प्रिय आदरणीय उधोजीसाहेब, आपुलकीचा जय महाराष्ट्र! सध्या दिवस कठीण आहेत. राज्यसभेची एक जागा आणि विधान परिषदेची एक जागा या दोन जागा आहेत, आणि आपल्या आघाडीत पक्ष तीन आहेत. रेटारेटी बरीच चालू झाली आहे. राजकारण म्हटले की रेटारेटी होणारच..आमच्या पक्षाचे नवेकोरे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदेजी यांना तुम्हाला भेटायचे होते. ते दोनदा ‘मातोश्री’वर जाऊनही आले. एकदा सकाळी दहाच्या आधी गेले म्हणून आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी सातनंतर गेले म्हणून, त्यांना दारावरुनच (नार्वेकर नावाच्या एका उंचपुऱ्या व्यक्ती) फुटवले. म्हणून मीच माजी अध्यक्ष या नात्याने पुढाकार घेऊन हे पत्र लिहीत आहे..आम्हाला परस्पर फुटवून तुम्ही दिल्लीतील हायकमांडशी बोलणी सुरु केल्याचे कळले. खरे आहे का? आमच्या पक्षात अस्वस्थता आहे. जिसकी भैंस बडी, वो जादा दूध देगी असा मेसेज मला आमचे मुंब्र्याचे नेते आव्हाडसाहेब यांनी पाठवला. सुरवातीला मला काहीच कळले नाही. पण तुम्ही (आणि काँग्रेस) काहीतरी गॉटमॅट चालू आहे, एवढे नंतर कळले..तुम्ही विधान परिषदेवर जावे, आणि राज्यसभा आम्हाला सोडावी, असे मला वाटते. तुम्ही दिल्लीत जाऊन काय करणार? त्यापेक्षा मातोश्री काय वाईट आहे? विधान परिषदेवर गेलात, तर दुपारी घरी जाता येते. दिल्लीत लांब पडेल!! तुम्हाला हे मान्य व्हायला हरकत नाही. आपला विचार कळवावा, ही विनंती.आपला. जयंत्राव.ता. क. : आपली आघाडी अखंड आहे, अखंड राहील!.प्रिय आदरणीय उधोजीसाहेब, जय हिंद! आदरणीय राहुलजी आणि वंदनीय महामॅडमजींच्या कृपेने मी वर्ध्यात दुपारचा पहुडलो होतो, तेवढ्यात तिसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा फोन आला. त्याने खबर दिली की तुमच्या एका खासदाराने थेट दिल्लीत आमच्या हायकमांडशी बोलणी सुरु आहे. अहो, मी इथे अध्यक्ष असताना परस्पर हायकमांडशी कशाला बोलता? या फुटवाफुटवीला मी कंटाळलो आहे..आ. राहुलजी आणि वं. महामॅडमजींच्या कृपेने देशपातळीवर इंडि आघाडी आणि राज्य पातळीवर मवि आघाडी अखंड आणि अभेद्य आहे. ती तशीच राहिली पाहिजे. राज्यसभेवर आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही मोठा भाऊ म्हणून आघाडीधर्म पाळायला हवा, असे वाटते. कळावे.आपला. ह. सपकाळ (अहो, मी अध्यक्ष, कांग्रेस पार्टी).काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना, जय महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी गुजरातहून आलेल्या आदिलशाही फौजा नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी नियतीने आमच्यावर सोपवली असताना आम्ही मागे हटू, असे कदापि होणार नाही! राज्यावर, तसेच मुंबईवर येऊ घातलेले अडाणीपणाचे संकट आम्ही एका झटक्यात परतवून लावू. त्यासाठी आम्हाला ना दिल्लीला जायची गरज, ना दक्षिण मुंबईत!.पण मुद्दा आमचे काय? हा नाहीच. महाराष्ट्राचे भले कशात आहे? हा खरा सवाल आहे. महाविकास आघाडीची भिंत अभेद्य आहे, कारण या आघाडीच्या भिंतीसाठी वापरले गेलेले सीमेंट आम्ही आहोत. ये दीवार टूटती क्यूं नहीं असे विचारुन डोके हापटून घेणारी कमळाबाई केविलवाणी झाली आहे ती आमच्यामुळे. परवा दिल्लीच्या हाय-कमांड का लो-कमांडला, आम्ही हेच सांगितले. ते ओके असे खीककन हसत म्हणाले.तात्पर्य, राज्यसभा वा विधान परिषदेच्या जागा आमच्याच आहेत, हे सर्वांनी पक्के याद ठेवावे. आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचे बघावे! जय महाराष्ट्र. आपला. उधोजी.ता. क. : तरीही महाविकास आघाडी अभेद्य आहे, अभेद्य आहे, अभेद्य आहे!!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.