ढिंग टांग : यादी आ रही है...!

राजाधिराज उधोजीमहाराज नेहमीप्रमाणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. अस्वस्थ झाले की ते हेच करतात. इथून तिथे, तिथून इथे!
dhing tang
dhing tangsakal

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : दुर्धर.

राजाधिराज उधोजीमहाराज नेहमीप्रमाणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. अस्वस्थ झाले की ते हेच करतात. इथून तिथे, तिथून इथे! गवाक्षातून बाहेर पाहात ते मधूनच ‘जीतम जीतम’ अशा आरोळ्या ठोकतात. हवेत तलवारीचे हात करतात. तेवढ्यात त्यांना काही याद येते. अब आगे...

उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (डुलत डुलत प्रवेश करत) मीच आहे हो इकडे! बोला, कशापायी याद केलीत?

उधोजीराजे : (शाब्दिक कोटी करण्याचा मोह न आवरुन) यादीपायी याद केली! हीही हीही...!! कशी वाटली आमची कोटी?

संजयाजी : (तर्जनी-अंगठा जुळवत) अप्रतिम! ‘भेकड जनता पार्टी’च्या तोडीची!!

उधोजीराजे : (दुर्लक्ष करत) आपली यादी आली?

संजयाजी : (दातात काडी घालत) कुठली? वाणसामानाची?

उधोजीराजे : (संतापून) चेचीन!! तुमची ही भिकार सवय थांबवा पाहू! दरवेळी कसली कोडी घालता आणि दुरुत्तरं करता?

संजयाजी : (पडेल सुरात) ऱ्हायलं!! सॉरी!

उधोजीराजे : (सुस्पष्ट विचारणा करत) आपल्या महाविकास आघाडीची यादी फायनल झाली का? एवढंच सांगा!!

संजयाजी : (खिशातून कागद काढत) एकवीस-सतरा-दहा इज इक्वल टु अठ्ठेचाळीस! विषय संपला!! यादी तयार आहे!!

उधोजीराजे : (खालच्या आवाजात) सगळं आपल्या मनासारखं झालं ना? आपल्याला हव्या त्या जागा मिळाल्या, मग आणखी काय हवं?

संजयाजी : (विनम्रपणे पुन्हा मुजरा करत) तुस्सी ग्रेट हो, जहांपन्हा!!

उधोजीराजे : (करारी मुद्रेने) खामोश! जास्त लाडात येऊ नका!! नाही त्या कमळाबाईच्या उपटसुंभांना ‘अबकी बार तडीपार’ केलं, तर उधोजी नाव लावणार नाही!! भेकड लेकाचे!! असले अनेक दिल्लीश्वर या उधोजीच्या महालात हात बांधून आले आणि हात हलवत गेले!! आता बघतोच एकेकाला!!

संजयाजी : (री ओढत) त्या भेकडांना तर अजून साधं जागावाटपाचं गणित नीट जमेना!! गद्दारांची अवस्था तर विचारुच नका!!

उधोजीराजे : (अतीव समाधानाने) आल इज वेल! आल इज वेल!! दोन्ही मित्र पक्षांनी मला गुढी पाडव्याचं श्रीखंड भरवताना सांगितलं, ‘‘साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’’ याला म्हणतात एकजूट!! कळलं?

संजयाजी : (कुजबुजत्या आवाजात) ते ठीकंय, पण आपल्या मित्र पक्षातले काही नेते फार नाराज आहेत, असं कळलंय!! नको त्या जागा आमच्या गळ्यात मारल्या, आणि हव्या त्या घेऊन गेले, असं ते पाठीमागे बोलतायत म्हणे!!

उधोजीराजे : (आव्हान देत) अरे ज्जा रे ज्जा!! आले आहेत मोठे जागा मागणारे!! ही लढाई आम्ही स्वबळावर लढतो आहोत! त्या तक्रारखोरांना म्हणावं, निकाल लागल्यानंतर तुमची तोंडं कायमची बंद होतील!!

संजयाजी : (समाधानाने) जागावाटपाची शर्यत आपण जिंकली! आपण पहिले आलो!! धन्य तुमची, राजे!!

उधोजीराजे : (खुशीची गाजरं खात) आम्हालाही नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन आलं होतं! पण सगळं नीट झालं!! आता एकदिलानं लढून रणांगण जिंकू या, असा निरोप द्या आपल्या मित्रपक्षांना!! इतकं सहज झालं सगळं की अजून विश्वास बसत नाही...

संजयाजी : (फुशारक्या मारत) मी होतो, म्हणून सगळं नीट झालं, राजे!! शर्यतीत तुमचा नंबर पहिला यावा, म्हणून आम्ही दाताच्या कण्या केल्या!!...पुढले पंतप्रधान तुम्हीच!! निदान मुख्यमंत्रीपद तर कुठंच नाही गेलं!!

उधोजीराजे : (संशयानं) काय रे, सगळे मिळून तुम्ही माझा मोरु तर करत नाही ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com