहीच कल्पना नाही हो! कुणी कोणाचे पक्ष फोडले, हे बरेच दिवस मला कळत नव्हते. माझेही तुमच्यासारखेच मत होते की कमळवाल्यांनीच आपले पक्ष फोडले. अगदी दिवाळीच्या दिवसात माठात सुतळी बॉम्ब लावून फोडतात, तसे फोडले. तुमचा पक्ष फुटला ते मला दोनेक दिवसांनी कळले. इतकेच नव्हे, तर माझा पक्ष फुटलाय, हे तीनेक दिवस उलटल्यानंतर कळले. पण कुणीतरी पक्ष फोडलाय, हे मात्र नक्की कळले!!

माझा वहीम सुरवातीपासूनच त्या फडणवीसांवर होता. त्यांना फार सवय आहे. हातात घेतलेले प्रत्येक खेळणे खोलून बघण्याचा किंवा आपटून फोडण्याची खोड असलेली काही व्रात्य मुले असतात. त्यापैकीच ते असावेत. पण आम्ही पक्ष फोडलेच नाहीत, असे मोटाभाई शहा (तुमच्या भाषेत आदिलशहा) यांनी स्पष्ट केल्याने माझा गोंधळ वाढला आहे. चौकशी करावी लागेल. जमेल तसे कळवतो. पण तुम्हीच कळवलेले बरे! मला बराच वेळ लागेल!! आपला नम्र तुतारीवाला. जयंतराव अध्यक्ष.

प्रिय वंदनीय, आदरणीय, प्रार्थनीय श्री. मोटाभाई, सादर प्रणाम. आम्ही तुमचे पक्ष फोडलेच नाहीत, तुमच्या पुत्र-पुत्रीप्रेमामुळेच ते फुटले, असे तुम्ही महाराष्ट्रात येऊन म्हणालात. त्यामुळे इथे बरीच खळबळ माजली आहे. हे पक्ष मीच फोडले, असा सगळ्यांचा आजवर समज होता. तो इतका पसरला होता की पक्ष फोडले ते आपणच, असे माझे मलाच वाटू लागले. म्हणूनच ‘मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो’ अशी आरोळी मी मध्यंतरी ठोकली होती. पण तो सपशेल गैरसमज होता. मी काहीसुद्धा केलेले नाही, हे जाणवून मला खूप मोकळे वाटू लागले आहे. थँक्यू!

परवा तुम्ही म्हणालात की आपला या फोडाफोडीशी काहीच संबंध नाही, तेव्हा कुठे मी भानावर आलो. यापुढे मिशीला तूप लावून फिरणे मी सोडून देणार आहे. हुडी घालून रात्रीअपरात्री हिंडणेही थांबवणार आहे. हे फोडाफोडीचे राजकारण आपल्या पक्षाच्या धोरणात बसत नाही. पत्ते काटणे, आमदार-खासदार फितवणे ही आपली कामे नव्हेत! दोन पक्ष फुटले ते त्यांच्या कर्मामुळे!! आपल्याला काय त्याचे? हेच खरे आहे. विनम्र प्रणाम. आपलाच नानासाहेब फ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com