ढिंग टांग : ‘ते’ परत आले...!

पहिल्याच दिवशी सभागृहाच्या आवारात लांबवर एक ओळखीची व्यक्ती येताना दिसली. निरखून पाहिले, आणि दचकलो.
nagpur winter session 2023 nawab malik entry politics marathi news
nagpur winter session 2023 nawab malik entry politics marathi newsSakal

आजची तिथी : शोभन नाम संवत्सरे श्रीशके १९४५ कार्तिक कृ. द्वादशी.

आजचा वार : संडेवार.

आजचा सुविचार : आयेगाऽऽ...आयेऽऽगा...आऽ ऽयेगा... आयेगा आनेवालाऽऽ...!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) गेले काही दिवस नागपुरात असूनही तोंड चुकवत पळत होतो. पहिल्याच दिवशी सभागृहाच्या आवारात लांबवर एक ओळखीची व्यक्ती येताना दिसली. निरखून पाहिले, आणि दचकलो.

ते नबाबभाई होते!! पायऱ्यांवरुन आत पळालो. दालनात बसून होतो. तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगू लागले की, ‘ते’ बाहेर दाराशीच घुटमळत आहेत. दालनाला एकच खिडकी आहे, आणि तिला गजही आहेत. चडफडलो! बराच वेळ बाहेर गेलोच नाही.

(त्या भानगडीत जेवण बुडाले!!) दिवस असाच गेला... रात्री उशीरापर्यंत बसून आमचे नवे मित्र मा. दादासाहेब बारामतीकरांना एक चातुर्यपूर्ण पत्र लिहिले. ‘नबाबभाईंना मुंबईलाच परत जायला सांगावे,’ अशी विनंती त्यांना करुन वर ‘नागपूर-मुंबई’चे सेकंड एसीचे तिकिटही जोडून पाठवले. स्वत:वरच खुश झालो. याला म्हंटात चाणक्यनीती!!

दुसऱ्या दिवशी सभागृहात (मांडीला मांडी लावून) शेजारी बसलेले दादासाहेब तणतणले, ‘‘अहो, शेजारी बसतो आपण, पत्र कसली पाठवता?’’ त्यांच्या हातात माझे पत्र होते. जे उघडपणे सांगता येत नाही, ते गोपनीय पत्रात सांगता येते, असे मला सांगायचे होते, पण बोललोच नाही.

‘‘पत्र पाठवता ते पाठवता, वर मीडियालाही देता!,’’ दादासाहेब पुन्हा तणतणले.

मुळात पत्र मीडियात देण्यासाठीच लिहिले होते, पण त्यांनाही पाठवले, हे सांगणार कसे? पण बोललो नाही. पण थोड्यावेळाने खाकरल्याचा आवाज झाल्याने मी मागे वळून बघितले. मागच्या रांगेत नबाबभाई बसून माझ्याकडेच हसत बघत होते. त्यांनी ‘काय कसं काय?’ असा हात केला. मी दुर्लक्ष केले. लगेच मागल्या बाजूने कुणीतरी कुचकट हसल्याचा भास झाला. कुणीतरी खोखो हसले देखील!! मी दुर्लक्ष केले.

ते परत येत आहेत, हे आधी कळले असते तर मी पुन्हा येईन, असे म्हटलेच नसते. पण दोन्ही गोष्टी घडणार असे दिसते. राजकारणात सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे, अशी मनाची समजूत घालतो आहे.

एवढे होत नाही, तेवढ्यात आमचे कमळाध्यक्ष पूज्य नड्डाजींचे पत्र हातात पडले, त्याचा मराठी तर्जुमा असा : ‘‘प्रिय देवेनभाई, स्नेहपूर्ण आशिष... (हा आशिष आशीर्वादाचा, शेलारांचा नव्हे!) महाराष्ट्रातून ४८ पैकी ४५ लोकसभेच्या जागा जिंकणे भाग आहे. विधानसभेच्याही सव्वादोनशे जागा यायला हव्यात. तुमच्यावरच सगळी मदार आहे. (वाचून कित्ती बरे वाटले...) तथापि, हे काही

एकट्यादुकट्याचे काम नाही. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि (उत्तरेत येऊन आपोआप) प्रगल्भ झालेले नेते श्रीमान विनोदवीर तावडेजी तुमच्या दिमतीला धाडतो आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणनीती आखावी. कळावे. आपला. जे.पी.’’

nagpur winter session 2023 nawab malik entry politics marathi news
Bajaj Allianz Pune Half marathon 2023 : फक्त 17 सेकंदाचा खेळ! अखेर उत्तम पाटीलने मारली बाजी

मी घाईघाईत दुसरे पत्र लिहायला घेतले. मी लिहिले : ‘‘माननीय नड्डाजी, महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४८ पैकी ४८ जागा आणि विधानसभेच्या मिनिमम अडीचशे जागा मी तुम्हाला सहज निवडून आणून देईन. परंतु, विनोदवीरांना येथे धाडू नका.

आपला पक्ष दक्षिणेत कमी पडतो, तिथे त्यांना टी. विनोद किंवा तुत्तिकोडी विनोद या नावाने राष्ट्रीय निरीक्षक म्हणून पाठवा. तेथे ते नक्की चांगले काम करतील, असा विश्वास वाटतो. कळावे. आपला आज्ञाधारक. नानासाहेब फ.’’

...एक ‘ते’ परत आले तर इतके घडले, आणखी एक ‘ते’ परत आले, तर पंचाईतच व्हायची! चाणक्यनीतीलाही काही लिमिट असते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com